”घरोघरी तिरंगा” उपक्रमातून देशप्रेम व्यक्त करण्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांचे आवाहन

नवी मुंबई: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत ‘स्वराज्य महोत्सव’ साजरा करण्यात येत असून यामध्ये महानगरपालिकेच्या विविध विभागांनी लोकसहभागातून निरनिराळे देशभक्तीपर उपक्रम राबवावेत. त्याचप्रमाणे 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत “घरोघरी तिरंगा (हर घर तिरंगा)” उपक्रमात प्रत्येक नागरिकाने स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन आपल्या घरावर तिरंगा फडकावावा यादृष्टीने मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी व नागरिकांना प्रोत्साहित करावे असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्व विभागप्रमुख व विभाग अधिकारी यांना “घरोघरी तिरंगा (हर घर तिरंगा)” उपक्रमाच्या आढावा बैठकी प्रसंगी दिले.

“घरोघरी तिरंगा” उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सक्रीय सहभाग अपेक्षित असून शहरातील प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर तसेच सर्व शासकीय, निमशासकीय, सहकारी संस्था, शाळा, महाविद्यालये तसेच विविध प्रकारच्या खाजगी आस्थापना यांनी 13 ते 15 ऑगस्ट या तीन दिवशी स्वत:हून पुढाकार घेऊन राष्ट्रध्वज फडकवायचा आहे. यादृष्टीने महानगरपालिका क्षेत्रातील विविध सोसायट्या, वसाहती यांनी स्वेच्छेने झेंडे उपलब्ध करून घेऊन फडकविण्याचे विभाग कार्यालयांमार्फत आवाहन करण्यात यावे व त्यांच्यामार्फत याची अंमलबजावणी होईल अशी खातरजमा करून घेण्याचेही आयुक्तांनी निर्देश दिले.

“घरोघरी तिरंगा” उपक्रमात नागरिकांनी राष्ट्रध्वज स्वेच्छेने विकत घेऊन फडकविणे अपेक्षित असून ज्या नागरिकांना राष्ट्रध्वज विकत घेणे शक्य नाही अशा नागरिकांना महानगरपालिकेमार्फत राष्ट्रध्वज पुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात यावी असे निर्देश आयुक्तांमार्फत देण्यात आले.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना वितरित करण्यासाठी सीएसआर निधीच्या माध्यमातून विविध स्वयंसेवी संस्था, उद्योग समुह, व्यक्ती यांच्याकडून तिरंगा राष्ट्रध्वज उपलब्ध करून घेण्यात येत असून त्याचे वितरण विभाग कार्यालयामार्फत केले जाणार आहे. राष्ट्रध्वज वितरण करताना त्याचे विभागनिहाय सूक्ष्म नियोजन (Micro Planning) करण्यात यावे असे सूचित करतानाच राष्ट्रध्वजाचा ध्वजसंहितेनुसार यथोचित सन्मान राखला जाईल याची वितरण कार्यवाहीमध्ये काटेकोर दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

यापूर्वी ध्वजसंहितेनुसार सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत राष्ट्रध्वज फडकविण्यात येत होता. या नियमात केंद्र सरकारने बदल करीत आता दिवसरात्र म्हणजेच 24 तास तिरंगा फडकविण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे खादीसह पॉलिस्टर, वूल, स्पन, लोकर यापासून राष्ट्रध्वज बनविला जाऊ शकतो याचीही माहिती नागरिकांमध्ये पोहचवावी अशा सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.

‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमांतर्गत नागरिक 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत आपले घर, कार्यालय याठिकाणी ध्वज फडकवू शकतात. त्याचप्रमाणे स्वत: हे ध्वज खरेदी करुन एकमेकांना भेटही देऊ शकतात. तसेच विविध उदयोग, संस्था या त्यांच्या सीएसआर निधीतूनही नागरिकांना ध्वज उपलब्ध करुन देऊ शकतात.

याशिवाय नागरिक भारतीय राष्ट्रध्वजाविषयी आपला आदर व प्रेम प्रकट करण्यासाठी राष्ट्रध्वजासोबत सेल्फी काढून पोस्ट करू शकतात, तसेच समाज माध्यमांवरून डिजीटल राष्ट्रध्वज एकमेकांना भेट म्हणून पाठवू शकतात. आपल्या पोषाखावर मेटल ध्वज परिधान करून आपले देशप्रेम व्यक्त करण्याची संधीही नागरिकांना उपलब्ध आहे. अशा विविध बाबींवर भाष्य करत आयुक्तांनी याबाबतची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी विविध माध्यमांचा प्रभावी वापर करावा असे निर्देश दिले.

त्याचप्रमाणे 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “स्वराज्य महोत्सव” साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत 14 ऑगस्ट रोजी ज्याप्रमाणे महानगरपालिकेच्या क्रीडा विभागामार्फत पोलीसांसह ‘अमृत महोत्सव रन’ आयोजित केली जात आहे त्याच धर्तीवर महानगरपालिकेतील विविध विभागांनी वेगवेगळ्या स्वरुपाच्या कार्यक्रमांचे आयोजन करावे असेही आयुक्तांनी निर्देशित केले.

विद्यार्थ्यांच्या मनात लहानपणापासूनच देशाविषयीचे प्रेम व आदर वाढीस लागावा यादृष्टीने शालेय स्तरावर प्रभात फे-यांचे आयोजन करण्यात यावे तसेच महिला व ज्येष्ठ नागरिक यांचाही विविध उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग घ्यावा अशा सूचना आयुक्तांनी केल्या.

प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनात असलेले आपल्या देशाविषयीचे प्रेम अभिव्यक्त करण्यासाठी “घरोघरी तिरंगा” उपक्रम हे अत्यंत चांगले माध्यम असून 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक नागरिकाने आपले घर व कार्यालय याठिकाणी तिरंगा राष्ट्रध्वज ध्वजसंहितेनुसार योग्य सन्मान राखून फडकवावा. याशिवाय पोषाखावर मेटल ध्वज परिधान करून, तिरंग्यासोबतचा सेल्फी सोशल माध्यमांवर अपलोड करून, तिरंग्याची फ्रेम वा डिजीटल तिरंगा एकमेकांना भेट देऊन अशा विविध प्रकारे राष्ट्राभिमान प्रदर्शित करावा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आमदार महेश बालदी यांची यशस्वी मध्यस्थी जेएनपीएतील कंत्राटी कामगारांच्या पगारवाढीला मंजुरी