जागतिकीकरण आणि मराठी भाषा

भाषेला सार्वभौमत्व केव्हा प्राप्त होऊ शकते याबाबत जर विचार केला तर प्रत्येकापर्यंत भाषेला पोहचविणारे साधन म्हणजे विज्ञान. तसेच विज्ञान लेखन जर मराठी भाषेतून केले व ते तसे शिकविले गेले तरच त्या भाषेला टिकता येईल. कारण साहित्याचा अभ्यास करण्यापेक्षा विज्ञानाचा अभ्यास करणारे लोक खूप जास्त आहेत. मराठी भाषा ही नोकरीचे माध्यम बनली पाहिजे. घरात बोलताना मराठी भाषेतूनच बोलावे आणि प्रत्येकाने अभिमान बाळगावा.

जागतिकीकरण ही संकल्पना २० व्या शतकाच्या शेवट आणि २१ व्याशतकातील बहुचर्चित असा विषय आहे. ”भांडवल, सेवा, वस्तू आणि मजुराचे श्रमतसेच ज्ञान, विचार, संस्कृतीच्या जागतिक आदान प्रदानाची प्रक्रिया म्हणजेच जागतिकीकरण होय.” जागतिकीकरण ही संकल्पना संपूर्ण विश्वाला व्यापून टाकणा-या आर्थिक, दळणवळण, रोजगार, वाणिज्य, तंत्रज्ञान, समाजव्यवस्था, संस्कृती याबरोबरच साहित्यक्षेत्राशी देखील निगडीत आहे. जागतिकीकरणाचे चित्रणकरणारे साहित्य १९९० नंतर निर्माण झाल्याचे दिसून येते. बदल हा समाजाचा स्थायीभाव आहे. सामाजिक स्थित्यंतरांचा वेद साहित्यकृती घेत असतात.जागतिकीकरणाने मानवी जीवन व्यापले आहे. यास अनुसरुन गॅट करार, मॅट करार यावर आधारीत चित्रण करणा-या काव्य रचना तसेच परखडपणे लेखन मोठ्याप्रमाणावर झाले आहे. हेमंत दिवटे, सुनिल अवचर, सचिन केतकर, प्रज्ञा पवार, ऐश्वर्या पाटेकर, निलम मानगावे अशा एक नाही अनेक तत्कालीन साहित्यिकांनी आशयसमृद्ध व अभिव्यक्तसंपन्न असे काळाचे संदर्भ देऊन साहित्य निर्माण केले. यामध्ये हुंडाबळी, नोकरी करणा-या स्त्रिया, दहशतवाद, महानगरातील कोलाहल,मुंबईतील एकाकीपणाचे जीवन, स्त्री-भ्रूण हत्या अशा अनेक बाबींचे चित्रीकरण त्यांच्या साहित्यातून झाले आहे. जागतिकीकरण ही एक सर्वव्यापी चळवळ असून, अविरत चालणारी प्रक्रिया आहे. आपल्या सृजनशीलतेला आणि नवनविन उपक्रम करण्याच्या विचारांना वाव देण्याच्या हेतूने प्रसारमाध्यमांद्वारे जगाला जवळ आणले आहे. यामुळे जागतिक पातळीवरील ज्ञान, माहिती, व संस्कृती यांचे मोठ्या प्रमाणावर आदानप्रदान होऊ लागले.जागतिकीकरणात टिकण्यासाठी मराठीच्या अडचणी दूर केल्या पाहिजेत.

