देव..सूर्य आणि माणूस...          

एका डोंगरावरच एक प्राचीन मंदिर, गाभारा काळोखाने गच्च भरलेला, सूर्याचा कवडसासुध्दा आत पोहचत नव्हता..अश्या दाट काळ्याभोर अंधारात काळ्याशार पाषाणाची मोठी भव्य तेजस्वी तेजपूर्ण मूर्ती! लाईट लावल्याशिवाय देव दिसायचा नाही. विजेचा भरवसा नसल्यामुळे भक्तांनी इनव्हर्टरची सोय केली. एकदा काय झाले, इनव्हर्टर खराब झाला.समोर देव असून देवाचे दर्शन होत नव्हते. दर्शन घेतल्याशिवाय परतायचे कसे? भक्तांना समजेना आता काय करायचे? यावर एका माणसाने उपाय शोधून काढला.                                                            
 सभामंडपातला दोन फूटी आरसा उचलून त्याने बाहेर आणला व उन्हात धरुन सूर्याकिरणांना परावर्तित करुन त्याने लख्ख सूर्यप्रकाश गाभाऱ्यात पोहचवला..गाभारा प्रकाशाने गच्च भरुन गेला. देवाच्या नावाचा जयजयकार झाला. दर्शन घेणे सुलभ व सोयीचे झाले.  एकदा अश्या दर्शन सोहळ्यानंतर एका छोट्या मुलाने आपल्या बाबांना विचारले,
‘बाबा,देव मोठा की सूर्य?' 

 बाबा म्हणाले, ‘देव मोठा'  

 ‘नाही! मुलगा म्हणाला, तसं असतं तर आपल्या सामर्थ्याने देवाने आपल्या गाभाऱ्यात प्रकाश निर्माण केला असता; पण तसे तर घडले नाही. सूर्याचा प्रकाश आत गेल्यावर गाभारा उजळला..मग देव मोठा कसा?'                                                                  

‘अरे खरच की!' बाबा म्हणाले, ‘देवापेक्षा सूर्य मोठा!'    

 ‘मुळीच नाही'. मुलगा म्हणाला, ‘हेही खोटेचं आहे, कारण सूर्य तर आधीही होता, पण त्याच्यात गाभाऱ्यापर्यंत पोहचण्याचं सामर्थ्य नव्हतं..माणसांनी सूर्याला गाभाऱ्यापर्यंत पोहचवलं, तेव्हा सूर्य आत गेला, मग सूर्य मोठा की माणूस?'   विचार करुन बाबा म्हणाले, ‘तू म्हणतोस ते खरे आहे..म्हणजे सगळ्यात माणूस मोठा!'

मुलगा हसला व म्हणाला, ‘मग माणूस देवळात कां जातो' बाबांना उत्तर सुचेना तसा तो म्हणाला, ‘मला माहित आहे बाबा, लोक देवाला प्रकाश देण्यासाठी देवळात येतात'..
एक छानशी शायरी आहे..

संगीत को सूनकर ग्यान नहीं मिलता                                                                              
 मंदिर में जाकर भगवन नहीं मिलता                                                                  
लोग इसलिए पत्थर को पूजते है क्यों की...
विश्वास के लायक कोई इन्सान नहीं मिलता                                                        
पण निर्मात्यापुढं नतमस्तक होत आमचे स्नेही हरिदासजी भागवत म्हणतात..  स्वर्गलोकी वास होण्या पुण्य गाठी लागते
मोक्ष हेतू साध्य होण्या ज्ञानी व्हावे लागते,
ज्याचिया सत्तेमुळे हे विश्व सारे चालते
त्या ईश्वराते अंकिण्या माणूस व्हावे लागते                                  
गुंफण : दिलीप जांभळे 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

काकडा १