स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित आंतरशालेय दिंडी स्पर्धा उत्साहात संपन्न

नवी मुंबई : दिंडी, वारी म्हणजे आपल्या लोकसंस्कृतीचे प्रतिक असून या माध्यमातून विदयार्थ्यांच्या मनावर स्वच्छता, पर्यावरण, व्यसनमुक्ती अशा मौलिक गोष्टींचे संस्कार करणे ही संकल्पनाच अभिनव असून यामधून उदयाचे सुजाण व जागरुक नागरिक घडतील असा विश्वास व्यक्त करीत सुप्रसिध्द अभिनेते  अभिजीत केळकर यांनी विदयार्थ्यांनी रिॲलिटी शो मध्ये नव्हे तर अशा प्रकारच्या सर्वांगीण विकास करणा-या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे आवाहन केले.

     भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशभरात उत्साहाने साजरा होत असताना नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य महोत्सव अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका संचालित शाळांकरिता  आंतरशालेय दिंडी स्पर्धा हा अभिनव उपक्रम विष्णुदास भावे नाटयगृहात आयोजित करण्यात आला होता. त्याच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी अभिजीत केळकर आपले मनोगत  व्यक्त करीत होते.

 याप्रसंगी अंतिम फेरीचे परीक्ष्रक म्हणून सुप्रसिध्द अभिनेते अंशुमन विचारे व अभिजीत केळकर तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे प्रशासन  व शिक्षण ‍विभागाचे उपायुक्त् जयदीप पवार, क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे  उपायुक्त  सोमनाथ पोटरे, क्रीडा अधिकारी अभिलाषा म्हात्रे व रेवप्पा गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.

       दि. 27 जुलै रोजी या आंतरशालेय दिंडी स्पर्धेची प्राथमिक फेरी संपन्न झाली. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या 51 शाळांनी उत्स्फुर्त  सहभाग घेत वारीच्या माध्यमातून लोकसंस्कृतीचे व जनजागृतीपर प्रबोधनाचे व्यापक दर्शन घडविले. प्राथमिक फेरीचे परीक्षक नामवंत अभिनेते, दिग्दर्शक प्रशांत विचारे यांनी 19 शाळांची अंतिम फेरीकरिता निवड केली. या अंतिम फेरीत निवड झालेल्या 19 शाळांची रंगीत तालीम विदयार्थ्यांना विष्णुदास भावे नाटयगृहासारख्या मोठया रंगमंचाचा सराव व्हावा यादृष्टीने 29 जुलै रोजी आयोजित करण्यात आली होती. या निवडक 19 शाळा समुहांची अंतिम फेरी आज जल्लोषात पार पडली.

       आंतरशालेय दिंडी स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर विष्णुदास भावे नाटयगृहात रंगमंच आणि प्रेक्षागृह यामध्ये दिंडी संकल्पनेला पूरक नेपथ्य रचना करण्यात आली होती. प्रेक्षागृहाच्या चार दरवाजांना आळंदी, देहू, पैठण, जळगांव  अशा दिंडी परंपरा जोपासणा-या गावांच्या नावांच्या आकर्षक कमानी लावण्यात आल्या होत्या. या दरवाजांमधूनच सहभागी शाळांच्या दिंडया प्रेक्षागृहातून रंगमंचावर प्रवेश करीत होत्या, आणि आपले सादरीकरण झाल्यानंतर या दिंडया रंगमंचावरुन प्रेक्षागृहात उतरुन पायऱ्या चढून मधल्या पंढरपूरच्या प्रवेशव्दारातून पुढे जात होत्या. एकंदरीतच भरगच्च उपस्थितीतील विष्णुदास भावे नाटयगृहाला भक्तीमय रुप आले होते. 

       या स्पर्धेसाठी दिंडीच्या माध्यमातून सादरीकरणासाठी भजन, कीर्तन, भारुड, भक्तीगीत, वारीतील रिंगणसोहळा अशा स्वरूपात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, मोबाईल टॅब गेमींग गॅझेट्स अशा डिजीटल साधनांपासून व्यसनमुक्ती असे समाजप्रबोधनपर विषय देण्यात आले होते. यावर 51 शाळांनी अत्यंत आगळेवेगळे सादरीकरण केले.

       नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील मुलांमध्ये असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगत प्रशासन व शिक्षण विभागाचे उपायुक्त जयदीप पवार यांनी शाळांनी जो उत्साही सहभाग दर्शविला त्याबद्दल कौतुक केले.

       क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त सोमनाथ पोटरे यांनी भारतीय स्वातत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजन करण्यात येत असल्याची माहिती देत आंतरशालेय दिंडी स्पर्धेला लाभलेला उदंड प्रतिसाद उत्साह वाढविणारा असल्याचे सांगितले.

       कॉमेडीची बुलेट ट्रेन फेम सुप्रसिध्द अभिनेते अंशुमन विचारे यांनी अशा प्रकारच्या स्पर्धा या व्यक्तीमत्व विकासासाठी महत्वाच्या असल्याचे सांगत आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात जा मात्र चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करा असा संदेश विदयार्थ्यांना दिला.

       अंतिम फेरीतील 19 स्पर्धकांमधून या आंतरशालेय दिंडी स्पर्धेचे विजेतेपद राजर्षी शाहू महाराज विदयालय नमुंमपा शाळा क्र.55, आंबेडकर नगर राबाडे यांनी पटकाविले. नमुंमपा शाळा क्रं .49 ऐरोली यांना व्दितीय क्रमांकाचे तसेच नमुंमपा शाळा क्र.20 तुर्भे गाव यांना तृतीय क्रमाकांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. नमुंमपा शाळा क्र. 15 शिरवणे तसेच नमुंमपा शाळा क्र.40 महापे या शाळा उत्तेजनार्थ पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आल्या. नमुंमपा शाळा क्र.112 करावे यांना सर्वोत्कृष्ट वेशभूषेचे तसेच नमुंमपा शाळा 55 राजर्षी छत्रपती शाहू महाराज विदयालय आंबेडकर नगर राबाडे यांना सर्वोत्कृष्ट रंगभूषेचे पारितोषिक देण्यात आले.

मनिष गजमाने या नमुंमपा शाळा क्र.92, कुकशेत मधील कीर्तनकाराच्या भूमिकेतील विद्यार्थी कलावंताला परीक्षकांनी सूचित केल्याप्रमाणे विशेष पारितोषिक प्रदान करुन गौरविण्यात आले. सर्व सहभागी शाळा समुहांनाही स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

       भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रम राबविण्यात येत असून त्याचाच एक भाग असणाऱ्या या आंतरशालेय दिंडी स्पर्धेत 51 शाळांनी उत्साही सहभाग घेत ही स्पर्धा यशस्वी केली. 

 
 
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘सिडको'ने महापालिका हद्दीतील मैदान, मोकळे भूखंड विकण्यावर पर्यावरणवाद्यांचा विरोध