नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासमोरील रस्त्यावरील पहिल्या अपघातात तीन वाहनाचा भीषण अपघात
मुशाफिरी
वंचितांची दिवाळी
‘वसुधैव कुटुंबकम' केवळ बोलण्यापुरते असून उपयोगाचे नाही. दुसऱ्याचे दुःखही वाटून घेता आले पाहिजे. ‘घरघरमे दिवाली है मेरे घरमे अंधेरा' अशा स्थितीतील काही कुटुंबे अवती भवती आहेत. तर काही ज्येष्ठ नागरिक त्यांची मुले-बाळे कायमची परदेशात जाऊन बसल्यामुळे त्यांच्या प्रेमाला वंचित झाली आहेत. केवळ पैसे, मिठाया, गोडधोड देऊनच नव्हे, तर आपला सहवास देऊनही अशांची दिवाळी आपण गोड करु शकतो.
दिवाळी आता केवळ काही दिवसांवर आली आहे. एक काळ असा होता की लोक दिवाळीकडे डोळे लावून बसत. कारण एरवी वर्षभरातील इतका आनंद देणारा सण त्यांच्या ठायी दुसरा नसे. रामाने रावणावर विजय मिळवला, अयोध्येला राम, सीता, लक्ष्मण व वानरसेना परतले म्हणून दारात रांगोळ्या, घरावर आकाशकंदील लावणे, घरी गोडधोडाचा फराळ बनवणे एवढ्याच मर्यादित कारणासाठी साजरा करण्याचा हा सण अनेकांसाठी कधीच नव्हता. अनेकांना रामायणाचीही पुरी माहिती नसे. तरीही दिवाळी साऱ्यांना आवडे, आवडते. पण हल्ली मोठमोठे मॉल्स, सोन्याचांदीची दुकाने, तारांकित हॉटेले, महागडी तिकिटे काढून बघायचे विविध खेळांचे सामने इत्यादी ठिकाणच्या गर्दीवर नजर टाकली तर अनेकजण मौजमजेसाठी दिवाळीची अजिबातच वाट पहात नाही असे लक्षात येते.
अंधारावर प्रकाशाने विजय मिळवल्याचा सण, आपले आयुष्य उजळून टाकणारा उत्सव, भारतवर्षातील सर्वाधिक लोकसंख्येकडून मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा सण, नात्यागोत्यातील सर्वांनी एकत्र येऊन आनंद घेण्याचा सण, घरादाराची साफसफाई करुन आपले घरकुल सुंदर करण्याचा सण, भावा-बहिणीच्या नात्याचा गोडवा वृध्दींगत करणारा सण, थोरा-मोठ्यांच्या गळाभेटी घेत त्यांचे आशीर्वाद मिळवण्याचा व त्यांच्या निरोगी, निरामय दीर्घायुष्यासाठी अभिष्टचिंतन करण्याचा सण म्हणजे दिवाळी अशी या दिवाळीची पारंपारिक ख्याती आहे. या दिवाळीला चॅलेन्ज करणारा दुसरा अखिल भारतीय सण अजूनतरी दृष्टीपथात नाही.
आपल्याकडे फ्लॅट, बंगला, अपार्टमेण्ट, टॉवर, ड्युप्लेवस बंगला, पेंट हाऊस संस्कृती अवतरण्यापूर्वी चाळी, वाडे, बैठी कौलारु घरे यांचे प्राबल्य होते. घरांचे बंद दरवाजे, त्यांच्यावर आणखी लादलेले लोखंडी ग्रिलचे दरवाजे, कोण आलंय हे घरातूनच पाहण्यासाठी दरवाजाला असणारे भिंग लावलेले भोक, त्याचप्रमाणे ‘हे घर सीसीटिव्हीच्या निगराणीखाली आहे', ‘कुत्र्यापासून सावधान' अशा धमकीवजा सूचना या साऱ्यांनी माणसांनी माणसांवर संशय घ्यायला सुरुवात केली आणि माणसे माणसांना पारखी झाली. दिवाळी हा एकत्र येण्याचा सण आहे. तुटक वागण्याचा, अलिप्त राहण्याचा, स्वतःला इतरांपासून तोडण्याचा, बाकीच्यांना तुच्छ लेखून आपणच कसे ग्रेट आहोत हे भासवण्याचा नव्हे. अंगण करणे, त्यासाठी घरासमोरचे जुने अंगण खोदणे, नवीन मुरुम-माती आणणे, ते सारे मिश्रण एकत्र करुन चोपण्याने चोपून काढणे, मग छानपैकी सारवणे, त्यावर मग रांगोळ्या रेखणे या साऱ्यात एक वेगळे काव्य होते. बांबूच्या काड्या जमवून घरच्या घरीच आकाशकंदील बनवणे, दारांवर रोषणाई करणे, लवकर उठून अभ्यंगस्नान करुन नवे कपडे परिधान करणे या साऱ्यात अनोखा आनंद घेणारी पिढी आता वृध्दत्वाकडे झुकत चालली आहे. आता यांची पुढची पिढी त्यांना घरबसल्या सारे आणून देत असते. कुणालाही कुठेही त्यासाठी जाण्याची गरज विज्ञान तंत्रज्ञानाने जवळपास संपुष्टात आणली आहे.
