अबोली रिक्षाकड़े महिला चालकांनी फिरवली पाठ

नवी मुंबई -:.महिलांना स्वयंरोजगारात  स्वावलंबी बनावे म्हणून आरटीओच्या वतीने विशेष अशा अबोली रिक्षांची संकल्पना सुरु करण्यात आली. मात्र या संकल्पनेला नवी मुंबई शहरात हवा तसा प्रतिसाद महिलांनी दिला नसून सन २०१६  पासून आतापर्यंत नवी मुंबई शहरात केवळ ७७ अबोली रिक्षांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे  इतर शहराच्या तुलनेत नवी मुंबई शहरात अबोली रिक्षांकडे  महिलांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.

 समाजातील दुर्बल महिलांना रोजगाराची  संधी उपलब्ध व्हावी व महिलांनी आर्थिक दृष्टया सक्षम व्हावे म्हणून आरटीओ विभागाने अबोली म्हणजेच गुलाबी रिक्षांची संकल्पना पुढे आली होती.  अधिकारी हेमांगी पाटील यांनी ठाणे आरटीओ मध्ये कार्यरत असताना सन २०१६ मध्ये ही अबोली संकल्पना आणून महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला. नवी मुंबई शहरात ही संकल्पना पुढे आली. मात्र नवी मुंबईत शहरात सन २०१६ पासून ते जुलै २०२२ अशा  ७ वर्षात अवघ्या ७७ रिक्षांची नोंदणी महिलांमार्फत करण्यात आलेली आहे. याच्या उलट   मागील दोन वर्षात १४९६ साध्या रिक्षांची नोंदणी झालेली आहे. नवी मुंबईत सध्या दहा हजाराहुन अधिक रिक्षा रस्त्यावर धावत आहेत. मात्र अबोली रिक्षा नोंदणीसाठी महिला पुढे येत नाहीत. अबोली रिक्षाला ठाणे आणि पनवेल शहरामधुन मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.  ठाणे शहरात गेल्या ७ वर्षात ३९९ तर पनवेल मध्ये १२५ हुन अधिक अबोली रिक्षांची नोंदणी झाली आहे. मात्र नवी मुंबई आरटीओने  फक्त ७७ रिक्षांची नोंदणी झाल्याने नवी मुंबई शहरात अबोली रिक्षांकडे महिलांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.

नवी मुंबई शहरात ही अबोली महिला चालक रिक्षा आहेत. परंतु वाढते इंधन दर त्यामुळे होणारा खर्च आणि आता व्यवसाय कमी होत आहे त्यामुळे घर खर्च कसा भागवायचा ? गाडीचे हफ्ते कसे फेडायचे ? अशा समस्या येतात. आजूबाजूच्या समाजाने आणि त्या क्षेत्रातील माणसांनी आमच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याचा चष्मा उतरविला पाहिजे. आम्हा महिला रिक्षाचालकांना रिक्षा थांब्यावरती दुजाभावाची वागणूक दिली जाते. रिक्षा थांब्यावर हटकले जाते तिथे थांबू दिले जात नाही. पनवेल मधील अबोली रिक्षांसाठी स्वतंत्र थांबा देण्यात आलेला आहे. आम्हाला ही स्वतंत्र थांबा द्यावा. - अंजना शिंदे, अबोली महिला रिक्षा चालक

नवी मुंबई शहराच्या तुलनेत ठाणे, पनवेल मधून अबोली रिक्षाला चांगला प्रतिसाद आहे. अबोली रिक्षा ही केवळ महिलाच चालवू शकतात. तसेच मुक्त परवाने असल्याने बहुतांशी महिला या साधी रिक्षा घेऊन त्या पुरुषांना चालवायला देत आहेत. मात्र अबोली रिक्षा ही संकल्पना महिलांना स्वावलंबी होण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे महिलांनी याचा उपयोग करून घेतला पाहिजे. - हेमांगी पाटील, उपप्रादेशिक अधिकारी, वाशी 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सामान्य माणसाला मराठी साहित्याचा केंद्रबिंदू बनविणारे अण्णा भाऊ युगप्रवर्तक साहित्यिक – डॉ. प्रा. शरद गायकवाड