चक्रव्युह : रमी सर्कल नावाच्या जुगाररुपी खेळाचा!

भारतीय दंडविधानुसार उघड किंवा छुप्याने जुगार खेळणे हा दंडनीय अपराध असून तो खेळला जात असल्याचे लक्षात येताच पोलीस त्या ठिकाणी जाऊन खेळणाऱ्यांना आणि तो जुगार चालवणाऱ्यांना अटक करतात. हाच जुगार ऑनलाईन पद्धतीने खेळण्याला मात्र कायदेशीर मान्यता आहे. सर्वोच्च न्यायालयानुसार रमी खेळ हा ‘गेम ऑफ लक' नसून ‘गेम ऑफ स्कील' आहे. खेळ खेळणाऱ्याने आपले कौशल्य या ठिकाणी दाखवायचे असते, न्यायालयाच्या या टिपणीमुळे अशा गेमिंग अँप्सचे चांगलेच फावले असून आज सर्वच भाषांतील सिनेकलाकार, नामवंत खेळाडू या अँप्सच्या खुलेआम जाहिराती करताना दिसतात.          

   ‘रमी सर्कलवर कोणी माणसे खेळतात की सर्व संगणकीय बनाव असतो ?',  ‘रमी सर्कलवर कोणी रक्कम  जिंकतात तरी का की सर्व खोटे असते' असे प्रश्न तुम्हालाही या ऑनलाईन रमी खेळाच्या अँपबद्दल पडत असतील, तर तुम्ही कोणालाही याबाबत विचारू नका. कारण कोणीही तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे देणार नाहीत. ते म्हणतील ‘मला काय विचारतोस त्रतिकला विचार'  इतक्यातच तुमच्या शेजारी रमी सर्कलची महती वर्णण्यासाठी आणि तुमच्या शंकेचे यथार्थ निरसन करण्यासाठी स्वतः त्रतिक रोशन अवतरेल. सध्या टीव्ही चॅनल्स किंवा युट्युबवरील व्हिडीओ पाहताना तुम्हाला यत्र तत्र सर्वत्र याच जाहिराती पाहायला मिळतील. या अँपच्या अधिकृत संकेतस्थळानुसार सुमारे ७ कोटी लोकांनी रमी खेळण्यासाठी हा अँप आपल्या स्मार्ट फोनमध्ये डाउनलोड केला आहे. ७ कोटी हा आकडा नक्कीच थोडा थोडका नाही.

                    रमी सर्कलसारखे अँप्स हे खेळ खेळण्याचे व्यासपीठ असल्याचे भासवण्यात येत असले, तरी या अँप्सच्या जाहिराती करणारे सिने कलाकार आणि खेळाडू या अँप्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या बक्षिसांची, लाखो रुपयांची रक्कम जिंकण्याची प्रलोभने दाखवत असल्याने हे अँप्स म्हणजे दुसरे तिसरे काही नसून जुगाराचा अड्डाच असतो हे शेंबडं पोरही सांगेल. सामान्य लोकांना आकृष्ट करण्यासाठी कंपनी १ ते १६ हजार रुपयांपर्यंत ‘वेलकम' बोनस देत असल्याचे सांगितले जाते. मात्र हा ‘वेलकम' बोनस आपल्या बँक खात्यामध्ये घेता येत नाही किंवा तुम्ही स्वतः अँपच्या व्हेलेटमध्ये जोपर्यंत तुमच्या खिशातील पैसे भरत नाही तोपर्यंत तुम्हाला बक्षिसासाठी खेळताही येत नाही, त्यामुळे हा बोनस म्हणजे केवळ मोहमाया' असते हे खेळणाऱ्यांना नंतर लक्षात येते. सेलिब्रेटी आणि खेळाडू यांच्याकडून अँप्सच्या जाहिराती करून त्यांच्या चाहता वर्गाला आकर्षित करण्याचा फंडा आजमावल्यानंतर या अँप्सच्या कंपन्यांच्या लक्षात आले कि देशात मध्यमवर्गीय लोक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांना आकर्षित करण्यासाठी आता जाहिरातींतून मध्यमवर्गीयांचा वापर केला जाऊ लागला आहे. ऑनलाईन रमी सर्कलवरून आम्ही कार जिंकली, आम्ही बुलेट जिंकली तर आम्ही एक लाखापासून एक कोटीपर्यंत रक्कम जिंकली असल्याचा दावा करणारी मंडळी आता रमी सर्कलच्या जाहिरातींतून दिसू लागली आहेत. ही सर्व मंडळी वेगवेगळ्या ‘स्टोरी' सांगून हे अँप कसे गरिबांचा उद्धार करणारे आहे आणि या अँपवर खेळल्याने आपले जीवनमान कसे सुधारले आहे याचे सुरेख वर्णन करताना दिसतात. यांच्या नावाच्या याद्याही या अँप्सवर पाहायला मिळतात हे सर्व पाहिल्यावर पैसे कमावण्याचे एव्हढे सोपे माध्यम असताना लोक नोकरी-व्यवसाय का करतात आणि त्यासाठी शिक्षण तरी का घेतात असा प्रश्न सामान्य बुद्धीला पडतो. या पैसे जिंकणाऱ्यांच्या मुलाखती घेण्यासाठी कंपनीच्या ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क करून विजेत्यांचे संपर्क क्रमांक मागितल्यास ते आपल्याला कंपनीच्या पॉलिसीचे कारण सांगून देण्यास स्पष्टपणे नकार देतात. त्यामुळे या विजेत्यांच्या कथा किती खऱ्या आणि किती खोट्या हे अँप्स कंपनीवालेच सांगू शकतात. या अँप्सवर पैसे गुंतवून खेळायला सुरुवात केल्यावर खेळणारा  सुरुवातीला थोडेफार पैसे जिंकतोसुद्धा; मात्र एकदा खेळणाऱ्याला नाद लागला असल्याचे कंपनीच्या लक्षात आले की खात्यामधून हळूहळू पैसे जायला सुरुवात होते. अधिक पैसे गुंतवल्यास अधिक पैसे मिळतील या अपेक्षेने खेळणारे त्यामध्ये अधिकाधिक पैसे गुंतवू लागतात. आज हरलो, तरी उद्या नक्कीच जिंकू या आशेने कर्ज काढतात, घरातील दाग-दागिने विकतात जमीन-जुमला गहाण ठेवतात. ऑनलाईन गेम्सच्या आहारी गेल्यामुळे अनेकांमध्ये नैराश्य वाढीस लागून निद्रानाशासारखे विकार जडतात. ताण-तणावामुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम होऊन व्यसने जवळ जडतात. अधिक धनाच्या लालसेने काढलेले कर्ज वेळेत फेडता येत नसल्याचे लक्षात आल्यावर जगण्याची उमेद संपू लागते, मानसिक आणि शारीरिक व्याधी जडू लागतात.