विज्ञान तंत्रज्ञानाचा विषय निघाला म्हणून सांगतो... विज्ञान तंत्रज्ञानाने काही गोष्टी संपवल्या...तशाच काही गोष्टी विस्तारून ठेवल्या. आजमितीस साठीचे असलेल्या व त्यापुढचे वय असलेल्यांच्या बालपणीची दिवाळी ही (काही सन्माननीय अपवाद वगळता) त्यांचे कुटुंबिय, शेजारी, नातेवाईक, मित्रपरिवार यांच्यापुरती मर्यादित असे. माहिती तंत्रज्ञानाचा विस्फोट झाला, जग हे एका खेड्यासारखे वाटू लागले, इंग्लंड, अमेरिका, अफगाणिस्तान, युक्रेन येथील घडामोडी घरच्या घरी बसल्याजागी समजू लागल्या. जगातील संकटग्रस्तांची त्यांच्यावरील संकटांची माहिती कळू लागली. त्यांना जगभरातून थेट तेथवर न पोहचताही मदत करता येते हेही समजले. मग आपल्याच देशातील काही वंचित घटकांची अंधारलेली दिवाळी कशी गोड करता येईल याचा विचार पुढे आला आणि त्यासाठी विविध सेवाभावी, स्वयंसेवी संस्था पुढे सरसावल्या मग नियतीने ज्यांच्या पदरात चांगले भरघोस दान आधीच टाकले आहे त्यांनी नियतीने, यंत्रणांनी, व्यवस्थेने अन्याय केलेल्या घटकांना मदत करण्याची कल्पना प्रत्यक्षात उतरवली गेली. प्रत्येकाला काही विनोबा भावे, बाबा आमटे, अनिल अवचट, अभय-राणी बंग, पद्मश्री डॉ रविंद्र आणि सौ स्मिता कोल्हे, सिंधुताई सपकाळ, सयाजी शिंदे, मकरंद अनासपुरे, नाना पाटेकर बनता येईलच असे नाही. पण त्यांनी दाखवलेल्या रस्त्यावर काही पावले तर नक्कीच व निश्चितपणे चालता येण्यासारखे आहे. पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, सधन वर्गातील काही घटक, चांगला जनसंपर्क असलेल्या व्यवती एकत्र आल्यास वंचितांसाठी भरघोस काही करता येऊ शकते, याचा मी गेली अनेक वर्षे अनुभव घेत आहे.
नवी मुंबईत नेरुळ येथे असणारी युथ कौन्सिल नेरुळ ही संस्था, ज्येष्ठ नागरिक भवन-नेरुळ, चेंबूर येथील पंचरत्न मित्र मंडळ, रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुवयामध्ये घराडी या दुर्गम भागात असलेली स्नेह-ज्योती निवासी अंधशाळा, पनवेल तालुवयातील चिंचवली येथे असणारी वनवासी कल्याण आश्रमशाळा, बदलापूर येथील संयोगिता ही मतिमंदांसाठी काम करणारी संस्था, शांतिवन-नेरे येथील कुष्ठरोग पिडीतांसाठी काम करणारी संस्था, उरण तालुवयातील चिरनेर गावात २५५ मुलांसाठी चालवली जाणारी अनुदानित प्राथमिक आश्रमशाळा यांच्याशी माझा गेली वीस वर्षांहुन अधिक काळ या ना प्रकारे संबंध आला आहे. तेथील दिवाळी कशी असते हे मी तेथे उपस्थित राहुन अनुभवले आहे. विविघ घटक तेथे जाऊन त्यांच्या आनंदात सामील होताना या वंचितांच्या चेहऱ्यावरचा आनंद मी न्याहाळला आहे. हल्ली स्वतःची शिकलेली मुले-मुली इंग्लंड, अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया अशा ठिकाणी आणखी उच्च शिक्षणासाठी व गलेलठ्ठ पगाराची नोकरी करण्यासाठी कर्ज काढून पाठवण्याची टूम आली आहे. पैशाच्या अतिरिक्त हव्यासातून परक्या देशात पाठवलेली ही मुले बापाचे सारे कर्ज फेडतात, आईबापाला तिकडून पाठवलेल्या पैशांनी समृध्द करतात हे खरे..पण ही मुले (शक्यतो) परत भारतात येत नाहीत. त्यांना स्वतःची जन्मभूमी भारत एक डर्टी, भ्रष्ट, शिक्षित मुलांच्या गुणवत्तेला न्याय न देणारा भंगार देश वाटतो. मग ती परक्या देशातच आपला जीवनसाथी निवडतात आणि तिकडेच स्थायिक होतात. मी अनेक वृध्दाश्रमांतून अशा मुलामुलींचे आईबाप बघितले आहेत. जे वृध्दाश्रमात गेले नाहीत ते स्वतःच्याच घरात एकाकी बनून दूरदेशी असलेल्या मुला-सुनेच्या-नातवंडांच्या फोटोफ्रेमवर हात फिरवत अश्रु ढाळताना दसरा-दिवाळी, होळी, गणपतीला मी बघितले आहेत. यांचीही दिवाळी तशी काळवंडलेलीच असते. पैसा आहे, सुबत्ता आहे, नोकरचाकर आहेत, घरही कपडेलत्ते-दागदागिने-धनधान्याने-संपत्तीने भरलेले आहे..पण त्याचा भोग घ्यायला जवळचे कुणीच नाही...अशांचीही दिवाळी एका अर्थाने वंचितांचीच दिवाळी असते.
अलिकडे समाजमाध्यमांमुळे कुठे मदत हवी आहे हे विविध संस्थांना नेमकेपणाने समजते. ९ ऑवटोबरला चेंबूरच्या पंचरत्न मित्र मंडळासमवेत कल्याण तालु्वयातील आंबिवली येथील जेतवननगर आदिवासी वसाहतीत दिवाळीसाठी धान्य, तेल, कपडे, मुलांना खाऊ वाटपाच्या कार्यक्रमाचा पाहुणा म्हणून जाण्याचा योग आला. आदिवासी-कातकरी समाजातील त्या घटकांपर्यंत शिक्षणाची गंगा व्यवस्थित पोहचली नाही किंवा त्यांच्यातील अनेक व्यसनासवत घटकांनी चांगल्या संधीचा लाभ घेण्यातील योजकता दाखवली नाही हेही मी पाहिले. १२ ऑक्टोबरला चिरनेर येथील अनुदानित प्राथमिक आश्रमशाळेला लायन्स क्लबच्या माजी महिला पदाधिकाऱ्यासोबत भेट दिली. तेथेही सुमारे २५५ मुलेमुली राहुन शिक्षण घेत आहेत. त्यांच्यासाठी लवकरच मोठे कुकर, मिक्सर, मोठी भांडी, चाळणी, भाते अशी स्वयंपाकासाठी लागणाऱ्या चीजवस्तूंची भेट दिली जाणार आहे. काही वर्षांपूर्वी युथ कौन्सिलतर्फे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामधील माळीण गावात अतिवृष्टीमुळे डोंगर कोसळून आप्तस्वकीय मृत्यु्ुमुखी पडलेल्या कुटुंबियांना दिवाळीनिमित्त भेटवस्तू, कपडे, भांडी, मिठाई घेऊन जाण्याचा योग आला होता.
फटाक्यांच्या प्रदूषणाबाबत बोलणारेच खूप! प्रत्यक्षात फटाकेबाजीचा कायमचा त्याग करणारे किती? मी १९८६ नंतर कधीही फटाके वाजवले नाहीत. त्यासाठी येणारा खर्च मी अशा सेवाभावी संस्थांद्वारे वंचितांपर्यंत जाणाऱ्या मदतीसाठी वापरत आलो आहे. फटावयांचा फुकाचा आवाज, त्याने होणारे ध्वनि व वायु प्रदूषण, त्यामुळे तुमच्या आमच्या कानांचे व श्वसनयंत्रणांचे होणारे नुकसान याहुन कैकपटीचे व उच्च दर्जाचे सामाजिक बांधीलकीचे समाधान अशा मदतीतून लाभत असते. तुम्हाला याबद्दल काय वाटते?