दृष्टीआड सृष्टी 

 

डोळ्यांना जे दिसते, कानांना जे ऐकू येते तेवढेच काय ते खरे असे मानण्याचा प्रघात आहे. अगदी न्यायालयेही ऐकीव, सांगोवांगी बाबींऐवजी ‘चश्मदीद गवाह’ म्हणजेच प्रत्यक्षदर्शी पुराव्यांनिशी काय सांगतात यावर भर देऊन निकाल देण्याच्या बाजूची असतात. पण या प्रत्यक्ष दिसण्यापलिकडेही एक वेगळे जग असते. आपल्या नजरेच्या टप्प्याबाहेरच्या या गोष्टी असतात व त्या घडत असतात आणि खऱ्याही असतात. भले त्या कधीकधी फारशा आरोग्यदायी नसतीलही!  पण  ‘दृष्टीआडच्या सृष्टी’ची गंमत आहे आणि तिने आपल्या आपल्या आयुष्यातल्या ‘अज्ञानातल्या सुखा’ची रंगत टिकवून ठेवली आहे. म्हणूनच उगाचच गंभीर व्हायचे काम नाही..

एक विनोद नेहमी सांगितला जातो. आपल्या साऱ्यांच्या परिचयाचाही तो असेल. एका हॉटेलात एक जोडपे जाते. हॉटेलचा पोऱ्या त्यांच्या टेबलावर पाण्याचे ग्लास आणून ठेवताना त्याची  बोटे त्या ग्लासात बुडालेली पाहून त्या जोडप्यातील महिला ईSSS शीSSS असले काहीतरी उद्‌गार काढते. आपली पाण्यात बुडालेली बोटे पाहुन बाई असे म्हणाली हे लक्षात येऊन तो पोऱ्या त्या जोडप्याकडे पहात म्हणतो, ‘हे तर काहीच नाही..आत येऊन बघा; ज्या ड्रम मधून मी हे पाणी आणलंय त्यात आमचा सखाराम बसला आहे.”   करोना संक्रमण कमी होत चालल्याच्या या सेफ डिस्टन्सिंग, सॅनिटाईज्ड, मास्क-ग्लोव्हज्‌ वाल्या धुवट जमान्यात हे ऐकायला जरा कठीण असले तरी अनेक ठिकाणचे विनोदी वास्तव आहे.  संतोष पवारलिखित धक्केबुक्के या नाटकात हा प्रवेश घण्यात आला होता व त्यात उरणचे कलावंत महेंद्र तांडेल यांनी भूमिका केली होती. 

लहानपणी आपल्यातील अनेकांनी रानावनात जंगलात जाऊन झाडावरची, उंच वेलीवरची फळे तोडली असतील. काही ठिकाणी दगड मारुन किंवा काठीने ती जमिनीवर-धुळीत पाडली असतील व तेथेच त्यांचा आस्वादही घतला असेल. जर असे तु्‌म्ही केले नसेल तर तुमच्यासारखे दुदैर्वी जीव तुम्हीच! फळे, रानमेवा त्या त्या ठिकाणी जाऊन विशुध्द, स्वाभाविक, नैसर्गिक स्वरुपात चाखण्याची मौज ही निव्वळ स्वर्गीय होय. तिथे काही डेटॉल, पाणी, फडके घऊन जात ती फळे सॅनिटाईज करुन धुवुन, पुसुन खायची नसतात. ती सारी नाटके शहरी, धुवट, तथाकथित स्वच्छताप्रेमी लोकांची! मला आठवते..माझे बालपण कल्याणमधील दुर्गम खेड्यात गेले. तेथे आमच्या मालकीच्या जागेत तसेच आजूबाजूला आंबे, पेरु, बोरे, सिताफळे, उंबर, मोह, तुती  यांची झाडे होती. मोहाच्या झाडाखाली सकाळीसकाळी मोहाच्या फुलांचा सडा पडलेला असे. तर उंबराच्या झाडाखाली कित्येक उंबर पडलेले असत. दगडाच्या तडाख्याने शेजारच्या आवारातील बोरे पाडण्याची मजाही काही औरच! त्यावेळीही आमची आई बाजारातून गोड गोड  बोरे आणी. पण शेजारच्या आवारातील झाडावर दगड मारुन चोरुन पाडलेली बोरे ही त्या शेजारच्या आजीच्या शिव्यांसकट खायची गोडी ही अवीट होती. उंबराचे फळ बोटांनी फोडले तर त्यात अनेक सुक्ष्म पाखरे साध्या डोळ्यांनीही दिसत. त्यावर केवळ जोरात एक फुंकर मारली, ती सुक्ष्म पाखरे घालवली की झाले उंबर स्वच्छ व खाण्याजोगे. 

