मोह फेट्याचा

आत्तापर्यंत दिल्या जाणाऱ्या शाल-श्रीफळाची जागा फेट्यांनी घेतली आहे. लग्न समारंभ, वाढदिवस ई. मंगल कार्यात तर ही अलिकडे प्रचंड क्रेझच निर्माण झाली आहे.  हेच फेटे वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंती किंवा अन्य आनंदाच्या कार्यातही जास्त प्रमाणात दिसायला लागले आहेत. लहान-लहान मुले, पुरुष व महिला फेटे बांधून मिरवतांना दिसून येतात. हे फेटे वेगवेगळ्या रंग छटांमध्ये बाजारात उपलब्ध आहेत. या फेट्यांच्या आडून लोकांची प्रतवारी, मान, अपमान करण्याची एक नवीच प्रथा रुढ झाली आहे.

सध्या लग्नसराईचे दिवस चालू आहेत. या निमित्ताने येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करण्याची नवीन पद्धत आली आहे ती म्हणजे फेटा बांधण्याची.  पूर्वी गावी  गांधी टोपी व वयस्कर व्यक्ती  फेटा  डोक्यावर बांधत असत. आजही वेगवेगळ्या प्रकारचे फेटे आवडीने डोक्यावर बांधणारे लोक आढळतात. ते प्रत्येकाच्या ऐपतीप्रमाणे स्वस्त किंवा महाग असतात.  ही सामाजिक विषमता आपण लहानपणापासून पाहात आलेलो  आहोत. आधुनिक काळात जुन्या विचारांची जागा माहिती तंत्रज्ञानाने घेतली. साहजिकच यामुळे समाजाचे राहणीमान उंचावले आहे.

यामुळे आदरातिथ्य करण्याच्या पद्धतीत बदल होत आहेत. सामाजिक किंवा कौटुंबिक कार्यक्रमात पाहुण्यांचे स्वागत हार-श्रीफळ देऊन न करता  शाल, बुके,  स्मृतीचिन्ह वा छान भेट वस्तू देऊन होऊ लागलेले असतांना हल्ली त्यातही बदल झालेला जाणवतो. सार्वजनिक कार्यक्रमात तर हे स्वागत सोहळे मुख्य कार्यक्रमांपेक्षा जास्त रंगू लागल्याचे दिसू लागले आहेत. आत्तापर्यंत दिल्या जाणाऱ्या शाल-श्रीफळाची जागा फेट्यांनी घेतली आहे. लग्न समारंभ, वाढदिवस ई. मंगल कार्यात तर ही अलिकडे प्रचंड क्रेझच निर्माण झाली आहे.  हेच फेटे वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंती किंवा अन्य आनंदाच्या कार्यातही जास्त प्रमाणात दिसायला लागले आहेत. लहान-लहान मुले, पुरुष व महिला फेटे बांधून मिरवतांना दिसून येतात. हे फेटे वेगवेगळ्या रंग छटांमध्ये बाजारात उपलब्ध आहेत. शिवजयंती व भीम जयंतीला अनुक्रमे केशरी व निळ्या रंगाच्या फेट्यांना खूप मागणी असते. वेळप्रसंगी फेटा बांधलेली चांगली ओळखीची व्यक्ती आपल्याला बघून न बघितल्यासारखे करते.  म्हणजे त्या फाट्याच्या तोऱ्यात ओळख न देता पुढे निघून जाते. कारण त्याला त्या वेळी डोक्यावर बांधलेल्या फेट्याचा जास्त अभिमान असतो. ती व्यक्ती वेगळ्याच रुबाबात वावरतांना दिसत असते.

मला एका लग्न समारंभात फेटा बांधल्याचे आठवते. आपल्या डोक्यावर तो कसा दिसत असेल याची उत्सुकता होती, म्हणून मी कोणाला तरी माझा फोटो काढायला सांगितल्याचे पण चांगले आठवते. पण त्याला मी सांगितलेले ते काम घाईगडबडीत विसरून गेला असावा, म्हणून  माझा फेटा बांधलेला फोटो काढला नाही. मीही फार काही त्याच्या मागे लागलो नाही. परिणामी मला तो फेटा बांधल्याचा आनंद मात्र घेता आला नाही. मागे एकदा दूरच्या नातेवाईकांच्या मुलीच्या लग्नासाठी गेलो होतो. तिथेही पाहुण्यांना  फेटे बांधण्याचा कार्यक्रम चालू होता. मी थोडा सुखावलो होतो. कारण सोबत असलेल्या पाहुण्यांचे नाव फेटा बांधण्यासाठी लाऊडस्पीकरवर पुकारले गेले होते. सहाजिकच तेव्हा मलाही वाटले होते की, आपले नावही ते लाऊडस्पीकरवर पुकारतील व आपली फेटा बांधण्याची इच्छा पूर्ण होईल. पण माझा भ्रमनिरास झाला. त्यांना माझ्यासारख्या छोट्या माणसावर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक वाटले नसावे.

 दोन वर्षापूर्वी अंबाजोगाईला उन्हाळ्यात गेलो होतो. सौ.मिनाक्षी एप्रिल महिन्यात अगोदरच तिकडे गेली होती. तेव्हा तिने मला तिचा निळा फेटा बांधलेला फोटो दाखवला. जयंतीच्या मिरवणुकीत तिच्या भाचीला तो डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजन कमिटीकडून मिळाला होता. म्हणजेच तिला ही फेट्याची आवड होती तर!  कालपरवा आमच्या गावातील  जयंती निमित्त महिलांनी फेटे बांधून सहभागी होण्याची चर्चा सौ. मिनाक्षापर्यंत कानोेकानी पोहोचली होती. तिने जेवतांना हा फेट्याचा विषय माझ्याकडे काढला. तेव्हा मी क्षणाचाही विलंब न करता तिला फेटा बांधण्यासाठी होकार दिला. यामुळे तीलाही त्याक्षणी आनंद झाला होता. दुसऱ्या दिवशी ती फेट्याचे पैसे देणार देखील होती. मात्र  काही कारणाने तिचा आनंद तेवढ्या रात्री पुरता  टिकला होता. कारण तेथे स्थानिक राजकारण आडवे आले. दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष मिरवणुकीत महिलांचे दोन गट दिसायला लागले होते.  फेटे बांधून गाण्यावर ताल धरलेला एक ग्रुप आणि फेटे न बांधता ताल धरलेला दुसरा ग्रुप  अशी उभी फाळणी  मिरवणुकीत दिसत होती एवढेच. पण सौ.मिनाक्षीसह बिचाऱ्या महिला ज्यांना गटतटाशी संबंध नाही, अशा सर्व महिलांच्या आनंदावर यामुळे विरजण पडले होते. कोणाच्या लक्षात आले होते की नाही यावर चर्चा झाली नाही. पण मला ही बाब वेदनादायी वाटली हे नक्की होते.  - डॉ. श्रीकृष्ण दि. तुपारे, आ. प्र. वि. महाविद्यालय, नागोठणे 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

खबरदार! नाहीतर रायगडी धोंडे वाहण्यास खेचरांसोबत जुंपले जाल!