इतर भाषांची अतिक्रमणे परतवून यासंदर्भातील शासनाची भूमिका ठाम असली पाहिजे. मराठीसह अनेक भाषांची जननी, मूलाधार असणा-या व तज्ञांच्या मते संगणकास सव्रााधिक जवळची असणा-या संस्कृत भाषेकडे आपले दुर्लक्ष होत आहे. केवळ ”गुण मिळविण्याची भाषा” म्हणून आपण तिच्याकडे न पाहता अभ्यास म्हणून सखोलपणाने पाहिले तर मराठी साहित्यशास्त्र इत्यादीवरील प्रभुत्वासह इतरअनेक भाषाभ्यास जे जागतिकीकरणात आवश्यक आहेत ते सुलभ होतील. मराठीच्या अभ्यासक्रमात केवळ पारंपारिक विषय असून चालणार नाहीत तर बदलत्या काळाची आव्हाने स्विकारणे क्रमप्राप्त आहे. उदाहरणार्थ मराठीचे प्रमाणलेखन मुद्रितशोधन व संपादन, भाषा व्यवहार व भाषिक कौशल्ये, मराठी व्याकरण, विज्ञानसाहित्य, प्रसार माध्यमे समकालीन भाषांतरीत भारतीय साहित्य संवादकौशल्ये, कोशवाड्‌मय व कोष निर्मिती, क्रिडा समालोचन व तत्संबंधी लेखन, संगीत महोत्सव संचालन, संयोजन, जाहिरात लेखन, प्रमाणभाषा व बोली, मराठी शुध्दलेखन यासारखे अनेक विषय विद्यापीठांना, शाळा-महाविद्यालयांना अभ्यासक्रमात समाविष्ठ करता येतील. यामध्ये अल्प व दीर्घ मुदतीचे अभ्यासक्रम सुरु झाले पाहिजेत. मराठीच्या विद्यार्थ्यांना जाहिरात कंपन्या, आकाशवाणी, दूरदर्शन, वृत्तपत्रे, नियतकालिके इत्यादी तसेच प्रसारमाध्यमे, विविध भाषांतर संस्था/केंद्रे, प्रकाशन संस्था, पर्यटन संस्था, पर्यावरण संस्था, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन-निवेदन, मुलाखती घेणे, स्मरणिका संपादन, संवाद लेखन, शब्दांकन, बालकांसाठी व प्रौढांसाठी लेखन, शासनाच्या विविध योजनांबद्दल लेखन-सादरीकरण इत्यादीमधून युवा-युवतींना रोजगार आणि करीयरच्या संधी उपलब्ध होऊन अर्थार्जन होईल.

मराठी भाषा ही संवादाची भाषा असून, ती ज्ञान भाषा होणे पर्यंतचा संवादआणि संवाद साधण्याचा प्रपंच मोठ्या प्रमाणावर झाला आहे. मराठी भाषेची उज्ज्वल परंपरा असून त्यात टप्याटप्याने होणाऱ्या बदलांचे आपण साक्षीदार आहोत. अश्मयुग, लोहयुग, ताम्रयुग, विज्ञान युग यानंतर संगणक युग तसेच तंत्रज्ञानाची दिवसागणीक प्रगती पाहता मराठी भाषा संवर्धनात तंत्रस्नेहींचे योगदान मोठ्याप्रमाणावर असल्याचे दिसून येते. सन १९९९ मध्ये युनेस्कोने २१ वफेब्रुवारी हा दिवसजागतिक मायभाषा दिन म्हणून साजरा करावा अशाप्रकारे संपुर्ण जगतास आव्हान केले होते.

२७ फेब्रुवारी हा दिवस ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आदरणीय साहित्य सुर्य विष्णू ृवामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिवस म्हणून सर्वत्र साजरा करणेबाबत महाराष्ट्र शासनाने परिपत्रक जारी केले. मराठी भाषा समृध्द होणेसाठी, अधिकाधिक दालने विकसीत व्हावीत यासाठी हा दिवस मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. ही बाब केवळ या दिवसापुरतीच सिमीत न राहता त्यास व्यापक स्वरुप देणे गरजेचे आहे. मग मराठी भाषा संवर्धन करण्याची वेळ का आली यावर विचारमंथन होणे गरजेचे आहे. मराठी भाषा अनेक भाषांचे आक्रमण पचवत आज या टप्प्यावर येऊन उभी राहिली असून ती केवळ राजभाषाच नव्हे; तर ती ज्ञानभाषा होणे गरजेचे आहे. जोपर्यंत मराठी भाषा अर्थकारण, समाजकारण, व्यावसायिकरणात अवलंबली जात नाही तसेच अन्य प्रसारमाध्यमात वापरली, शिकवली जात नाही तोवर मराठी भाषा ज्ञानभाषा होऊ शकत नाही. जगातील अनेक देशांमध्ये मराठी भाषिक वास्तव्यास असून तेथे मराठी मंडळे मोठ्या प्रमाणावर काय्रान्वित आहेत. त्यामुळे मराठीचे जागतिकीकरण होणे सहजशक्य आहे. मराठी राजभाषा दिवस यासाठी प्रेरणा दिवस म्हणून गणला जावा असे वाटते. कारण देवगिरी यादवांच्या काळात मराठीचा वापर होत असल्याचे शिलालेख आणि अन्य दस्तऐवज आढळून आले आहेत. संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानात, संत तुकाराम यांच्यासारख्या संतांच्या अभंगवाणीतुन मराठी भाषेला गौरवशाली आणि वैभवसंपन्न तसेच सामर्थ्यवान परंपरा लाभल्याचे दिसून येते.

