भावेनाट्यगृहाला नाट्यनिर्मात्यांची पसंती वाढत चालली

नवी मुंबई-: कोविड टाळेबंदीनंतर वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह  सवलती दरात प्रयोगांसाठी खुले करण्यात आले होते. सुरूवातीला नाट्यनिर्मात्यानी जरी पाठ फिरवली असली तरी मार्च एप्रिल महिन्यापासून नाट्य आणि खाजगी प्रयोगात वाढ होत चालली असुन जानेवारी ते जुलै या सात महिन्यात एकूण १९४ प्रयोग  झाले असून त्यातून  ३१,६३,२१ रू उत्पन्न प्राप्त झाले आहे. त्यामुळे प्रयोगासाठी नाट्यनिर्मात्यांची भावे नाट्यगृहाला पसंती वाढत चालली आहे.

वाशीतील भावे नाट्यगृहाचे नूतनीकरणाचे काम आटोपताच कोविड संक्रमण आले. त्यामुळे लागलेल्या टाळेबंदित भावे नाट्यगृह बंद ठेवण्यात आले. त्यानंतर  ९  महिन्यानंतर ५० % आसन क्षमतेने सदर नाट्यगृह पुन्हा सुरू करण्यात आले होते. मात्र कोविड काळात बऱ्याच रोजगारांवर संकट ओढवल्याने नाट्य निर्मात्यांनी भावे नाट्यगृहाकडे पाठ फिरवली होती. त्यानंतर नाट्यगृहाचे भाडे कमी करण्याची मागणी  नाट्यनिर्मात्यांकडुन केली गेली. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने नाट्यगृहाच्या दरात ७५% सवलत देण्याचा निर्णय घेतला .डिसेंबर २०२० मध्ये पहिला प्रयोग या  ठिकाणी पार पडला. मात्र त्या दरम्यान कोविड संक्रमणामुळे ५०% आसन क्षमता ठेवण्यात आली होती. त्यामुळे नाट्य निर्मात्यांचा खर्च  निघणे कठीण होऊन बसले होते. त्यामुळे नाट्यगृहाला जानेवारी  २०२१ ते डिसेंबर २०२१ या एक वर्षात नाट्यनिर्मात्यांकडुन  भावे नाट्यगृहाला अल्प प्रतिसाद भेटला. मात्र जस जसे कोविड संक्रमण कमी होत गेले व निर्बध हटवल्याने नाट्यगृहात नाटकांच्या आणि खाजगी कार्यक्रमांच्या प्रयोगात वाढ होत गेली. त्यामुळे जानेवारी २०२२ ते जुलै २०२२ या सात महिन्यांच्या कालावधीत १९४  वेळा भावे नाट्यगृहाचे बुकिंग झाले आहे.आणि यातून ३१,६३,२१८ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. तर महापालिकेडुन मराठी नाटकांसाठी देण्यात येणारी सवलत ३१ ऑक्टोबर २०२२  पर्यत राहणार आहे. त्यामुळे सध्याची बुकिंग पाहता आगामी काळात  नाट्यगृहात आणखी खेळ होऊ शकतात अशी शक्यता भावे नाट्यगृह व्यवस्थापनाकडुन व्यक्त करण्यात आली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई संभाजी ब्रिगेड तर्फे जनता दरबार