चहा

 हल्ली  ‘पार्टी' हा शब्द उच्चारला की, डोळ्यासमोर उभं राहतं ते ‘एकच पेय'. पण काही ठिकाणी अजुनही ‘चहा पार्टी' होते. मोठ्या आवडीने, उत्साहाने नि एकमेकांच्या ओढीने जमा होतात सारे चहा प्यायला.  अगदी सहजपणे चला, चहा घेऊ या असं म्हटलं जातं.

अवं भावंजी, बसा की पाच मिन्टं. घोटभर चा घ्या. तंवर हे बी येतीलच की. असा आग्रह मोडून जाणं जिवावर यायचं नि तो बिनदुधाचा, गुळाचा चहा...चहा कसला, नुसती चहापूड टाकली म्हणून चहा म्हणायचं. नाही तर नुसतं गोड पाणीच की, घेतला जायचा. कारण त्या गुळापेक्षा जास्त गोडी बोलण्यात असायची आणि तो आग्रह मोडता यायचा नाही. आता मात्र चहा ही गोष्ट केवढी तरी बदलली. चहाचे प्रकार, त्याची नावं, त्यात घातलेले पदार्थ आणि तो देण्यासाठी वापरलेल्या कपबशा किंवा मग...सारं सारं बदलून गेलंय.

  शहरातून एक चक्कर मारली तर येवले चहा, नागौरी चहा, पंढरपुरी चहा, अमका चहा, तमका चहा असे शेकडो स्टॉल्स दिसतात. प्रत्येकाची चव वेगळी, भाव वेगळा नि शानही वेगळी. खरं तर चहा हे सर्वात सोपं, कमी खर्चाचे आणि शरीराला तरतरी देणारं पेय. अनेक पिढ्या चहा पीत पीत मोठ्या झाल्या. हल्ली  ‘पार्टी' हा शब्द उच्चारला की, डोळ्यासमोर उभं राहतं ते ‘एकच पेय'. पण काही ठिकाणी अजुनही ‘चहा पार्टी' होते. मोठ्या आवडीने, उत्साहाने नि एकमेकांच्या ओढीने जमा होतात सारे चहा प्यायला.
 अगदी सहजपणे चला, चहा घ्ोऊ या असं म्हटलं जातं. सर्वांना सहज परवडणारं हे पेयही आता महागडं होतंय. स्थळ काळाचा विचार करुन त्याची किंमत ठरवली जाते. काही ठिकाणी पाच दहा रुपयात मिळणारा चहा पाच पन्नासच नव्हे, तर शे दिडशे रुपयाला मिळतो नि प्यायलाही जातो. एक कपभर गुळाचा चहा नि सोबत दोनचार बटर खाल्ली की झाला ब्रेकफास्ट ! आता चहासोबत किती नि काय काय खाल्लं जातं तरीही पोट रिकामंच ! दिवसभर घोट घोट चहा घेणारी मंडळी वेळेवर चहा नाही मिळाला तर कासावीस होतात. काहीजण दिवसभरात पाण्यापेक्षा जास्त चहा पितात तर काहींना चहाच आवडत नाही. ( अर्थात पसंद अपनी अपनी !) चहाला पर्याय म्हणून मग कॉफी, कोको, कॅडबरीवालं दूध असे प्यायलं जातं. लहान मुलांना चहाऐवजी दूध दिल्याने चहाची चवच त्यांना कळत नाही.

 भ्रष्टाचाराला गोंडस असं ‘चायपानी' नाव देऊन त्यांनी चहालाच बदनाम करुन टाकलंय. चहाची चव दुस-या कुठल्याही पेयाला नाही. ( ती आधी घेतली तर पाहिजे. ) आमचे आजोबा , पणजोबा कसे चहा पीत याचं रसभरीत वर्णन त्यांचा नातू किंवा पणतू हातात कॉफीचा मग घेऊन मोठ्या ऐटीत सांगतो. चहामुळे होणारे फायदे तोटे कितीही सांगितले तरी चहाचं वेड (व्यसन नाही) कमी होत नाही आणि झालंच तर चार सहा दिवसांहून जास्त टिकत नाही हेच खरं!

इति चहापुराण समाप्तम्‌
-विलास समेळ

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

देव..सूर्य आणि माणूस...