दर बारा मैलांनी भाषेचा लहेजा बदलत असतो. महाराष्ट्रातील जिल्हापरिषदेच्या काही शाळांनी प्रत्येक विद्यार्थ्याला आपापल्या सभोवतालच्या परिसरातील सांस्कृतिक, पारंपारिक, रुढी-परंपरा, रितीरीवाज, कुळधर्म कुलाचार या संदर्भात माहिती लिहिणेबाबतचा उपक्रम सुरु केला आणि त्याचे संकलन केले. अशा बाबी विकीपिडीयाद्वारे शब्दबध्द केल्या तर भाषा समृध्द होईल. यातुन मराठीतील विविध बोली भाषा आणि एका शब्दाचे विविध संदर्भ निदर्शनास आले. मराठी भाषेला विविधांगी आयाम कशाप्रकारे आहेत ही बाब समोर आली.भारतातील एकूण बोलल्या जाणाऱ्या भाषात मराठीचा तिसरा क्रमांक लागतो.महाराष्ट्रात ७० टक्के लोक मराठी तर ३० टक्के लोक हिंदी बोलतात. त्याचप्रमाणे भारतात ८५०स्वतंत्र भाषा आहेत तर १३५९ इतक्या बोली भाषा आहेत. जर बोलीभाषा जगल्या तर भाषा जगू शकते आणि वेगवेगळ्या क्षेत्रातभाषा प्रवाही होऊ शकते.

सन १९४२ मध्ये ब्रिटन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनद्वारे रेडीओवर मराठीतून वृत्तनिवेदन झाले आहे. मराठी भाषेतील शब्द ज्या पध्दतीने उच्चारले जातील त्यापध्दतीने त्याचे अर्थ समोर येतील. म्हणूनच कुसुमाग्रज म्हणतात की, ”माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शीळा.” कारण भाषेचे वैविध्यतेचे रुप ल्यायलेली आहे, तीला आयाम देण्याची गरजआहे. ज्यावेळी ”सैराट” सारखा चित्रपट साता समुद्रापलिकडे दाखवला जातो.त्यावेळी सातासमुद्रापलिकडील माणूस विचारतो की सैराट म्हणजे काय, म्हणून या वैभवसंपन्नतेकडे कानाडोळा करुन चालणार नाही. यासाठी मराठी भाषेबाबतचा न्यूनगंड बाजूला सारला तर जागतिकीकरणासाठी आणि ज्ञानभाषा होण्याइतके सामर्थ्य या भाषेस प्राप्त होईल. मराठी भाषा बलवत्तरतेकडून कमकुवततेकडे वळली आणि जी भाषा शिक्षणाची माध्यम भाषा म्हणून टिकू शकत नसेल तर ती ज्ञान भाषा कशी होईल आणि जागतिकीकरणात सुरक्षित कशी राहील. यासाठी आपल्या भाषेविषयीचे आपले प्रेम कायम असते. फक्त भावनिक, प्रतिकात्मक पातळीवर राहते. सिमोल्लंघन करुन महाराष्ट्रात आलेल्या लोकांनी इथली भाषा मराठीच म्हणून व्यवहारात वापरली पाहिजे असा आग्रह राजकारण्यांनी धरुन झाला. यातुन मराठी भाषेची जी परवड झाली आहे त्याला भाषा जबाबदार नसते तर भाषक जबाबदार असतात. आपल्यापैकी अनेकांना महत्वाच्या व्यवहार क्षेत्रात मराठी भाषा वापरण्याचा संकोच वाटतो. अभिजन वर्गाने मराठीकडे दुर्लक्ष केले आहे आणि बहुजन वर्गही त्या वाटेने मार्गस्थ होताना दिसत आहे. मराठी माणूस जगभर पोहचला आहे; पण मराठी भाषा मात्र पोहचविली जात नाही. विस्तारला फक्त त्याचा व्यवसाय आणि त्याचे पद.  त्यातील काही भारतीय इंग्लड, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी इत्यादी देशातुन आपला पेशा सांभाळून आपल्या राज्यातील प्रकाशकांसाठी स्वतंत्र लेखन अथवा अनुवादकीय काम करतात. परंतु साहित्यकृती तिकडे नेण्याचे औदार्य दाखवत नाहीत. मराठी भाषेला व्यवहार भाषा, आविष्कार भाषा म्हणूनस्थान देणे गरजेचे आहे. अन्य देशात आपल्या मातृभाषेला अशा प्रकारे स्थान दिले जाते. मानवी समाजात भाषा प्रमाण व बोली या प्रकारात बोलली जाते. बोलीभाषेतील जो सर्वत्र परिचयाचा होतो तेव्हा तो प्रमाण भाषेत येतो. मराठी भाषेला समृध्द करण्यात संत, पंत आणि तंत यांचे योगदान मोठे आहे. तसेच महाराष्ट्रातील साहित्यिकांचा जसा मोलाचा वाटा आहे, तसाच सर्वसामान्यांचा देखील आहे. जागतिकीकरणात मराठी भाषा ताठ मानेने कायम उभी राहील, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे.

 कविवर्य सुरेश भट यांच्या शब्दात ”लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी, धर्म, पंथ, जातएक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी.”मराठी भाषेला जागतिक स्तरावर नेण्यासाठी आणि विश्वभाषेचा दर्जा मिळावा यासाठी मराठी भाषिकांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे जरी असले तरी भाषेला सार्वभौमत्व केव्हा प्राप्त होऊ शकते याबाबत जर विचार केला तर प्रत्येकापर्यंत भाषेला पोहचविणारे साधन म्हणजे विज्ञान. तसेच विज्ञान लेखन जर मराठी भाषेतून केले व ते तसे शिकविले गेले तरच त्या भाषेला टिकता येईल. कारण साहित्याचा अभ्यास करण्यापेक्षा विज्ञानाचा अभ्यास करणारे लोक खूप जास्त आहेत. मराठी भाषा ही नोकरीचे माध्यम बनली पाहिजे. घरात बोलताना मराठी भाषेतूनच बोलावे आणि प्रत्येकाने अभिमान बाळगावा. कॉम्प्युटरची भाषा मराठी असावी. त्याचप्रमाणे आपल्या भाषेला कमी लेखता कामा नये. तिच्याविषयीचा न्यूनगंड बाळगता कामा नये. इतर भाषेतील साहित्य मराठीत ज्याप्रमाणे येत आहेत सेच मराठी साहित्य इतर भाषांमध्ये भाषांतरीत व्हावे. ह्या सर्व बाबी केव्हा ख-या होऊ शकतील तर ज्या वेळी मराठी माणूस संशोधन मराठी भाषेत करेल. तसेच सर्वप्रकारचे शब्दकोष मराठीत तयार होतील. इंग्रजीचे अंधानुकरण केले नाही तर मराठी भाषा जगेल. अजुनही मराठीला पाहिजे तसे महत्व आलेले दिसत नाही. त्यासाठी आपण आपल्यातले ”भगीरथ” शोधले पाहिजे. हे उद्याचे भगीरथ एक ना एक दिवस ज्ञानाची गंगा मराठीतून खेचून आणतील. मराठीला अधिक संपन्नावस्था येईल. तेव्हा मराठीचे अस्तित्व ख-या अर्थाने शाही थाटात असेल आणि म्हणत असेल, ”आजि सोनियाचा दिन अमृते पाहिला.” -सौ. चित्रा विजय बाविस्कर

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मोह फेट्याचा