स्वापिंग मशीनमुळे ठाणे बेलापूर मार्गावर  धुळीचे साम्राज्य 

नवी मुंबई-:नवी मुंबई महानगर पालिकेच्या वतीने शहरात अतिवर्दळीच्या रस्त्यावर मानवविरहित साफसफाई करण्यासाठी  सफाई (स्वीप) मशीन ठेवल्या असून त्यांच्याद्वारे रस्त्यावरील धूळ साफ केली जाते. मात्र ठाणे बेलापूर मार्गावर असलेल्या मशीनमध्ये मागील आठ ते दहा महिन्यांपासून तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे सदर मशिनद्वारे  रस्त्यावरील माती, धूळ साफ करताना त्या धुळीची साठवणूक होण्या ऐवजी ती पुन्हा वाहनातून बाहेर फेकली जात असल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्यामुळे सदर धूळ पसरत असल्याने  वाहन चालकांना वाट काढणे कठीण होऊन बसते त्यामुळे अशा वाहनावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

नवी मुंबई शहरात पाम बिच मार्ग, ठाणे बेलापूर मार्ग अशा अति वर्दळीच्या रस्त्यासहित इतर महत्वाच्या मार्गावर साफसफाई करताना सफाई कामगारांना अपघाताचा धोका लक्षात घेता या मार्गावर सफाई करण्यासाठी  (स्वीप) मशिन तैनात केल्या आहेत. त्याद्वारे ही सफाई केली जाते. ही सफाई अत्यंत जलद गतीने होत असल्याने महापालिकेचा कामगार खर्च आणि वेळेची बचत होते. २०१२ साली शहरात अशा ८ मशीनद्वारे साफसफाईला सुरवात करण्यात आली. मात्र यातील काही वाहने नादुरुस्त झाल्याने सफाई ऐवजी धुळीचा धुरळाच अधिक उडवताना दिसत आहे. ठाणे बेलापूर मार्गावर देखील अशाच प्रकारे एक वाहन सफाई करत आहे. मात्र सदर वाहनात मागील आठ ते दहा महिन्यांपासून बिघाड झाला आहे. आणि याकडे मनपा घनकचरा विभाग कल्पना असून देखील दुर्लक्ष करीत असल्याचे एकंदरीत दिसत आहे. ठाणे बेलापूर मार्गावर कोपरखैरणे ते महापे दरम्यान एका मशीनद्वारे रस्ता सफाई करण्याचे काम सुरु असते. मात्र सदर मशीनमध्ये साफ केलेली धूळ साठवणूक करणाऱ्या टाकीच्या छताचा काही भाग फाटला आहे. त्यामुळे रस्त्यावरील साफ केलेली संपुर्ण धूळ ही पुन्हा हवेत निघून जाऊन परिसरात धुळीचे साम्राज्य पसरत असते. सदर धुळीमुळे वाहन चालकांना देखील वाहने चालवताना मोठी अडचण निर्माण होते. त्यामुळे सदर मशीन धूळ साफ करण्यासाठी आहे का धुळीचे प्रदूषण पसरवण्यासाठी आहे? असा सवाल करत सदर वाहनावर कारवाई करण्याची मागणी आता वाहन चालकांकडून करण्यात येत आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

   महापालिका ‘शिक्षण व्हिजन'चा नावलौकीक