अवैध मासे विक्री प्रकरणी विधिमंडळ सदस्यांच्या पाहणी दौरा व बैठक संपन्न

नवी मुंबई : नवी मुंबई परिसरात अनधिकृत मासे विक्रेते घरोघरी जाऊन मासे विक्री कशी करतात .यावर आमदार रमेश पाटील यांनी विधानपरिषदेत आवाज उठवला होता.त्यानंतर मत्स्यविकास मंत्र्यांच्या सभागृहातील सूचनेनुसार महाराष्ट्र विधिमंडळ यांनी विधिमंडळ सदस्यांच्या गठित केलेल्या विशेष समितीचा पाहणी दौरा व बैठक पालिकेच्या मुख्यालयात  मंगळवारी पार पडला.

या समितीचे  समितीचे सदस्य व  विधान परिषदेचे आमदार रमेश पाटील, माजी मंत्री व आमदार महादेव जानकर, समितीचे अध्यक्ष व मत्स्य व्यवसाय आयुक्त अतुल पाटणे, मत्स्य व्यवसाय सह आयुक्त महेश देवरे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर तसेच महानगरपालिकेच्या व मत्स्य व्यवसाय विभागाच्या इतर संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला.

पावसाळी अधिवेशन २०२२ मध्ये आमदार रमेश पाटील यांनी नवी मुंबई परिसरातील अनधिकृत मासे विक्रेत्यांवर प्रतिबंध घालण्याकरिता तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर मत्स्य विकास मंत्र्यांनी या मासे विक्रेत्यांवर बंदी घालण्याकरिता उपाययोजना सुचवण्यासाठी  मत्स्य व्यवसाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळ सदस्यांची एक समिती गठित केली होती. त्या अनुषंगाने सदर समितीने नवी मुंबईतील ऐरोली, कोपरखैरणे व इतर विभागात पाहणी दौरा केला. यावेळी समितीला अनधिकृतपणे घरोघरी जाऊन तसेच काही मासे विक्रेत्यांकडून स्वतःच्या घरातून मासे विक्रीचा व्यवसाय होत असल्याचे निदर्शनास आले. त्याचप्रमाणे या मासे विक्रेत्यांकडून विकली जात असलेली मच्छी ही अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचेही या समितीच्या निदर्शनास आले आहे.

पाहणी दौरा पार पडल्यानंतर बोलताना आमदार रमेश पाटील यांनी सदर समितीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना या घरोघरी जाऊन व स्वतःच्या घरातून मासे विक्री करीत असलेल्या अनधिकृत मासे विक्रेत्यांवर महानगरपालिका अधिनियम कलम ३८१ नुसार अधिकृत मार्केट बाहेर मासे विक्री करणे गुन्हा असल्यामुळे कारवाई करावी अशा सूचना दिल्या असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे या अनधिकृत मासे विक्रीस प्रतिबंध घालण्याकरिता करण्यात आलेल्या पाहणी दौऱ्याचा अहवाल शासनास सादर केला जाणार असून शासनाकडून तात्काळ कारवाई करण्यात येईल असे आमदार पाटील यांनी सांगितले.

Read Previous

१३ ते १६मे दरम्यान वाशीत होणार क्रेडाई-बीएएनएम यांच्या २०व्या मेघा प्रॉपटी प्रदर्शन

Read Next

लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योगांशी संबंधित व्यावसायिकांसाठी ठाण्यातील ११ व १२ नोव्हेंबर रोजी बिझनेस जत्रा या मेळावा