औद्योगिक वसाहतीतील आग विझवणारे हात अपुरे

नवी मुंबई -: नवी मुंबईतील कळवा ते नेरूळ अशा ५३९ .२५ हेक्टर वर औद्योगिक वसाहत वसली असून यात सुमारे तीन हजार उद्योग आहेत आणि परिसरात  मोठ्या प्रमाणात  आगीच्या घटना घडत आहेत. मात्र अशी आपत्तीजनकस्थिती हाताळण्यासाठी लागणारे मनुष्य बळ एम आय डी सी अग्निशमन  दलाकडे अपुरे असून अवघ्या ४८ कर्मचाऱ्यांवर संपूर्ण औद्योगिक वसाहतीची मदार आहे.त्यामुळे आजही या भागात आगीची घटना घडल्यास बाहेरील अग्निशमन दलाची मदत घ्यावी लागत आहे.

एमआयडीसी भागात मोठ्या प्रमाणात उद्योग धंदे सुरू असून यामध्ये रासायनिक कंपन्या देखील मोठ्या संख्येनं आहे आणि या भागात काही आगीची घटना घडल्यास त्यावर नियंत्रण मिळावे म्हणून एम आय.डी.सी ने औद्योगिक वसाहती करीता तुर्भे ,पावणे आणि रबाळे अशा तीन अग्निशमन दलाची उभारणी केली आहे. मात्र अग्निशमन केंद्र उभारल्या नंतर या आपत्कालीन परिस्थिती हाताळणी करण्यासाठी पुरेसे मनुष्य बळ  तैनात करण्याची गरज असताना आजही या ठिकाणी अपुऱ्या मनुष्य बळावर गाडा हाकला जात आहे. याठिकाणी ९० ते १०० कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना तिन्ही केंद्रात अवघे ४८ कर्मचारी तैनात आहेत. यात तुर्भे १४, पावणे १७ आणि रबाळे येथे १७ कर्मचारी कार्यरत आहेत. याठिकाणी एकूण ९ वाहने उपलब्ध आहेत मात्र त्यासाठी लागणारे मनुष्यबळ मात्र अल्प आहे. प्रत्येकी वाहनावर ६ कर्मचारी असणे गरजेचे आहे तसेच वाहनचालकांची सुद्धा कमतरता आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना आठ तासाच्या पाळी ऐवजी सोळा  तासांची पाळी करावी लागत आहे त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर देखील कामाचा मोठा ताण पडत आहे. मागील महिन्यात खैरणे केमिकल कंपनीला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल चार दिवस लागले होते आणि त्यानंतर  ही आग आणखी तीन दिवस धुमसत होती आणि यासाठी इतर सात ते आठ अग्निशमन दलाची मदत घेण्याची नामुष्की ओढविली होती.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पावसाळी कालावधीत विभागवार विशिष्ट संकल्पनेनुसार 40 हजार वृक्षारोपणाचे नियोजन