काकडा १
उठा उठा साधुसंत । साधा आपुले हित ।
कोजागरी पौर्णिमा सरल्यावर गोलाकार चंद्रबिंब अस्ताला जाण्याच्या मार्गावर हळूहळू पावलं टाकीत असेल तेंव्हा महाराष्ट्रातल्या गावा-गावांत पुढच्या दिवसाची पहाट उगवते ती काकड आरतीच्या मंगल सुरांनी.
संत जागे असतात आणि जगाला जागे करण्याचा यत्न करीत राहतात. हित साधायचे असेल तर घाई केलीच पाहिजे....कारण नरदेहाची शाश्वती नाही. देह एकदा गेला म्हणजे भगवंत नावाची वस्तू प्राप्त करण्याचा प्रश्नच राहणार नाही आणि देव नाही गवसला तर पुन्हा जन्मा-मरणाच्या फे-यात गुंतून राहावे लागणार! थंडीची चाहूल लागलेली आहे....रुक्मिणीवर पांडुरंग परमात्मा सुखशयनी आहेत..पहाटेचा बोचरा वारा महाद्वारावरून येरझारा मारतो आहे. देवांना आता झोपेतून जागे करावयास हवे....पण ते धसमुसळेपणाने नव्हे...तर अगदी हळूवार! देवाच्या मुखासमोर उष्णतेचे सुख देणारी धाकटी ज्योत न्यावी...ही ज्योत जो पाहील त्याच्या हातून घडलेल्या पातकांच्या राशीच्या राशी क्षणार्धात जळून जातील. तिच्या प्रकाशाने देवाच्या डोळ्यांना जागेपणाची अनुभूती येऊ लागेल...मग ते कमलनयन हळूहळू उमलू लागतील! पण रखुमाबाई आई...आधी देवाची त्वरेने दृष्ट काढाल का? लिंबू उतरवून टाका देवाच्या देहावरून. राउळाच्या दरवाजात विविध मंगलवाद्यांचा गजर तर सुरु झालाच आहे...शंख, भेरी यांचा नाद आसमंत दणाणून सोडत आहेत....देवाची आरती आरंभ झाली आहे. आन्हिके आटोपून देव विटेवर उभे राहतील ना..तेंव्हा त्यांचे चरण अमृताच्या नजरेने पाहावेत....देवाचे परमप्रिय, लाडके भक्त नामदेवराय तर दोन्ही कर जोडोनि उभे आहेतच....चला आपणही या आनंदात सहभागी होऊयात!
उठा उठा साधुसंत । साधा आपुले हित ।
गेला गेला हा नरदेह । मग कैचा भगवंत ।१।
उठोनि वेगेंसी । चला जाऊं राऊळासी ।
जळती पातकांच्या राशी । काकड आरती देखलिया ।२।
उठोनियां पहाटे । विठ्ठल पाहा उभा विटे ।
चरण तयाचे गोमटे । अमृतदृष्टी अवलोका ।३।
जागे करा रुक्मिणीवरा । देव आहे निदसुरा ।
वेगें निंबलोण करा । दृष्ट होईल तयासी ।४।
पुढें वाजंत्री वाजती । ढोल दमामे गर्जती ।
होते काकड आरती । पांडुरंगरायाची ।५।
सिंहनाद शंख भेरी । गजर होतो महाद्वारीं ।
केशवराज विटेवरी । नामा चरण वंदितो ६
-संभाजी बबन गायके