भगवंत लहानात लहान भक्तासाठीही धावून येतो

सर्वत्र व्यापून असलेला पण डोळ्यांना न दिसणारा भगवंत नेमका आहे तरी कसा, त्याची महानता वर्णन करण्यासाठी वेदांनी सृष्टीतील अनेक महान गोष्टींचे दाखले दिले. पण ते कुठे ना कुठे अपूर्णच पडले. खूप प्रयत्न करूनही वेदांना परमात्म्याचे यथार्थ, संपूर्ण वर्णन करता आले नाही. इतका महानात महान असलेला भगवंत लहानात लहान भक्तासाठीही धावून येतो. कितीही कठीण परिस्थिती असली तरी त्यातून त्याला सावरतो.

श्रीराम
अहिल्या शिळा राघवे मुक्त केली।
पदी लागता दिव्य होऊन गेली।
जया वर्णिता शिणली वेदवाणी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी । श्रीराम ।

रामायणातील एका कथेचा इथे संदर्भ आहे. विश्वामित्र ऋषींबरोबर राम लक्ष्मण मिथिला नगरीत जात असताना त्यांना गौतम ऋषींचा ओसाड पडलेला आश्रम दिसला. रामाने त्या आश्रमाबद्दल विश्वामित्रांना प्रश्न केला. तेव्हा त्यांनी अहल्येची हकीकत सांगितली. ब्रह्मदेवाची मानसकन्या असलेली स्वरूपवान अहिल्या गौतम ऋषींची पत्नी होती. तिच्या रूपावर भाळून इंद्र गौतम ऋषींच्या रूपात आला आणि तिच्याशी रत झाला. त्यानंतर गौतम ऋषींनी तिला ‘शिळा होऊन पडशील' असा शाप दिला.

शिळा होण्याचा अर्थ दगडासारखी जड होऊन पडशील, अन्न पाण्याविना केवळ वायु भक्षण करून, मनुष्यप्राण्यासारख्या कोणत्याही स्वाभाविक क्रिया न करता, दगडासारखे निष्क्रिय होऊन, कोणासही न दिसता एक हजार वर्षे पडून राहशील असा तो शाप होता. त्या ओसाड आश्रमात गेल्यानंतर कोणालाही न दिसणारी अहल्या श्रीरामांच्या नेत्रांना दिसली. त्यांच्या पदस्पर्शाने ती शापमुक्त झाली. तिला नवचैतन्य, नवजीवन प्राप्त झाले. दिव्य देह प्राप्त झाला. भगवंताच्या असीम कृपेचे हे एक उदाहरण आहे. अज्ञानाने किंवा मोहाने जरी अपराध घडला आणि त्याबद्दल मनुष्याला खरोखर पश्चात्ताप झाला, त्याने त्याचे यथोचित प्रायश्चित्त घेतले तर कृपाळू परमेश्वर त्याला क्षमाच करतो. शरणागताचा तो उद्धारच करतो. त्याला दूर लोटत नाही. त्याची उपेक्षा करत नाही. अशा परमेश्वराचे वर्णन करता करता चारी वेदही थकून गेले. त्याच्या सामर्थ्याचे, त्याच्या कृपेचे, त्याच्या गुणांचे, पराक्रमाचे कितीही वर्णन केले तरी ते अपूर्णच ठरते. ज्या वेदांमध्ये संपूर्ण ज्ञानाचे भांडार आहे त्या वेदांनाही ‘नेति नेति' म्हणावे लागले. सर्वत्र व्यापून असलेला पण डोळ्यांना न दिसणारा भगवंत नेमका आहे तरी कसा, त्याची महानता वर्णन करण्यासाठी वेदांनी सृष्टीतील अनेक महान गोष्टींचे दाखले दिले. पण ते कुठे ना कुठे अपूर्णच पडले. खूप प्रयत्न करूनही वेदांना परमात्म्याचे यथार्थ, संपूर्ण वर्णन करता आले नाही. इतका महानात महान असलेला भगवंत लहानात लहान भक्तासाठीही धावून येतो. कितीही कठीण परिस्थिती असली तरी त्यातून त्याला सावरतो. त्याला संकटातून पार करतो.

अहिल्या पतीशापाने शिळे सारखी होऊन पडली होती. तिच्या आयुष्याला काही अर्थ उरलेला नव्हता. तिचे जीवन, तिचा भवताल, सर्व शुष्क, ओसाड होऊन गेले होते. मात्र तिच्या सूक्ष्म देहातून, अंतःकरणातून कदाचित भगवंताचे अखंड स्मरण होत राहिले असेल, चुकून किंवा मोहग्रस्त होऊन झालेल्या पापकर्माचा पश्चाताप होऊन मनापासून क्षमायाचना झाली असेल, काही असो. जेव्हा भगवंताचे पाऊल तिच्या जीवनात पडले तिचा उद्धारच झाला. जोपर्यंत आपल्या आयुष्यात भगवंत नसतो तोपर्यंत आपलेही आयुष्य असेच जड, निरर्थक, शुष्क असते. भगवंताच्या जाणीवेशिवाय असलेल्या जगण्याला काहीही अर्थ नसतो. अशा जगण्यात काही ‘राम' नसतो. वय वाढत जाते एवढेच. आणि एक दिवस हा महद्‌भाग्याने मिळालेला दुर्लभ मनुष्य देह संपून जातो. पण जर आपल्या जीवनात भगवंताचे पाऊल पडले आणि आपण त्याचे स्वागत केले तर जीवन उजळून निघते. ज्ञानाचा प्रकाश पडतो. आयुष्यातील जडत्व जाते, क्रियाशीलता येते. निरर्थक, निरुपयोगी, वाया जाणाऱ्या आयुष्यात ‘राम' येतो. आनंद येतो. असे काही कार्य आपल्या हातून घडते ज्यामुळे आपले कल्याण तर होतेच.. समाजालाही आपला काही उपयोग होतो. एक तर भगवंताचे पाऊल आपल्या दारात पडावे किंवा आपण भगवंताच्या पायाशी जाऊन पडावे. परिणाम आपले कल्याणच होणार. भगवद्गीतेत भगवंत म्हणतात, अपि चेत्सुदुराचारो भजते मामनन्यभाक्
साधुरेव स मन्तव्यःसम्यग्व्यवसितो हि सः ९-३०
अत्यंत दुर्वर्तनी मनुष्य देखील जर अनन्य भक्तीने माझी उपासना करील तर तो साधूच समजावा. कारण त्याच्या बुध्दीचा निश्चय चांगला झालेला असतो.
ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,
यालागी दुष्कृती जऱ्ही जाहाला।तरी अनुतापतीर्थी न्हाला। न्हाऊनि मजआंतु आला। सर्वभावे (९-४२०)

अहिल्येने पश्चात्तापाने दग्ध होऊन हजार वर्षे खडतर तपश्चर्या केली. पतीतपावन रामाने तिचा उद्धार केला. ज्यांच्या केवळ स्मरणाने पापांचा नाश होतो अशा पंचकन्यांमध्ये अहिल्येचे स्थान प्रथम आहे. ‘अहल्या द्रौपदी सीता। तारा मंदोदरी तथा। पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम। अहल्येच्या जीवनाला झालेल्या श्रीराम स्पर्शाचे हे फलित आहे.
जय जय रघुवीर समर्थ  
-आसावरी भोईर. 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 जड झाले ओझे