बहुश्रुतता असणारा साहित्यिक..अशोक गुप्ते

 चाफा बोलेना या अजरामर कवितेचे रचनाकार असलेल्या आजोबा कवि कै. नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ बी यांचे आपल्या जन्मापूर्वीच हरपलेले छत्र; पण त्यांच्याच पुस्तकरुपी माहितीद्वारे आध्यात्मिक पेक्षा साहित्यिक क्षेत्रात स्वतःला झोकून देत कविता, ललित कथा लेखन, गझल यांची रचना करणारे, कवितांचे भाषांतरकार म्हणून विशेषत्वाने ओळख असणारे नवी मुंबईकर ज्येष्ठ कवि अशोक गुप्ते यांच्याशी ‘
आपलं नवे शहर’चे उपसंपादक राजेंद्र घरत यांनी साधलेला संवाद... 

 मुळचा कविचा पिंड असणाऱ्या कवि अशोक गुप्ते यांना चांगल्या रचना होण्यासाठी स्वतःमध्ये प्रगल्भता येणे महत्वाचे असून मनाची तयारी आणि प्रामाणिक राहून प्रतिभेची इमान राखल्यास कविता चांगल्या प्रकारे शब्दात उमटू शकतात, असे वाटते. आपल्या लेखनाला कुणी प्रतिसाद दिला, पाठीवर थाप दिली की साहित्य लिखाणासाठी हुरुप येऊन रुप बदलते. लिखाणाचा गाजावाजा, बोलबाला, चर्चा झाल्यावर आपण योग्य मार्गावर असल्यासारखे वाटते, अशी भावना अशोक गुप्ते यांनी संवादात व्यक्त केली. वास्तविक पाहता हा संवाद नसून मारलेल्या मनमोकळ्या साहित्यिक गप्पाच आहेत, असेही गुप्ते यांनी यावेळी नमूद केले. 

 ► आपले पूर्वज आणि आपली वाटचाल, याबद्दल?
- आमचे पूर्वज पेण मधील वाशी गांवचे. पण, पोटापाण्यासाठी आमच्या पूर्वजांनी गाव सोडले आणि ते वऱ्हाड प्रांतात वास्तव्यास गेले. त्यामुळे आमची वाशी गावाशी चार पिढ्यांपूर्वीच नाळ तुटलेली आहे. वऱ्हाडी प्रांतातून माझे वडील पोटापाण्यासाठी मुंबईत आले आणि ते मुंबईत राहू लागले. आमची पिढीही मुंबईतील आहे. माझे बालपण वरळीतील बी.डी.डी. चाळीत गेले. येथील चाळीतील छोट्याशा खोलीत आम्ही ३ बहिणी, २ भाऊ रहात होतो. पुढे  लग्नानंतर १९७७ मध्ये मी वाशीत रहायला आलो आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने नवी मुंबईकर झालो. चाफा बोलेना कविता लिहिणारे कवि माझे आजोबा कै. नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ बी. यांचे माझ्या जन्मापूर्वी निधन झाले. त्यामुळे आजोबांना पाहिले नाही आणि त्यांचा सहवासही मला लाभला नाही. पण, त्यांची पुस्तकरुपी माहिती आहे. या माहितीच्या आधारे ते अभ्यासूकत्तीचे, प्रसिध्दीपराड.मुख आणि एकांतप्रिय व्यक्तीमत्व होते. वास्तविक पाहता भले पूर्वजांचा सहवास लाभला नसला तरीही आध्यात्मिक आणि साहित्यिक वारसा मला त्यांच्याकडून मिळाला आहे. यानंतर मी माझ्या साहित्यात वाचन, लेखन, अभ्यास आणि कष्टाने खतपाणी घातले. आज आध्यात्मिक क्षेत्रात मी शून्य असलो तरीही साहित्यात थोडेफार काम केले आहे. लेखन काम करीत आलो आहे, असे मी सांगेन.  

