स्त्रीचा खरा दागिना
नम्र बोलणं, सुसंस्कृत वागणं - हेच महिलांचे खऱ्या अर्थाने अलंकार आहेत. आज अनेक स्त्रिया नोकरीसाठी, व्यवसायासाठी घराबाहेर पडतात. काहींच्या आयुष्यात वेळेची कमतरता असते, तरीही त्या घर सांभाळतात, मुलांची काळजी घेतात, समाजातही आपली भूमिका पारपाडतात. अशा स्त्रिया कोणतेही दागिने न घालता देखील तेजस्वी वाटतात. स्त्रीचा खरा दागिना म्हणजे तिचं मन, तिची ममता, आणि तिचं सुसंस्कारित व्यक्तिमत्त्व. ते जपलं, तर ती कोणत्याही पोशाखात सुंदरच असल्याचे जाणवत राहते.
आज रविवार, सुट्टीचा दिवस. दोन्ही लेकरं चैत्राली व प्रज्वल घरी आलेले होते, म्हणून नेहमीपेक्षा आज घर भरलेलं दिसत होतं. मुले पटकन मोठी होतात, ते शिक्षणासाठी व नोकरीसाठी घरापासून दूर राहतात. कधीतरी सुट्टी घेऊन घरी येतात तेव्हा खूप आनंददायी वातावरण निर्माण होते. आजही काहीसे तसे वाटत होते. हे त्यांचे पाहूण्यासारखे घरी येणे मनाला सुखकर करून जाते. या अशा अवस्थेतून मी आणि मिनाक्षी जात आहोत. मी सकाळी लवकर बाजारात गेलो. भाजीपाला व इतर खरेदी उरकून घरी आलो. मुलगा प्रज्वल नेहमी संगणकावर काम करीत असल्याने त्याच्या काही दिवसांपासून डोळ्यांत कोरडेपणा जाणवत होता. यामुळे तपासणी करण्यासाठी प्रज्वलला दवाखान्यात घेऊन गेलो. दवाखान्यात थोडी गर्दी होती, पण आमचा नंबर पटकन आला.
दवाखान्यातून परत येतांना घराजवळ रस्त्याने जाणाऱ्या साधारण ४५-५० वयोमानातील एका महिलेने माझे लक्ष वेधले. त्याचे कारण होते, तीने आपल्या वयाला न शोभणाऱा पोशाख.. ती काही क्षण दिसली आणि लगेच नजरेआड झाली. मी विचारात पडलो, "ती काय घालते हे माझं काम नाही,” असं वाटलं तरीही मनात प्रश्न उभा राहिलाच. "स्त्रीचं खरे सौंदर्य नक्की कुठे आहे?” शहरात राहायचं म्हणजे अशा भेटी अपरिहार्यच. रविवारीचा दिवस, बाजाराची गर्दी, बिल्डिंगमध्ये ये-जा करणारे नवे चेहरे. सगळं नेहमीचं होतं. तरी त्या स्त्रीचं रूप, पोशाख आणि वर्तन यामुळे विचारांची दिशा बदलली. साध्या साडीत किंवा साध्या पोशाखातही अनेक स्त्रिया इतक्या देखण्या वाटतात की त्यांच्या व्यक्तिमत्त्वातूनच तेज प्रकट होतं. अशा स्त्रिया घरात आणि समाजात आदरानं वावरतात. तर दुसरीकडे, काही स्त्रिया दिखाऊपणाला प्राधान्य देतात, फॅशनमध्ये रममाण होतात, आजच्या युगात स्त्रियांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. शिक्षण, नोकरी, संपत्ती आणि निर्णयक्षमता इ. क्षेत्रांतत्या पुढे आहेत. हे आपल्या समाजाचं मोठं यश आहे. पण स्वातंत्र्य म्हणजे बंधनमुक्त जीवन नव्हे; ते जबाबदारीचं प्रतीक आहे.
काही महिलांना वाटतं की महागडे, फॅशनेबल कपडे घातले की सौंदर्य खुलतं. खरं आहे. बाह्य सौंदर्य नजरेत भरतं. पण टिकतं ते मनाचं आणि वागण्याचं सौंदर्य. साडीतली साधी स्त्री, नम्र बोलणं, सुसंस्कृत वागणं - हेच तिचं खऱ्या अर्थाने अलंकार आहेत. आज अनेक स्त्रिया नोकरीसाठी, व्यवसायासाठी घराबाहेर पडतात. काहींच्या आयुष्यात वेळेचीही कमतरता असते, तरीही त्या घर सांभाळतात, मुलांची काळजी घेतात, समाजातही आपली भूमिका पारपाडतात. अशा स्त्रिया कोणतेही दागिने न घालता देखील तेजस्वी वाटतात, कारण त्यांच्या डोळ्यांत प्रेम असतं, त्यांच्या मनात माणुसकी असते. तर काही वेळा दिखाऊपणात रमणाऱ्या स्त्रिया महागडे कपडे, साजशृंगार यामध्ये इतक्या गुंततात की साधेपणाचं सौंदर्य हरवून बसतात. पैशाचा माज, दिखावा हे क्षणिक असतं. पण सन्मान, नम्रता, आणि चांगल्या संस्कारांची झलक - हेच कायम राहणारं सौंदर्य आहे.
आजची स्त्री चुल आणि मुल या चौकटीपलीकडे गेली आहे. ती सक्षम आहे, स्वावलंबी आहे. पण तिचं खऱ्या अर्थाने सौंदर्य हे बाह्य दागिन्यांत नाही, तर तिच्या चारित्र्याच्या तेजात आहे. कारण सोनं, हिरे,मोती हे केवळ शरीराला शोभा देतात, पण संस्कार, सच्चेपणा आणि सन्मान, हेच स्त्रीचे खरे दागिने असतात. खरंच, स्त्रीचा खरा दागिना म्हणजे तिचं मन, तिची ममता, आणि तिचं सुसंस्कारित व्यक्तिमत्त्व. ते जपलं, तर ती कोणत्याही पोशाखात सुंदर दिसते, कारण तिचं सौंदर्य दिसत नाही, ते जाणवतं. - प्रा. डॉ. श्रीकृष्ण दि. तुपारे