भांडण खरं की खोटं ?
भांड्याला भांडं लागलं म्हणजे आवाज होतो. म्हणून भांडण हा शब्द तयार झाला असावा. मात्र शब्दाला शब्द लागूनसुद्धा मोठमोठे आवाज होतात म्हणून हेसुद्धा भांडणातच मोडतं. घरगुती वादांचा, नवराबायकोतल्या भांडणाचा जन्म काही एका दिवसातला कधीच नसतो. हळूहळू एकात एक कारणाची भर पडत एखाद्या दिवशी तत्कालीन कारणावरून मोठा भडका उडतो.
पुरुषप्रधान संस्कृतीतल्या संसारात प्रत्येक माणसामागे खंबीरपणे एक स्त्री उभी असते हे कितीही नाही म्हणलं तरी सर्वांना मान्यच करावं लागेल. खांद्याला खांदा लावून काम करायचं म्हणल्यावर पावलासोबत पाऊल पडलं तरच तो संसाराचा गाडा बरोबर चालणार. त्यात थोडंफार जरी जास्त कमी झालं म्हणजे आपोआपच त्याची गती कमी होणार आणि मग संसाराच्या प्रगतीवर परिणाम होणार हे त्यातलं अंतिम सत्य. बऱ्याच अंशी हे असं चित्र सगळीकडेच दिसतं पण काही ठिकाणी अपवाद पण बघायला मिळतात.
दोन-चार दिवसांपूर्वी गावातल्या गल्लीतून सहज चालता चालता जोरजोरात नवरा बायकोचा तंटा सुरू होता! भांड्याला भांडं लागलं म्हणजे आवाज होतो. म्हणून भांडण हा शब्द तयार झाला असावा. मात्र शब्दाला शब्द लागूनसुद्धा मोठमोठे आवाज होतात म्हणून हेसुद्धा भांडणातच मोडतं. आजच्या या सुरू झालेल्या भांडणातलं बरंच काही न ऐकण्यासारखं होतं. संसारातली बरीचशी जबाबदारी ती बिचारीच खांद्यावर घेत होती असं तिच्या बोलण्यातून मला जाणवलं. मी पण बऱ्याच दिवसापासून भांडण ऐकलं नव्हतं. घरगुती वादांचा जन्म काही एका दिवसातला कधीच नसतो. हळूहळू एकात एक कारणाची भर पडत एखाद्या दिवशी तात्कालीन कारणावरून मोठा भडका उडतो त्यातलाच हे आज चालू असलेलं भांडण एक प्रकार होता. रस्त्याच्या कडेला जिथं झेरॉक्सच्या दुकानात माझं काम होतं त्याच्या बाजूच्या दुकानासमोर बसायला छोटा ओटा होता म्हणून तिथं टेकलो. इथूनही स्पष्टपणे भांडण कानी पडायचं आणि दिसायचं सुद्धा! लेकराबाळांच्या संसारात आपल्या नवऱ्याने पद्धतशीरपणे घरातल्या कुटुंबप्रमुखाची जबाबदारी पार पाडावी या हिशोबाने त्याची धर्मपत्नी इतरांचे दाखले देत नवऱ्याला जीव तोडून सांगत होती. मात्र ती त्याला घालून पाडून बोलायची म्हणून त्याचा राग सारखा अनावर व्हायचा आणि पुन्हा आपण नवरा असून हतबल आहोत याची जाणीव होऊन अगदी शांत बसायचा. बराच वेळाचं त्यांचं सुरू झालेलं भांडण नंतर तुटक तुटक वाक्य होऊन कमी झालं.
मी म्हणलं बरं झालं मिटलं. तेवढ्यात शेजारची एक बाई भांडणाच्या विषयाचा पिसोरा घेऊन ह्या बाईला "जाऊ दे .. दे सोडून.”असं काहीतरी बोलली. मग तरी हिचं पित्तच खवळलं. नवरा बायकोचं भांडण मिटलं खरं; पण ह्या दोघींचंच लागलं! हिच्या नवऱ्याच्या बाजूने तू कशी बोलली? या प्रश्नावर बराच वेळ रणकंदन माजलं! तसं पाहिलं तर खरं हिने नवरा बायकोच्या भांडणात पडायलाच नको होतं. परंतु फुकटची पाटीलकी केल्यासारखं तिला ते वाक्य नडलं. इकडं नवरा केव्हाचं समोर चाललेलं ऐकत होता. आपल्यासाठी शेजारीण धावून आली; पण आपली बायको आपल्याला सारखी हिडीस-फीडीस बोलून अपमान करते असं त्याला राहून राहून वाटायचं अन् तिला ही दुसरी आमच्या भांडणात पडलीच कशी? यामुळे बायकोचं डोकं आणखी ठणकायला लागलं. शेवटी पावसालाच दया आली अन् तो जोरदार कोसळायला लागला. तो पूर्ण भिजला तरी बराच वेळ ओट्यावरच आहे त्या ठिकाणी बसलेला होता. शेवटी तिलाच कीव आली अन ्त्याचा हात धरून त्याला घरात नेलं.! शेवटी नवरा बायकोचंच भांडण म्हणायचं ते व्हायला पण दम नाही अन् मिटायलासुद्धा नाही. दुसऱ्या दिवशी तर ते हसत हसत मोटरसायकलवर बसून गेलेले पाहिले! बोला मग आता?...... ह्याला नक्की भांडण खरं म्हणावं की खोटं? -निवृत्ती सयाजी जोरी,