सिमेन्स कंपनीतील नोकरी अन्‌ करार पुस्तकाची निर्मिती कशी काय?
- आजकालची आणि २५-३० वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, तशीच नोकरीची देखील आहे. आजच्या तरुणांना कामावर जाण्याची वेळ निश्चित आहे; पण येण्याची अनिश्चित वेळ आहे. त्या काळी आमच्या कामाचा ताण कमी होता. सिमेन्स कंपनीत सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत काम करायचो. यानंतर तासाभरात घरी पोहोचल्यावर नंतरचा वेळ वाचन, लेखन, चिंतन-मनन यासाठी मिळायचा. या वेळेचा मी सदुपयोग करुन खूप वाचन आणि लिखाण केले. सिनेमे-नाटक पाहिली, नेते मंडळींची भाषणे ऐकली. एकंदरीतच नोकरी करीत उर्वारित वेळ कलेच्या आनंदात घालवला. त्यामुळे मला कविता करता आल्या. कवितेला वेळ देऊ शकलो. यातून सिमेन्स कंपनीतील अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे माझ्या हातून करार या कविता संग्रहाची निर्मिती झाली.

तुमचे प्रेम कशावर? कविता की ललित लेखनावर? भाषांतरकार कसे झालात?
- मुळात माझा पिंड कविचा आहे. कविता ही ईश्वराचे देणे आहे. पण, फक्त झोळी उघडी ठेवायची. ईश्वराने दिले तर घ्यायचे. कवितेची निर्मिती करताना काही वेळेला सुरुवातीचा काळ भाकड जातो. कविंना वर्ष-वर्षभर काही सुचत नाही. दुसरीकडे मी कविता केल्या नाहीत; ती यायला पाहिजे, सुचली पाहिजे. कविता ज्यावेळी होत नाहीत, त्यावेळी हाताला लिखाणाची सवय पाहिजे. मी ललित लेखन, कथा लेखन करत संत रुमी यांचे साहित्य वाचले. वर्ष-दोन वर्ष खूप संदर्भ गोळा केले. रुमीच्या साहित्य वाचनातून मी हळहळून गेलो, प्रेरीत झालो. पुढे कोणत्या कवितांचे भाषांतर करायचे ते ठरविले आणि त्यानंतर मी भाषांतर करु लागलो. ललितलेख, कथा लिहू लागलो. दुसरीकडे विविध कविता, गझला, अभंग, हायकू अशा रचना लिहिलेला मी आई हयात असेर्पयंत आई आणि पाऊस याबद्दल एकही शब्द लिहू न शकलेला मी एकमेव असल्याची खंत आहे.  यानंतर आईवर ‘आई जाते तेव्हा’ या दीर्घकाव्याची निर्मिती केली.

कविसंमेलन, जुना काळ कसा होता?
- त्याकाळी नुकतीच कोकण मराठी साहित्य परिषदेची सुरुवात झाली होती आणि नवी मुंबईतही त्याची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. हा काळ माझ्यासाठी भारावलेला होता. त्यावेळी परेन जांभळे, साहेबराव ठाणगे, डॉ. अशोक पाटील, शंकर सखाराम, मोहन भोईर यांच्यासारखे साहित्यिक कोमसापमध्ये कार्यरत होते. त्याकाळी साहित्यातील शब्दांना किंमत होती, तर आता सोशल मिडीयावरील लाईक्स महत्वाचे वाटतात. आम्ही साहित्यिक म्हणून एकमेकांना भेटत असू तेव्हा आमच्या साहित्याचे एकमेकांना वाचून दाखविणे, त्यातील उणिवा दाखविणे आणि इतर विचारांचे आदान-प्रदान व्हायचे. त्यातूनच आमच्या साहित्यांना जीवंतपणा यायचा. आता तसा काळ राहिलेला नाही. गेल्या दिड वर्षातील परिस्थितीबद्दल तर न बोललेलेच बरे. 

