सुनिल कुरकुटे यांच्या प्रयत्नांना अखेर यश 

रेल्वे प्रवाशांकडून विशेष आभार 

नवी मुंबई : माजी नवी मुंबई महापालिका 'ड' प्रभाग समिती सदस्य सुनिल कुरकुटे यांच्या अथक प्रयत्नांनी सानपाडा रेल्वे स्थानकात पूर्वेकडे रेल्वे प्रशासनाने ११ जुलै पासून तिकीट खिडकी सुरु केली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांनी सुनिल कुरकुटे यांचे विशेष आभार मानले आहेत.

सानपाडा रेल्वे स्थानकात पूर्वेकडे तिकीट खिडकी सुरु करण्यासंदर्भात सुनिल कुरकुटे यांनी ७ जुलै २०२० रोजी सानपाडा रेल्वे स्टेशन प्रबंधकांना लेखी पत्र दिले होते. यापूर्वी सानपाडा रेल्वे स्थानकात फक्त एकाच बाजूला म्हणजे पश्चिमेकडे तिकीट खिडकी सुरु होती . रेल्वेचा प्रवास जलद आणि स्वस्त असल्याने पश्चिमेकडील खिडकीवर तिकीट काढण्यासाठी प्रवाशांची मोठी झुंबड उडत होती. एकाच बाजूला तिकीट खिडकी सुरु असल्याने प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी तासंतास रांगेत उभे रहावे लागत होते. त्यामुळे प्रवाशांचा वेळ फुकट वाया जात असल्याने प्रवाशांनी सुनिल कुरकुटे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यातच सध्या सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत होते. त्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन सानपाडा रेल्वे स्थानकातील पूर्वेकडील बंदटं असलेली तिकीट खिडकी तात्काळ सुरु करुन  प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी सुनिल कुरकुटे यांनी रेल्वे प्रशासनाला पत्राद्वारे केली होती. मागणी मान्य न झाल्यास स्थानिक रेल्वे प्रवाशांना सोबत घेऊन रेल्वे प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुनिल कुरकुटे यांनी रेल्वे प्रशासनाला पत्रातून दिला होता. अखेर रेल्वे प्रशासनाने सुनिल कुरकुटे यांच्या पत्राची दखल घेऊन सानपाडा रेल्वे स्थानकात पूर्वेकडे तिकीट खिडकी सुरु केली आहे.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खड्ड्यांची तात्पुरती मलमपट्टी ठरतेय कुचकामी ?