                २०२३ च्या ऑगस्ट मासात डोंबिवलीतील एका महिलेच्या गळ्यातील महागडे मंगळसूत्र ओढून पळ काढणाऱ्या युवकाला एका अन्य युवकाने शिताफीने पकडले, चौकशीअंती चोरी करणाऱ्या युवकाने आपबिती सांगितली. रमी सर्कलवर रमी खेळून तो कर्जबाजारी झाला होता. कर्ज फेडण्यासाठी हाती पैसे नसल्याने नाईलाजास्तव त्याने चोरी करण्याचे ठरवले होते. याच महिन्यात हिंगोली येथे एकाने आपल्या मालकाचे पैसे रमी सर्कलवर गमावल्याने गुंडांनी आपल्याला पकडून मारहाण केल्याचा आणि पैसे लुटून नेल्याचा बनाव केला. पोलिसांना संशय आल्याने अधिक चौकशी केली असता मालकाचे ५० हजार रुपये त्याने रमी सर्कलवर हरल्याचे कबुल केले. या अँप्स बनवणाऱ्या कंपनीच्या कार्यपद्धतीचा अभ्यास केला असता या माध्यमातून मोठी रक्कम जिंकणाऱ्यांचे प्रमाण अगदीच नगण्य असते. अँप्स बनवतानाच तसे प्रयोज़न केलेले असते, त्यामुळे अँप्सच्या माध्यमातून पैसे जिंकल्याचा दावा करणारी मंडळी हा केवळ कंपनीच्या जाहिरातीचा भाग असतो हे लक्षात येते. या अँप्स कंपन्यांना अन्य विशेष खर्च नसल्याने ही मंडळी सेलिब्रिटींकडून जाहिराती करून घेण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत असतात. महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींनुसार जुगाराला प्रोत्साहन देणाऱ्या जाहिराती करणे गुन्हा आहे, तरीही या ऑनलाईन जुगाराची जाहिरातबाजी रेल्वे-बस सारख्या शासनाच्या अखत्यारीतील वाहनांवरही बिनदिक्कतपणे सुरु आहे, या जाहिरातींवर बंदी आणण्याचे आदेश केंद आणि राज्य सरकारला देण्यात यावेत आणि कायद्यातील तरतुदीनुसार या ऑनलाईन खेळांवर कारवाई करण्यात यावी अशा विनंतीची याचिका मुंबई उच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे.

काही कायदेतज्ञांच्या मते जुने कायदे हे केवळ जुगारासंदर्भात असल्याने या गेमिंग अँप्सवर त्या अंतर्गत कारवाई करण्यास मर्यादा येतात. या जुन्या कायद्यांत सुधारणा करून आधुनिक ऑनलाईन जुगारपद्धती कायद्याच्या कक्षेत आणल्यास पोलिसांना या अँप्सवर कारवाई करणे सुलभ जाईल. रमी सर्कलसारख्या ऑनलाईन गेम्समुळे युवापिढीचे प्रतिदिन कितीतरी तास केवळ खेळण्यात वाया जात आहेत, ज्या ‘गेम्स'मुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत त्याकडे सरकार दुर्दैवाने केवळ अधिक उत्पन्न मिळवून देणारे साधन म्हणून पाहात आहे. ऑनलाईन गेमिंगच्या आहारी गेल्यामुळे तरुणांच्या वेळेची तसेच वित्तीय हानी होत असल्याचे लक्षात आल्यावर आसाम, आंध्र प्रदेश, ओडिशा, नागालँड, सिक्कीम, मेघालय, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांतील राज्य सरकारांनी ऑनलाइन रमीला ऑनलाइन जुगाराच्या कक्षेत आणून त्यावर बंदी आणणारा कायदा आणला आहे. महाराष्ट्रातही या कायद्याची नितांत आवश्यकता आहे. - जगन घाणेकर 

 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मूल्यशिक्षण : काळाची गरज