करार आणि सांजचकवा या तुमच्या दोन साहित्यकृतींत मोठे अंतर का?
- सन १९९७ साली माझा करार हा कविता संग्रह प्रसिध्द झाला. त्यांनतर २००९ मध्ये सांज चकवा साहित्य प्रसिध्द झाले. म्हणजे सदर दोन साहित्यांच्या प्रसिध्दी कालावधीत ११-१२ वर्षांचे अंतर झाले. कविच्या पाठीवर कुणी प्रामाणिकपणे कौतुकाचा हात फिरवला की त्याचा हुरुप वाढतो. त्यातून त्याच्या हातून चांगले वाचन-लिखाण होते. पण, या कालखंडात माझे कुणीच कौतुक केले नाही. तरीही नाउमेद न होता मी खूप वाचन केले, कविने नुसते कवि असू नये. त्याच्यात बहुश्रुतता असावी. चित्रकलेची माहिती असावी, प्रदर्शने बघावीत. मीही चित्रकलेची प्रदर्शने बघितली. ओशाेंची प्रवचने ऐकली. कॉ. डांगे यांच्यासारख्या व्यक्तीमत्वांना ऐकले आहे. त्यामुळे माझ्यावर नम्रतेचे संस्कार याच व्यक्तीमत्वांकडून झाले असे मला वाटते.  

आपल्याला मिळालेल्या मानसन्मान, पुरस्कारांबद्दल काय सांगाल ?
- सांज चकवा या कविता संग्रहाबद्दल २००९ साली मला मानाचा इंदिरा संत पुरस्कार मिळाला आहे. ललित कथासंग्रहासाठी लळित, कथेसाठी मेनका, गार्गी अशा नियतकालिकांचे पुरस्कार मिळाले आहेत. ह.ल.कुलकर्णी काव्य स्पर्धेचा पुरस्कार, साहित्य दरवळचा पुरस्कार यासह इतर लहान-मोठे खूप पुरस्कार मिळाले आहेत. पण, म्हणावी तशी प्रसिध्दी मिळालेली नाही. तरीही मी पुरस्कारांबद्दल समाधानी आहे. मला माझ्या मर्यादा ठाऊक असल्याने मी गुलजारांसारखी गगनाला गवसणी घालू शकत नाही. फक्त मी काम करत राहून आनंद उपभोगत असतो.

आगामी आपली साहित्य क्षेत्रातील वाटचाल कशी असेल?
- साहित्यातील माझे आगामी प्रकल्प बरेच आहेत. त्यासाठी सद्‌गुरु कशी साथ देतात, ते पहायचे आहे. सिध्दार्थ ते बुध्द असे प्रवास वर्णन असणारे भगवान गौतम बुध्द यांचे संपूर्णपणे मुक्तधंदातले चरित्र ‘बुध्दायन’ लॉकडाऊनमुळे प्रसिध्द होऊ शकले नाही. जवळपास १५० ते १७५ पानांचे ‘बुध्दायन’ येत्या सहा महिन्यात प्रसिध्द होईल. याशिवाय मी बऱ्याच गझला लिहिलेल्या आहेत, कविता लिहिलेल्या असून त्यांचे पुस्तक होऊ शकते. सध्याचा काळ साहित्य प्रसिध्दीसाठी योग्य नाही. याशिवाय इंग्रजी भाषेतील दीर्घकाव्य फ्रॉम झिरो टुवार्डस्‌ झिरो... ऑटोबायोग्राफी ऑफ इ साधक या साहित्याचीही निर्मिती केली आहे. सदर सर्व साहित्य प्रकाशनाच्या वाटेवर आहे.

आपण साहित्यिक झाला नसतात, तर...?
- सर्वप्रथम मी कविच झालो असतो. अन्यथा मला पत्रकार किंवा प्राध्यापक व्हायला आवडले असते. मला या क्षेत्राची खूप आवड आहे. तसेच मी जलतरणपटू झालो असतो; पण आजही मला पोहता येत नाही. याशिवाय मला चित्रकार व्हायला आवडले असते. मी चित्रकलेची प्रदर्शने खूप बघितली आहे. आजही मी म्युझिक ऐकतो, गाणी बोलतो; गात नाही असे सांगत मला कवि गुलजार व्हायलाही आवडले असते. 

Read Previous

मुंबई महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेना हायकोर्टाचा दणका, भाजप नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांना मोठा दिलासा

Read Next

शिवसेना फुटीमागचे कारस्थानी !