नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासह इतर मागण्या सोडविण्याची मागणी

नवी मुंबई ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा लढा अधिक तीव्र झाला आहे. नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दिबांचे नाव द्यावे यासाठी २४ जून रोजी दि. बा. पाटील यांच्या १० व्या स्मृतिदिनी पुनःश्च एकदा नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ नामकरणासह शासन आणि प्राधिकरणातील ज्वलंत तसेच प्रलंबित हक्कांच्या मागण्यांसाठी हजारो भूमीपुत्र, शहरवासीय आणि झोपडपट्टीवासीय एकत्रितरित्या राज्य शासनाच्या विरोधात शांततेच्या मार्गाने ‘सिडको'विरोधात आंदोलन छेडले.

दरम्यान, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे तसेच प्रकल्पग्रस्तांचे अन्य प्रलंबित प्रश्न सोडवावे यासाठी २४ जून रोजी सिडकोला घ्ोराव आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्यानुसार मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, आदि चार जिल्ह्यातील हजारो भूमीपुत्रांनी उपस्थिती दर्शवून शक्ती प्रदर्शन केले. दरम्यान, जोपर्यत नवी मुंबई विमानतळाला दि .बा. पाटील यांचे नाव मिळत नाही तोपर्यत आंदोलन सुरुच राहील, असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

नवी मुंबईतील स्थानिक कष्टकरी, शेतकरी यांच्या अस्मितेसाठी शासनाने ‘दिबां'ची कर्मभूमी असलेल्या भूमीवर साकारत असलेल्या विमानतळाला ‘दिबां'चेच नाव द्यावे, अशी आंदोलनकर्त्या भूमीपुत्रांची आग्रही मागणी आहे. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे या मागणीसाठी मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, आदि जिल्ह्यांमधील प्रकल्पग्रस्त भूमीपुत्रांनी मागील वर्षी १० जून रोजी भव्य साखळी आंदोलन, २४ जून रोजी ऐतिहासिक सिडको घ्ोराव आंदोलन, ९ ऑगस्ट क्रांतिदिनी मशाल मोर्चा, १७ मार्च रोजी भूमीपुत्र परिषद, सिडको वर्धापन दिनी काळादिन आंदोलन, २४ जानेवारीला विमानतळ काम बंद आंदोलन अशी भव्य आंदोलने केली. पण, सिडको आणि महाराष्ट्र सरकार प्रकल्पग्रस्त भूमीपुत्रांच्या या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आल्याने भूमीपुत्रांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. गतवर्षी २४ जून रोजीच्या सिडको घ्ोराव आंदोलनात ‘सिडको'कडे विमानतळ नामकरणाचा पूर्वीचा ठराव विखंडीत करुन लोकनेते दि. बा.पाटील यांच्या नावाचा ठराव करावा, असे निवेदन दिले होते. मात्र वर्ष उलटले तरी त्यावर सिडको अथवा शासनाने कोणताही निर्णय केलेला नाही. सुदैवाने भूमीपुत्रांच्या एकीमुळे बाळासाहेबांच्या नावाचा ठराव अद्याप मंत्री मंडळ बैठकीत अथवा विधानसभेत आणला गेलेला नाही. सिडको आणि त्या अनुषंगाने राज्य सरकारने नवी मुंबई वसवताना रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण आणि ठाणे जिल्ह्यातील बेलापूर पट्टीतील ९५ गावातील ६५ हजार शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या पिकत्या जमिनी कवडीमोल भावाने संपादित केल्या आणि आज त्यावर ‘सिडको'ने हजारो कोटी कमवले आहेत. पण, १०० टक्के भूमीहिन केलेल्या प्रकल्पग्रस्तांना काही द्यायला ‘सिडको'ची उदासिन भूमिका असते. म्हणूनच प्रकल्पग्रस्त भूमीपुत्रांच्या अनेक मागण्या आजही प्रलंबित असल्याचे दिसत आहे. प्रकल्पग्रस्तांचे शिक्षण, नोकरी, साडेबारा टक्के भूखंड, गरजेपोटी बांधलेली बांधकामे, गावठाण विस्तार, विमानतळबाधीत २७ गावांच्या समस्या, नैना प्रकल्पाच्या समस्या असे अनेक प्रश्न ‘सिडको'च्या उदासिन वृत्तीमुळे प्रलंबित आहेत. यापूर्वी ‘सिडको'त अनेक ठराव होऊनही प्रकल्पग्रस्तांचे गरजेपोटीची बांधकामे नियमित केली जात नाहीत. यासाठी नुकत्याच केलेल्या शासन निर्णयात २५० मीटरचे निकष, भाडेपट्टा अशा अनेक त्रुटी असल्याच्या तक्रारी आहेत. ‘सिडको'च्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी तसेच प्रलंबित मागण्या मान्य करुन घ्ोण्यासाठी सीबीडी-बेलापूर येथील सिडको भवनवर २४ जून रोजी  घेराव आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाप्रसंगी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचेे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार रामशेठ  ठाकूर, आ. गणेश नाईक, आ. मंदाताई म्हात्रे, आ.प्रशांत  ठाकूर, माजी खासदार संजीव नाईक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, महापौर डॉ. कविता चौतमोल, दशरथ भगत, डॉ. राजेश पाटील, मनोहर पाटील, जगदीश गायकवाड, जयवंत सुतार, रामचंद्र घरत यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी आणि हजारोच्या संख्येने भूमीपुत्र उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

गणपतीसाठी २५ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान एसटीच्या जादा गाड्या