काय बाबा, तुमची पोरं... कसलं मसलं झाडावरुन पाडून तसंच खातात..असे आमच्या पालकांना बोलणारे धुवट लोक त्याहीवेळी  कमी नव्हते. विशेषकरुन मांसाहाराविरोधात तर सदासर्वदा बाेंबलणारे लोक सदैव आजूबाजूला असतात. शाकाहार आणि मांसाहार हे लोकाच्या आहाराचे घटक आहेत. एकमेकांना चिडवण्याचे, वाद घालण्याचे, टीका करण्याचे नव्हेत. पण मांसाहारी लोक म्हणजे पापी, तामसी, हिंसक, आक्रमक, भडक डोक्याचे वगैरे वगैरे समज फार पूर्वीपासून रुढ करुन ठेवण्यात आले आहेत. शाळेत गेल्यावर पाठ्यपुस्तकांसोबतच  दुर्बीण, सुक्ष्मदर्शक यंत्र, टेलिस्कोप वगैरे बाबींशी संपर्क आला. तेव्हा दही हे टेलिस्कोपिक लेन्सच्या  कॅमेऱ्याने पाहिल्यास त्यात शेकडो सुक्ष्म किडे वळवळताना दिसले. दुधात किडे पडल्याशिवाय त्याचे दह्यात रुपांतर होत नाही. ही नासण्याची, आंबण्याची, किण्वनाची साधी प्रक्रिया आहे. हे कित्येक जिवंत, सुक्ष्म जीव (बॅक्टेरिया) असलेले दही अनेक शाकाहारी लोक चक्क उपवासालाही मिटक्या मारीत खाताना आपण नेहमी बघतो. यालाच म्हणायचे दृष्टीआड सृष्टी. आपल्या साध्या डोळ्यांना हे बॅक्टेरिया दिसत नाहीत, पण ते अस्तित्वात मात्र असतात व आपल्या ताेंडावाटे पोटातही जातात. विज्ञान तर सांगते की काही बॅक्टेरिया हे आपल्या लहान आतड्यांतही जीवंत असतात..त्यांना गट पलोरा म्हणतात. पचनाला व शरीर स्वास्थ्याला हे जंतु उपयुक्त असतात. आता बोला! 

दातात बिया अडकणारी, आंबट-चिंबट फळे मला आवडत नाहीत. पेरु कितीही गोड असला तरी त्याच्या बिया त्रास देतात म्हणून मी तो खात नाही. करवंदेही मला त्यातील बियांमुळे आवडत नाहीत. करवंदे ही रानावनात, शेताच्या बांधांवर छोट्या छोट्या जाळ्यांमधून हातांना सहज लागतील अशा जागी लागलेली दिसतात. तुम्हाला जंगलात, शेतात, झाडाझुडपांतून भटकायची सवय असेल तर तुम्हाला ती दिसतील. काही लोक मात्र झाडं कोणती आहेत हे न पाहताच त्यांच्यावर ‘करंगळी वर” करुन टाकतात. असली करवंदे तिथल्या तिथे दृष्टीआड सृष्टी करत ‘तशीच” खाल्लीत तर तुमची चव बिघडू शकते. तुम्ही कोणत्याही गोदामात, आगारात, गोडाऊनमध्ये जा. मोठमोठ्या किराणा दुकानांच्या आतल्या बाजूला जा. तेथे कित्येकदा तुम्हाला उंदीर, घुशी, पाली यांचा सुखेनैव संचार सुरु असल्याचे नजरेस पडेल. सुटे शेंगदाणे, गहू, तांदुळ, बाजरी, गुळाच्या ढेेपी, चणे, वाटाणे अशा अन्नपदार्थांच्या डब्यांत, खोक्यांत ही मंडळी आरामात ये-जा करीत असतात. त्यांच्या वावराच्या, प्रवासाच्या खुणा लेंड्यांच्या स्वरुपात तेथे दिसतील. पण वजन करताना व्यापारी ते साफ करुन आपल्यासमोर तागडीत टाकतो आणि पिशवीत भरतो. पण त्याआधी या साऱ्या प्राण्यांच्या विविध स्पर्शांनी हे पदार्थ ‘पावन” झालेले असतात. पण..दृष्टीआड सृष्टी! फार विचार केलात तर श्वासही घ्यायला नको. कारण या श्वासातही हवेतले अनेक जीवजंतू आपल्या नाकावाटे प्रवेशत असतातच की..!

