सीवुडस्‌ मधील आश्रमशाळेतून ४५ मुला-मुलींची सुटका

बालकांना अस्वच्छ, गलिच्छ वातावरणात ठेवून आवश्यक सुविधा नसल्याचे उघड

नवी मुंबई ः सीवुडस्‌, सेक्टर-४८ मधील बेथेल गॉस्पेल चॅरिटेबल ट्रस्टच्या चर्चमध्ये बेकायदेशीररित्या चालविण्यात येत असलेल्या आश्रमशाळेवर ठाणे जिल्हा महिला-बाल विकास विभागाने कारवाई करुन त्याठिकाणी ठेवण्यात आलेल्या ३ ते १८ वयोगटातील ४५ मुलांची सुटका केली. तसेच सदर मुला-मुलींच्या आरोग्याच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने त्या सर्वांची उल्हासनगर येथील बालगृहात रवानगी केली. सदर आश्रमशाळेत अस्वच्छ आणि गलिच्छ वातावरण असल्याचे तसेच त्याठिकाणी बालकांसाठी आवश्यक असणाऱ्या कोणत्याच गोष्टी नसल्याचे चौकशीत आढळून आल्याने सदरची कारवाई करण्यात आली.  

सीवुडस्‌ येथील बेथेल गॉस्पेल चॅरिटेबल ट्रस्टच्या चर्चमध्ये बालकांसाठी चालविण्यात येत असलेल्या आश्रमशाळेत मुला-मुलींना अस्वच्छ आणि गलिच्छ वातावरणात ठेवण्यात येऊन त्यांचा छळ करण्यात येत असल्याची माहिती ठाणे जिल्हा महिला-बाल विकास अधिकारी सुवर्णा जाधव यांना मिळाली होती. त्यामुळे त्यांनी सदर तक्रारीची गंभीर दखल घ्ोऊन ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता ठाणे बाल कल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाईल्ड लाईन यांच्यासह बेथेल गॉस्पेल ट्रस्टच्या चर्चला अचानक भेट देऊन तेथे सुरु असलेल्या आश्रमशाळेची तपासणी केली. या तपासणीत तेथील चर्चमध्ये रस्त्यावर राहणारे वृध्द, बेघर व्यक्ती, मतिमंद लोकांसाठी चालविण्यात येणाऱ्या आश्रममध्ये ३ ते १८ वयोगटातील ४५ मुला-मुलींना एकाच ठिकाणी दोन छोट्या खोल्यांमध्ये अस्वच्छता, मोडक्या खोलीत गलिच्छ वातावरणात ठेवण्यात आल्याचे आढळून आले.  

त्याच जागेत चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी बाहेरील अनेक लोक देखील येत असल्याचे तसेच मुलांसाठी दुपारच्या जेवणात डाळ भात आणि आदल्या दिवशी रात्री डोनेशनमध्ये आलेली भाजी ठेवण्यात आल्याचे आढळून आले. सदर आश्रमशाळेत ठेवण्यात आलेले मुले-मुली राजस्थान उदयपूर, ओसिसा, तामिळनाडू, पंढरपूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई आदि ठिकाणांहून वेगवेगळ्या चर्चच्या माध्यमातून आल्याचे आढळून आले. बहुतेक मुले कौटुंबिक कलहामुळे पालकांनी पाठवलेली, एक पालक मयत असलेली तसेच मुलांना शिक्षण देण्यास असमर्थ असलेल्या पालकांनी आपली मुले या आश्रमात पाठविल्याचे चौकशीत आढळून आले. सदर आश्रमशाळेतील काही मुले शिक्षण घ्ोत नसल्याचे तसेच त्यांना शाळेत दाखल केले नसल्याचेही चौकशीत आढळून आले. तसेच संस्थेकडे बालकांना सांभाळण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसल्याचे आढळून आले.  

एकूणच तेथील आश्रमशाळेच्या पाहणीत सदर ठिकाणी अस्वच्छ आणि गलिच्छ वातावरण असल्याचे तसेच त्याठिकाणी बालकांसाठी आवश्यक असणाऱ्या कोणत्याच गोष्टी नसल्याचे आढळून आल्याने तेथील मुला-मुलींच्या आरोग्याच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने सदर आश्रमशाळेत ठेवण्यात आलेल्या असलेल्या ३ ते १८ वयोगटातील एकूण ४५ मुला-मुलींना उल्हासनगर येथील शासकीय बालगृहात ठेवण्यात आले आहे. तर चार लहान मुला-मुलींना नेरुळ मधील बालक केंद्रात ठेवण्यात आले आहे. त्यानंतर ठाणे जिल्हा महिला-बाल विकास विभागाच्या वतीने संस्थेच्या तपासणी सुरु करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर या संस्थेवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.  

सदर कारवाईप्रसंगी बाल कल्याण समिती, ठाणेच्या अध्यक्षा राणी बैसाने, सदस्या अर्चना करोडे, मनिषा झेंडे, भरत पोखरकर, संतोष खंबाळकर, जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या पल्लवी जाधव, युवा चाईल्ड लाईनचे प्रतिनिधी तसेच एनआरआय पोलीस ठाण्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सर्वांच्या एकात्म सहभागातून प्रत्येक घरावर तिरंगा फडणार