वाशीच्या आय.सी.एल महाविद्यालयात गैरकारभारा विरोधात अभाविपचे स्वाक्षरी अभियान,

नवी मुंबई -:.वाशी मधील आय.सी.एल महाविद्यालयात सुरू असलेल्या गैरकारभाराच्या विरोधात व विद्यार्थ्यांच्या समस्यांसंदर्भात अभाविपच्या वतीने महाविद्यालय प्रशासनास वारंवार  पत्रव्यवहार, निवेदन, विनंती करून देखील महाविद्यालय प्रशासन  विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे, समस्यांकडे डोळेझाक करत आहे. त्यामुळेआय.सी.एल महाविद्यालयाच्या गैरकारभारा विरोधात अभाविपने सोमवारी स्वाक्षरी अभियान राबविले.

 १३ जून पासून महाविद्यालय सुरू करण्याचे निर्देश विद्यापीठाचे  असतानाही तब्बल एक महिना उशिरा महाविद्यालय सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान, जिमखाना फीच्या नावाने दरवर्षी सरसकट ४०० रुपये आकारत असतानाही मूलभूत सुविधांचा अभाव, ८०० विद्यार्थ्यांना नाममात्र ४० संगणकावरून शिक्षण, विद्यापीठ विकास निधी आणि डेव्हलपमेंट फंड या वेगवेगळ्या नावाने विद्यार्थ्यांकडून दरवर्षी ११०० रुपयांची आकारणी, एन.सी.सी युनिट साठी विद्यार्थी सातत्याने मागणी करत असतानाही मॅनेजमेंटचा या मागणीकडे कानाडोळा, महाविद्यालयात  प्राध्यापकांच्या २० जागा अजूनही रिक्त, विद्यापीठ परिपत्रका नुसार गरजू विद्यार्थ्यांना इंस्टॉलमेंटची सुविधा बंधनकारक असतानाही ती महाविद्यालयात उपलब्ध नाही, गेल्या ६-७ वर्षापासून व्यवस्थित उपहारगृह सुविधा दिली जात नाही, महाविद्यालयाच्या गलथान कारभारामुळे गेल्या ६-७ वर्षांपासून नूतनीकरणचे काम सुद्धा अपूर्णावस्थेत आहे, विद्यार्थ्यांना सामना कराव्या लागणाऱ्या अशा कित्येक समस्या व आय.सी.एल महाविद्यालय प्रशासनाकडून होत असलेल्या गैरकारभाराच्या विरोधात आज दिनांक १ ऑगस्ट २०२२ रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने महाविद्यालया बाहेर स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी राबविण्यात आलेल्या या स्वाक्षरी अभियानास महाविद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत महाविद्यालयाकडून होत असलेल्या गैरकारभारा विरोधात स्वाक्षरी करत रोष व्यक्त केला.

आय.सी.एल महाविद्यालय प्रशासन हे वारंवार विद्यार्थी विरोधी भूमिका घेत आहे. महाविद्यालयाची फी भरल्यानंतर विद्यार्थ्यांना दिल्या पाहिजेत अशा मूलभूत सुविधा सुद्धा महाविद्यालयात उपलब्ध नाहीत. - शुभम शिंदे,  अभाविप नवी मुंबई जिल्हा महाविद्यालय प्रमुख

विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण करण्याचा प्रयत्न महाविद्यालय प्रशासनाकडून कित्येक वेळा होत आहे. तसेच महाविद्यालय व्यवस्थापनाकडून चाललेल्या अन्याय विरोधात आवाज उठविणाऱ्या विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न महाविद्यालय प्रशासना कडून वारंवार होत आहे. अभाविप आय.सी.एल महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसोबत खंबीरपणे उभी आहे. आय.सी.एल महाविद्यालय प्रशासनाने यापुढे देखील जर विद्यार्थी विरोधी भूमिका कायम ठेवली तर अभाविप विद्यार्थ्यांच्या हितासाठी महाविद्यालय प्रशासनाच्या विरोधात आणखी तीव्र आंदोलन करेल. - अमित ढोमसे,  अभाविप कोंकण प्रदेशमंत्री 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अबोली रिक्षाकड़े महिला चालकांनी फिरवली पाठ