खारघर परिसरात दुर्गंधी; रोगराईला निमंत्रण

खारघर सेक्टर-४ मधील रस्त्यावर सांडपाणी

खारघर : खारघर सेक्टर-४ परिसरात रस्त्यावर वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे दुर्गंधी पसरली असून, हिवताप आणि डेंग्यू आजाराच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. दरम्यान, पनवेल महापालिका प्रशासनाने रस्त्यावर वाहणाऱ्या सांडपाण्याची योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी ‘बेलपाडा अष्टविनायक व्यापारी संघ'चे अध्यक्ष प्रभाकर घरत यांनी महापालिका प्रशासनाकडे पत्राद्वारे केली आहे.  

श्रीगणेशोत्सवात खारघर सेक्टर-४ मधील एस. एन. पार्क ते बालाजी अंगण सोसायटी परिसरात गटारातील सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्यामुळे रहिवाशांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावर वाहणारे सांडपाणी आणि रस्त्यावर पडलेल्या खड्डयांमुळे किरकोळ अपघाताच्या घटनेत वाढ झाली असून, वयोवृध्द आणि लहान मुले-मुलींना रस्ता ओलांडताना अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. याशिवाय रस्त्यावर वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे खारघर सेवटर-४ परिसरात हिवताप आणि डेंग्यू रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. पुढील काही दिवसात नवरात्रौत्सव सुरु होणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने नवरात्रौत्सव पूर्वी रस्त्यावर वाहणाऱ्या सांडपाण्याची समस्या दूर करावी तसेच खारघर सेवटर-४ परिसरातील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात यावे, अशी मागणी ‘बेलपाडा अष्टविनायक व्यापारी संघ'चे अध्यक्ष प्रभाकर घरत यांनी महापालिका प्रशासनाला दिलेल्या पत्रामध्ये केली आहे.

Read Previous

पालिका कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक समस्या सोडविण्याची मागणी

Read Next

प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांतून १ लाख ६५ हजार रुपये दंडवसूली