आपल्याला प्यायचे पाणी ज्या धरणे, नद्या, विहीरी, तलाव यांच्यामार्फत मिळत असते ते कितपत शुध्द असते? बाटलीबंद पाणी, पॅकेज्ड वाटर, मिनरल वॉटर, वगैरे ही सारी नाटके अलिकडच्या काळातील आहेत. त्यापूर्वी सब घोडे बारा टक्के होते. आजमितीसही शहरांना पाणीपुरवठा करणारी धरणे ही शहरांपासून लांब डाेंगरात आहेत व तेथे चरायला जाणारी कित्येक गुरे-ढोरे, बकऱ्या, मेंढ्या व तत्सम चतुष्पाद प्राणी व अन्य सजीव पाय घसरुन, एकमेकांशी मारामाऱ्या करुन वगैरे पाण्यात पडून मेल्याची उदाहरणे आहेत. त्यांचे  मृतदेह तेथील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येईर्पयंत याच पाण्यात तरंगत असतात. त्या कर्मचाऱ्यांच्या लक्षातच आले नाही तर मामलाच संपला. आपल्या घरात नळाला येते ते पाणी ‘शुध्द” समजायचा प्रघात आहे. आता ‘असे” पाणीही धुवुन कसे बरे घ्यायचे? दृष्टीआड सृष्टी! आपल्या डोळ्यासमोर तर कुणी त्या पाण्यात मरुन पडले नाही ना? मग झाले तर!  तरणतलाव उर्फ स्विमिंग पूल करोनाकाळात दीर्घकाळ बंदच ठेवण्यात आले होते. आता हळुहळू ते खुले होताहेत. नदी, समुद्र यांचे पाणी प्रवाही असते. तरणतलावाच्या पाण्याचा साठा हा एकाच जागी स्थिर असतो. पोहताना कितीही नाही म्हटले तरी हे पाणी ताेंडात जातेच. काही महाभाग स्विमिंग पूलच्या प्रसाधनगृहाचा वापर न करता त्याच पाण्यात ‘करंगळी वर”  करत असले (नव्हे, करतातच!) तर त्यावर कुणाचा आणि कसा वॉच ठेवणार? दृष्टीआड सृष्टी म्हणत ताेंड बंद करुन डुबकी मारायची एवढेच!

विविध दूरचित्रवाणी वाहिन्या तसेच विविध डिजिटल व छापील वर्तमानपत्र यातून आठवड्याचे, दैनंदिन राशीभविष्य सांगितले, प्रसिध्द केले जात असते व लोकही ते मोठ्या भक्तिभावाने वाचत असतात. पण अनेकांना यातली खरी गोमच माहीत नसते. काही वेळा एखाद्या वर्तमानपत्राकडे विशिष्ट वेळेत ज्योतिष्याने राशिभविष्याचा लेख पाठवला नाही तर त्या वर्तमानपत्राच्या कचेरीतलाच एखादा कर्मचारी मागील कुठल्यातरी आठवड्यातल्या बारा राशीच्या भविष्यांची अदलाबदल करायला बसतो आणि ते प्रसिध्द होते...व तेही लोक तेवढ्याच भक्तिभावाने वाचतातही. अशी सारी या दृष्टीआडच्या सृष्टीची गंमत आहे आणि तिने आपल्या आपल्या आयुष्यातल्या ‘अज्ञानातल्या सुखा”ची रंगत टिकवून ठेवली आहे. म्हणूनच उगाचच गंभीर व्हायचे काम नाही....!. 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुशाफिरी