मनाचे श्लोक  

जे आंतरिक शत्रू असतात, ज्यांना आपण षड्रिपू म्हणतो, ते सहजपणे दिसत नाहीत. पण त्यांचे अस्तित्व जाणवल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या अस्तित्वाचे दुष्परिणामही दिसल्याशिवाय राहत नाहीत. काम, क्रोध, लोभ, मोह,मद, मत्सर या शत्रूंना अंतःकरणातून घालवण्यासाठी, त्यांचा समूळ नाश करण्यासाठी, भगवंताचे नामस्मरण हेच शस्त्र कामाला येते.

पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे।
बळे भक्तरिपूशीरी कांबी वाजे।
पुरी वाहिली सर्व जेणे विमानी।
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी । श्रीराम ।

श्रीराम जसा शस्त्रांनी सज्ज आहे तसाच अलंकारांनी सजलेला आहे. आपादमस्तक विविध अलंकारांनी नटलेला आहे. त्याच्या पायात जे रुमझुमणारे तोडर आहेत ते भक्त रक्षणाचे ब्रीद दर्शावितात. त्यांचा नाद ग्वाही देतो की प्रभू जवळच आहेत. भक्ताने निःशंक व्हावे. निर्भय व्हावे. भक्तांचे जे जे कोणी शत्रू असतील त्यांच्या माथ्यावर प्रहार करण्यासाठी श्रीरामांचे धनुष्य सज्ज आहे. बाण सोडण्यासाठी तयार असलेल्या धनुष्याचा टणत्कार भक्तांच्या शत्रूंना गर्जून सांगतो की श्रीराम भक्त रक्षणासाठी येत आहेत. श्रीरामांच्या हातातील शस्त्र वेगाने दुष्टांच्या मस्तकावर आघात केल्याशिवाय राहतनाही याची खात्री बाळगा. असेच समर्थ या श्लोकांमधून सुचवीत आहेत.

आपल्या सर्व सामर्थ्यांशी श्रीराम आपल्या भक्तांचे रक्षण करतात. त्यांच्या शत्रूचा बीमोड करतात. भक्तांचे शत्रू दोन प्रकारचे असतात. एक बाहेरच्या जगातील आणि दुसरे आंतरिक. भक्तांना त्रास देणारे, छळणारे या जगातील जे दिसणारे शत्रू असतात त्यांना शासन करण्यासाठी श्रीराम आपल्या भक्तांना योग्य ते सामर्थ्य देतात किंवा कोणाच्यातरी रूपाने त्या शत्रूंचा नाश करतात किंवा ते शत्रुत्वच मिटवून टाकतात. पण जे आंतरिक शत्रू असतात, ज्यांना आपण षड्रिपू म्हणतो, ते सहजपणे दिसत नाहीत. पण त्यांचे अस्तित्व जाणवल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या अस्तित्वाचे दुष्परिणामही दिसल्याशिवाय राहत नाहीत. काम, क्रोध, लोभ, मोह,मद, मत्सर या शत्रूंना अंतःकरणातून घालवण्यासाठी, त्यांचा समूळ नाश करण्यासाठी, भगवंताचे नामस्मरण हेच शस्त्र कामाला येते. सत्संग, भगवंताचे गुणसंकीर्तन, त्याच्या रूप गुणांचे श्रवण, उपासना, साधना या उपायांनी षड्रिपूंचा नाशकरता येतो. भगवंतावर श्रद्धा ठेवली, शरणागत वृत्ती ठेवली तर भगवंत कृपा करतो आणि योग्य ती साधना करवून घेतो. भगवद्‌गीतेत भगवंतांनी स्वतः सांगितले आहेः परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्‌ धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ४-८

भगवंतांनी स्वतः भक्ताला शब्द दिला आहे की साधूंचे, सज्जनांचे रक्षण करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगे युगे जन्म घेतो. बरे हे जन्मही तो केवळ उच्च योनीत घेतो असे नाही तर भक्तांच्या संरक्षणासाठी नीच योनीचाही स्वीकार करतो. भक्त रक्षणाची आपली प्रतिज्ञा पाळण्यासाठी भगवंत कोणताही मागचा पुढचा विचार करत नाही. भक्तासाठी तात्काळ धावून जातो. भक्तांचा उद्धार, भक्तांचे कल्याण हेच त्याचे ध्येय आहे आणि त्या ध्येयपूर्तीसाठी तो वचनबद्ध आहे. पण मनुष्य मात्र भगवंतप्राप्ती हे आपले मनुष्यजन्माचे ध्येय विसरून जातो.‘रामाने सर्व अयोध्यापुरीला विमानाने वर नेले' याचा अर्थ दोन प्रकारे बघता येईल.. पाच ज्ञानेंद्रिये आणि पाच कमेंर्द्रिये असा दशइंद्रियरुपी रावण मनुष्य देहावर अनिर्बन्ध सत्ता गाजवत असतो. तो देहाला भोगात रमवतो. या रावणाचा नाश करण्यासाठी श्रीरामाला अंतःकरणात प्रगट व्हावे लागते. त्यासाठी हे अंतःकरण कसे हवे तर अभेद्य, अजिंक्य, अयोध्य!

जगातील भेदांचा परिणाम न होणारे. जगातील द्वंद्वांनी प्रभावित न होणारे. सदा सम असणारे. जेव्हा योग्य त्या साधनेने अंतःकरण निर्मल होते, व्यापक होते, तेव्हा भक्त भगवंताशी एकरूप होतो. आत्मज्ञानी होतो. मनुष्यत्वापासून प्रगत होऊन देवत्वापर्यंत पोहोचतो. स्वतः भगवंत सद्‌गुरूरूपाने मनुष्यावर ही विलक्षण कृपा करतो. भगवंताने उन्मत्त रावणाचा नाश करण्यासाठी आणि देवांच्या रक्षणासाठी रामरूपात अयोध्या नगरीत अवतार घेतला.आपले सर्व जीवन त्यांनी दुसऱ्यांच्या सुखासाठी व्यतीत केले. आपण वनवास भोगला. पण प्रजाजनांना सुखसमाधान लाभावे यासाठी कटिबद्ध राहिले. दुष्ट रावणाचा वध केला. त्याने बंदिवासात टाकलेल्या देवांची, इतर राजांचीसुटका केली. जिंकलेली राज्ये योग्य त्या वारसांच्या हाती सुपूर्द केली. स्वतः अयोध्या नगरीत धर्म- न्याय- नीतीलाअनुसरून उत्तम राज्य केले आणि जेव्हा अवतार समाप्तीची वेळ आली तेव्हा अयोध्या नगरीतील सर्व जीवांचा उद्धार केला. सर्व जीवमात्रांना विमानातून आपल्या ‘साकेत' या परमधामी घेऊन गेले. त्या सर्व जीवांना जन्म मृत्यूच्या चक्रातून सोडवले. रामाच्या राज्यात राहिल्यामुळे आपल्या सर्व इच्छा, कामना ‘राजा' रामाच्या चरणी अर्पण करून रामराजा आपली योग्य ती काळजी घेईलच, या श्रद्धेने आपली विहित कर्म करणारे अयोध्यावासी खऱ्या अर्थाने रामभक्त झाले होते. त्यांचे अंतःकरण विकार वासनांच्या भूमीवरून वैराग्याच्या उच्च पातळीवर स्थिर झाले होते. अशा प्रकारे ज्या रामाने संपूर्ण अयोध्यापुरीचा, त्यातील प्रत्येक जीवाचा उद्धार केला तो राम आपल्या भक्तांची, आपल्या दासांची कधीही उपेक्षा करणार नाही. आपल्या ब्रीदापासून ढळणार नाही अशी ग्वाही समर्थ आपल्याला पुन्हा पुन्हा देत आहेत.
 जय जय रघुवीर समर्थ
-आसावरी भोईर. 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

चक्रव्युह : रमी सर्कल नावाच्या जुगाररुपी खेळाचा!