आज सिडकोला घेराव ; धडक माेर्चा

पनवेल: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे तसेच प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत,  यासाठी दिबासाहेबांच्या स्मृतिदिनी आज शुक्रवार दिनांक २४ जून रोजी सकाळी १०.३० वाजता सिडको विरोधात घेराव आंदोलन करून सिडकोला धडक देण्यात येणार आहे.  या आंदोलनात लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते,  तसेच किमान २५ हजार भूमिपुत्र सहभागी होणार आहेत. 

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यांतील प्रकल्पग्रस्त भूमिपूत्रांनी मागील वर्षी १० जूनला भव्य साखळी आंदोलन, २४ जूनला ऐतिहासिक सिडको घेराव आंदोलन, ९ ऑगस्ट क्रांतिदिनी मशाल मोर्चा, १७ मार्च भुमिपुत्र परिषद, सिडको वर्धापन दिनाचा काळादिन आंदोलन, २४ जानेवारीचे विमानतळ काम बंद आंदोलन अशी भव्य आंदोलने केली. पण सिडको आणि महाराष्ट्र सरकार प्रकल्पग्रस्त भूमिपूत्रांच्या या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आल्याने भूमिपूत्रांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. मागील २४ जुनच्या सिडको घेराव आंदोलनात सिडकोकडे विमानतळाच्या पूर्वीचा नामकरणाचा ठराव विखंडित करून लोकनेते दि.बा.पाटील यांच्या नावाचा ठराव करावा असे निवेदन दिले होते मात्र वर्ष उलटले तरी त्यावर सिडको अथवा शासनाने कोणताही निर्णय केलेला नाही. सुदैवाने भूमिपुत्रांच्या एकीमुळे बाळासाहेबांच्या नावाचा ठराव अद्याप मंत्री मंडळाच्या बैठकीत अथवा विधानसभेत आणला गेला नाही. सिडको आणि त्या अनुषंगाने राज्य सरकारने नवी मुंबई वसवताना सरकारने रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण आणि ठाणे जिल्ह्यातील बेलापूर पट्टीतील ९५ गावातील ६५ हजार शेतकर्यांच्या कुटुंबाच्या पिकत्या जमिनी कवडीमोल भावाने संपादीत केल्या आणि आज त्यावर सिडकोने हजारो कोटी कमवले आहेत. पण १०० टक्के भूमिहीन केलेल्या प्रकल्पग्रस्तांना काही द्यायचे झाले की, सिडको उदासिन दिसते. म्हणूनच प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या अनेक मागण्या आजही प्रलंबित असल्याचे दिसत आहे. प्रकल्पग्रस्तांचे शिक्षण, नोकरी, साडेबारा टक्के भूखंड, गरजेपोटी बांधलेली बांधकामे, गावठाण विस्तार, विमानतळबाधीत २७ गावाच्या समस्या, नैना प्रकल्पाच्या समस्या असे अनेक प्रश्न सिडकोच्या उदासिन वृत्तीमुळे प्रलंबित आहेत. यापूर्वी सिडकोत अनेक ठराव होऊनही प्रकल्पग्रस्तांचे गरजेपोटीची बांधकामे नियमित केली जात नाहीत. यासाठी नुकताच केलेल्या शासन निर्णयात २५० मीटरचे निकष, भाडेपट्टा अश्या अनेक त्रुटी असल्याच्या तक्रारी आहेत. सिडकोच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी व मागण्या मान्य करून घेण्यासाठी सीबीडी बेलापूर येथील सिडको भवनावर घेराव आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनात भूमिपुत्रांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने करण्यात आले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एक वर्षापासून बेलापूर किल्ला संवर्धनाचे काम ठप्प