सर्वोत्तम कामाचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवताना नागरिकांना प्राधान्य हे सूत्र अंगिकारण्याची आयुक्तांची भूमिका

नवी मुंबई : आपण नवी मुंबईसारख्या आधुनिक नावाजलेल्या शहराच्या महानगरपालिकेत काम करतो याचा अभिमान बाळगतानाच स्वत:मधील क्षमतांचा पूर्ण वापर करून नागरिकांना अभिप्रेत असलेले लोकाभिमुख काम करण्यावर भर दिला पाहिजे असे महापालिका अधिकारी, कर्मचारी यांना सूचित करतानाच महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी एक नागरिक म्हणून मी आपल्या शहराच्या विकासासाठी काय करू शकतो याचा विचार करून नागरिकांनीही आपले योगदान द्यावे असे आवाहन महापालिका वर्धापनदिनानिमित्त मुख्यालयातील ॲम्फिथिएटरमध्ये आयोजित कार्यक्रमाप्रसंगी केले.

       कोव्हीडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने जारी केलेल्या कोव्हीड प्रतिबंधात्मक नवीन नियमावलीचे पालन करीत नवी मुंबई महानगरपालिका वर्धापनदिन समारंभाचे मोजक्या अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, संजय काकडे व विभागप्रमुख, विभाग अधिकारी आणि इतर अधिकारी उपस्थित होते. महानगरपालिकेच्या फेसबुक पेजवरून अनेक नागरिकांनीही हा समारंभ ऑनलाईन अनुभवला.

       मागील वर्षीच्या वर्धापनदिन मनोगतात पुढील वर्षी कोव्हीड विरहित वातावरणात वर्धापनदिन साजरा करता येईल अशी आशा व्यक्त केली होती. मात्र तसे न होता ओमायक्रॉ़न या कोव्हिडच्या नव्या व्हॅरिएंटचे संकट पुढे उभे आहे. कोव्हीड संपलेला नाही हे नागरिकांनी नीट लक्षात घेऊन मास्क हीच आपली कोव्हीडपासून बचावाची ढाल आहे हे ध्यानात ठेवावे आणि कोव्हीड प्रोटोकॉलचे पालन करावे असे आवाहन आयुक्तांनी केले.

       मास्क व इतर कोव्हीड नियमांचे उल्लंघन केल्यापोटी दंडवसूली करण्यात महानगरपालिकेस अजिबात आनंद वाटत नाही, उलट स्वत:च्या आरोग्याविषयी नागरिक गंभीर नाहीत याचा खेद वाटतो असे ते म्हणाले. घरातील लहान मुलांना आता बाहेर जाताना मास्क हे आपल्या कपड्यांसारखे वाटू लागले आहेत, पण याचे गांभीर्य मोठ्यांना कळत नाही याची खंत त्यांनी व्यक्त केली.

       नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षणामध्ये नेहमीच आघाडीवर राहिली आहे. यावर्षीही 10 ते 40 लक्ष लोकसंख्येच्या देशातील मोठ्या शहरांमधील सर्वात स्वच्छ शहराचा बहुमान व इतर मानांकने नवी मुंबई महानगरपालिकेस लाभली त्यामागे दररोज न चुकता शहर स्वच्छतेसाठी झटणारे स्वच्छताकर्मी आणि स्वच्छतेचे महत्व पटलेले नागरिक यांचे महत्वाचे योगदान असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.  

       या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्राच्या आठही विभागातील रस्ते सफाई व घरोघरी जाऊन कचरा संकलन व वाहतुक करणा-या 16 स्वच्छताकर्मींचा यावेळी शाल व प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्या अनुषंगाने बोलताना आयुक्तांनी स्वच्छतेचे हे काम सोपे नाही, त्यामुळे आपल्यासाठी श्रम करणा-या व्यक्तींप्रती कृतज्ञता अर्पण करणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगत श्रमप्रतिष्ठेचे महत्व विषद केले.

       स्वच्छता ही रोज करण्याची गोष्ट असून ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे स्वच्छता तेव्हाच राखली जाईल जेव्हा नागरिक ठरवतील असे सांगत आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी शहाराविषयीचा अभिमान बाळगत माझे शहर मी अस्वच्छ होऊ देणार नाही असा निश्चय नागरिकांनी मनोमनी ठामपणे करावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

       प्रशासक म्हणून काम करताना लोकप्रतिनिधी नसल्याने माझ्या हाती सर्व काही अधिकार आहेत असे न मानता भेटायला येणा-या प्रत्येक नागरिकाचे म्हणणे ऐकून घेणे व त्यामधील शहरासाठी आवश्यक असणा-या नागरिक हिताय बाबींना प्राधान्य देणे गरजेचे मानतो असेही आयुक्तांनी यावेळी सांगितले.

       प्रत्येक संस्थेची एक विचारप्रणाली असते असे स्पष्ट करीत लोकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य हे आपले तत्व असले पाहिजे व त्यानुसार कुणी सांगितल्यानंतर नाही तर चांगली कामे आपणच पुढाकार घेऊन करण्याची वृत्ती जोपासली पाहिजे असे आयुक्तांनी अधिकारी, कर्मचा-यांना सूचित केले.

       अनेक विभागांमध्ये सुधारणांना वाव आहे असे काही उदाहरणे देत स्पष्ट करीत त्यांनी लोक आपल्या कामाचे मूल्यमापन करीत असतात त्यामुळे त्याकडे लक्ष देऊन कार्यशैलीत बदल घडवा असे अधिकारी, कर्मचारीवृंदाला सांगितले. चांगले काम करण्यासाठी अस्वस्थ असणे गरजेचे असल्याचे सांगत आपल्या कामावर संतुष्ट असणे म्हणजे स्वत:चा विकास थांबविणे ही भूमिका मांडत आपण चांगले काम करता म्हणून आपल्याकडून अधिक चांगल्या कामाची अपेक्षा लोक करतात असेही ते म्हणाले.

       मागील वर्षभराच्या कालावधीत ब-याच वर्षांपासून प्रलंबित असलेले पदोन्नती, आश्वासित सेवा प्रगती योजना, लाड-पागे समिताच्या आदेशाची अंमलबजावणी असे अनेक प्रश्न मार्गी लावून अधिकारी, कर्मचारी यांच्या मनातील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न केला असल्याचा उल्लेख करीत यामधून तुम्हांला अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळावी ही अपेक्षा आयुक्तांनी व्यक्त केली.

       याप्रसंगी 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झालेले महापालिका उपआयुक्त अशोक मढवी व वाहनचालक सुभाष कोळी यांचा सपत्निक सन्मान करण्यात आला.

       यावेळी सर्वांनी माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पर्यावरण संरक्षण, संवर्धनाची सामुहिक शपथ आयुक्तांसमवेत ग्रहण केली.

Read Previous

पनवेलच्या डायलेसिस सेंटरचे पालक मंत्री आदीती तटकरे यांच्या हस्ते आज उदघाटन