खड्ड्यांची तात्पुरती मलमपट्टी ठरतेय कुचकामी ?

नवी मुंबई : महापालिका क्षेत्रातील पावसात पडलेल्या खड्ड्यांची खड्डेभरणीची कामे प्रशासनाने  केली होती. मात्र गेल्या तीन चार दिवसांपासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील खड्डे पुन्हा उखडल्याचे दिसून येत आहे. काही भागांत रस्त्यांवर नवीन खड्डे पडले आहेत. या खड्डय़ांच्या प्रवासामुळे वाहनचालक, प्रवासी हैराण झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने  केलेली खड्ड्यांची तात्पुरती मलम पट्टी कुचकामी ठरत असल्याचे चित्र शहरभर दिसत आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये जुलै  महिन्याच्या सुरुवातीला मोठय़ा प्रमाणात पाऊस पडला आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले होते आणि या खड्ड्यांची मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून याची गंभीर दखल घेत सदर खड्डे तात्काळ भरण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते.

त्यानुसार महापालिकेच्या स्थापत्य विभागाने प्रभाग निहाय रस्त्यांवरील खड्डय़ांचे सर्वेक्षणाचे काम हाती  घेत खड्डे भरले होते. हे खड्डे भरताना पेव्हर ब्लॉक आणि  डांबरी खडीचा उपयोग करत तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली होती. परंतु गेल्या  तीन चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बुजविलेले खड्डे पुन्हा उखडले असून काही रस्त्यांवर नवीन खड्डे पडले आहेत. त्यामुळे मनपाच्या वतीने खड्डे बुजविण्यासाठी करण्यात आलेली तात्पुरती मलमपट्टी कुचकामी ठरत असल्याचे मत वाहन चालक व्यक्त करत आहेत.

------------------------------------------------

नवी मुंबई शहरात ठाणे बेलापुर मार्गावर एम एम आर डी ए मार्फत दोन उड्डाण पुल  बनवण्यात आले आहे. मात्र या दोन्ही उड्डाणपुलांवर सध्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. तर सायन पनवेल महामार्गावरील एल पी उड्डाणपूलावर देखील मोठे खड्डे पडले असल्याने या ठिकाणी अपघाताची शक्यता बळावली आहे. त्यामुळे हे खड्डे  बुजविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

----------------------------------------------------

दर पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडत असतात. हे मनपा प्रशासनाला माहित असते. त्यामुळे पावसाळा आधी रस्त्यांचे डांबरीकरण करताना जर दर्जात्मक काम केले गेले तर असे खड्डे पडणार नाहीत. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या कामाच्या दर्जावर संशय निर्माण होतो.

बाळासाहेब शिंदे,

प्रदेश उपाध्यक्ष, मनसे सहकार सेना.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वायरमन व लाईनमनची रिक्त पदे तातडीने भरा - आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी