घणसोली येथे विभागीय क्रीडा संकुलासाठी आरक्षित  भूखंड सिडकोने आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल बांधण्यासाठी पालिकेकडे हस्तांतरित करावा

नवी मुंबई : नवी मुंबईतून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होण्यासाठी, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षणाच्या योजना राबविण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळ स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी घनसोली येथे विभागीय क्रीडा संकुलासाठी आरक्षित भूखंड सिडको महामंडळाने नवी मुंबई महापालिकेकडे विनाविलंब हस्तांतरित करावा, अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी लेखी पत्राद्वारे सिडकोचे व्यवस्थापकीय-संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्याकडे केली आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना देखील या मागणीचे पत्र देण्यात आले आहे.

 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने देशात सर्वत्र क्रीडामय वातावरण निर्माण झाले.  नवी मुंबई महापालिका व खासगी  शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी नवीन क्रीडा योजना सुरु झाल्या आहेत. परंतु प्रत्यक्षात शहरात खेळाडूंसाठी दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करुन देण्यात प्रशासनास अपयश आले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी वारंवार सिडकोकडे क्रीडा संकुलासाठी भूखंड मिळावा यासाठी मागणी केल्यानंतर सिडकोने घणसोली, सेक्टर- १२, १२ ए व १३ येथे ३६ एकरचा भूखंड दिला आहे. त्या शेजारीच कोकण विभागीय क्रीडा संकुलासाठी ४२ एकर भूखंड राखीव ठेवण्यात आला होता. नवी मुंबई महापालिकेने विभागीय क्रीडा संकुलासाठीचा हा राखीव भूखंडही देण्याची मागणी सिडकोकडे केली होती. परंतु, नवी मुंबई महापालिकेला सदरचा भूखंड सिडकोने हस्तांतरीत केला नाही. तसेच  विभागीय क्रीडा संकुलासाठी नवी मुंबईत घणसोली येथे ४२ एकर जमीन आरक्षित असतानाही सिडकोकडून जमीन नसल्याचे कारण देण्यात आले. त्यामुळे नवी मुंबईतील विभागीय क्रीडा संकुल माणगावमधील नाणोरे येथे हलविण्यात आले आहे. 

त्यामुळे सिडकोने घणसोली येथे विभागीय क्रीडा संकुलाकरिता आरक्षित ठेवलेले सर्व भूखंड नवी मुंबई महापालिकेला हस्तांतरीत करण्यात यावेत. जेणेकरुन शहरातील खेळाडूंकरता आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याकरिता त्याचा उपयोग होईल, अशी महत्त्वाची मागणी आमदार नाईक यांनी केली आहे.  घणसोली येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाकरिता देण्यात आलेल्या भूखंडा शेजारीच कोकण विभागीय क्रीडा संकुलासाठी ४२ एकरचा भूखंड राखीव ठेवण्यात आला आहे. तो भूखंड आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल उभारण्याकरिता नवी मुंबई महापालिकेला हस्तांतरीत करण्याबाबत  लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी, अशी विनंती पत्रात शेवटी करण्यात आली आहे.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

भावेनाट्यगृहाला नाट्यनिर्मात्यांची पसंती वाढत चालली