१ ऑगस्टपासून मच्छीमार बोटी पुन्हा समुद्रात

अन्नसाठा सोबत घेऊन मच्छीमार समुद्रात जाण्यासाठी सज्ज


उरण ः गेल्या दोन महिन्यांपासून समुद्रापासून दूर असलेल्या मच्छीमार बांधवांची प्रतीक्षा आता संपली असून, येत्या १ ऑगस्टपासून मच्छिमारांच्या बोटी पुन्हा समुद्रात मासेमारीसाठी झेपावणार आहेत. त्यासाठी खलाशी आणि मच्छीमार तयारीला लागले असून, मच्छिमारीची जाळे तपासणे, दुरुस्ती करणे, बोटींची रंगरंगोटी, तेलपाणी आणि इतर तयारी करण्यात मच्छीमार सध्या व्यस्त आहेत. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांमध्ये खवय्यांना स्वस्त मासे उपलब्ध होणार आहेत. मात्र, १२० अश्वशक्तीच्या नौकांना मत्स्य विभागाने डिझेल कोटा देण्यास नकार दिला आहे.

मासेमारी बंदीच्या दोन महिन्यांत मच्छीमारांनी त्यांची कामे पूर्ण केली असून, आता मोठ्या आनंदाने मच्छिमारीसाठी मच्छीमार सातासमुद्रापलिकडे जाणार आहेत. जून-जुलै महिना माशांचा प्रजननाचा आणि अंडी देण्याचा काळ असतो. या महिन्यात समुद्र खवळलेला असल्यामुळे १ जून ते १ ऑगस्ट या दरम्यान खोल समुद्रातील मासेमारीवर शासनाचे बंधन असते. मच्छीमार बांधव देखील या काळात खोल समुद्रातील मासेमारी करत नाहीत. या दोन महिन्याच्या काळात मच्छीमार त्यांच्या होड्यांची दुरुस्ती, रंगरंगोटी, जाळी सुधारणे आदी कामे करतात.


करंजा, मोरा, दिघोडा किनाऱ्यावर गेले दोन महिने शाकारुन ठेवलेल्या नौका आता खलाशांनी गजबजून गेल्या आहेत. दहा-बारा दिवस पुरेल एवढा अन्नसाठा सोबत घेऊन मच्छीमार समुद्रात जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. मच्छीमार बोटी सुरुवातीला ससून डॉक, भाऊचा धक्का येथे जाऊन बोटींमध्ये डिझेल आणि बर्फ भरणार आहेत. त्यानंतर मच्छीमार १ ऑगस्टपासून मच्छीमारी करण्यास सुरुवात करणार आहेत. पहिल्या वेळेला लवकर म्हणजे ५-६ दिवसांनी मच्छी घेऊन मच्छीमार किनाऱ्यावर येणार आहेत. त्यानंतर १०-१२ दिवसांनी त्यांची फेरी होणार आहे, असे बोटीवर जाणाऱ्या खलाशांनी सांगितले.


डिझेल परताव्याची प्रतीक्षा असलेल्या उरण तालुक्यातील मच्छीमारांची संख्या लक्षणीय आहे. करंजा, मोरा, दिघोडे, हनुमान कोळीवाडा, आवरे या गावातील अनेक लोक खोल समुद्रात जाऊन मच्छीमारी करतात. मच्छिमारांना शासनाने देऊ केलेला डिझेलचा परतावा प्रत्यक्षात वर्षानुवर्षे मिळत नाही. त्यातच परदेशातील आणि परराज्यातील मासेमारांचे अतिक्रमण आता महाराष्ट्राच्या मच्छिमारांसाठी मोठी समस्या झाली आहे.


येत्या १ ऑगस्ट पासून मच्छीमार बोटी समुद्रात मासेमारी करण्यासाठी निघणार आहेत. करंजा, मोरा बंदरातून शेकडो बोटी समुद्रात जाणार आहेत. ३१ जुलै पर्यंत मासेमारी बंद असल्यामुळे शासनातर्फे १ ऑगस्ट रोजी मच्छीमार बोटींसाठी डिझेल साठा वितरित केला जाणार आहे. मच्छीमार बोटी भाऊचा धवका, आणि ससून डॉक बंदरात डिझेल भरुन रवाना होणार आहेत. १२० अश्वशक्तीच्या नौकांना डिझेल कोटा मिळणार नसल्याचे मत्स्य विभागाने स्पष्ट केले आहे. त्या संदर्भात नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच निर्णय घेणार आहेत. त्यामुळे १२० अश्वशक्तीच्या नौकांना देखील शासनाच्या कोट्यातून डिझेल मिळेल, अशी अपेक्षा आहे. - मार्तंड नाखवा, मच्छीमार नेते - करंजा. 

 

Read Previous

१३ ते १६मे दरम्यान वाशीत होणार क्रेडाई-बीएएनएम यांच्या २०व्या मेघा प्रॉपटी प्रदर्शन

Read Next

मासळी विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून देण्याची मागणी