नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासमोरील रस्त्यावरील पहिल्या अपघातात तीन वाहनाचा भीषण अपघात
मुशाफिरी ; का वाढतेय बालगुन्हेगारी ?
आपल्या पोटच्या गोळ्यांना खस्ता खात वाढवून, त्यांच्यासाठी हालअपेष्टा सहन करुन त्यांना चांगले जीवन जगता यावे म्हणून स्वतः काबाडकष्ट करीत वाढवल्यानंतर त्यातलीच काही दिवटी मुले मोठी झाल्यावर त्यांच्या जन्मदात्यांना त्यांनीच बांधलेल्या घरातून म्हातारपणी हाकलून देतात, त्यांची रवानगी वृध्दाश्रमात करतात असे आपण अनेकदा ऐकत, वाचत, पहात आलो आहोत. शेजारपाजाऱ्यांवर हल्ले करणारी, लुटमारी करणारी अल्पवयीन मुले वाढत्या संख्येने पहायला मिळताहेत हे कसले बरे लक्षण?
दिवाळीचा ‘माहौल' अजून अवतीभवती भरुन राहिला आहे. सुशिक्षितांचे शहर म्हणून नावाजलेल्या नवी मुंबईत शिकलेल्या काही लोकांनी भरपूर ध्वनी प्रदूषण केले; आजारी, वृध्द, उपचार घेत असलेल्या लोकांचा, गरोदर महिलांचा विचार न करता मनसोत्त ‘आवाजी' फटाकेबाजी करुन व शहरभर कचरा करुन आपण किती ‘शिकलेले' आहोत याचा पडताळा दिला, तर तुलनेने कमी शिकलेल्या, परिस्थितीमुळे पुढे जाऊ न शकलेल्या असंघटित सफाई कामगारांनी तोच कचरा लगोलग उचलला. तरीही यंदा नवी मुंबईतील खराब हवेची पातळी दिवाळीच्या दिवसात ‘वाईट' या टप्प्यावर पोहचली होती.
शेजारच्या उल्हासनगरमध्ये एका दिड शहाण्याने इमारतीच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या लोकांच्या घरात खिडकीमार्गे जाऊन फुटतील अशा पध्दतीने रॉकेट फटाके खाली रस्त्यावरुन सोडून दाखवले. गोवंडीमध्ये ‘आवाजी फटाके आमच्या घराजवळ का वाजवता?' म्हणून एका तरुणाने हटकले. तर ज्याला हटकले त्याने आणखी साथीदार सोबत आणले व त्या तरुणावर चाकुहल्ला करुन त्याची हत्या केली. आईने मोबाईल वापरु दिला नाही म्हणून अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना नवी मुंबईत घडल्याला अजून एक महिनाही झाला नाही. तर आई मोबाईल देत नाही म्हणून तिचाच खून केल्याच्या घटना मुंबई व परिसरात वाढत्या आहेत. या साऱ्या हल्लेखोर आरोपींमध्ये अल्पवयीन मुलामुलींचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. अलिकडे शाळकरी मुलेही आपल्या आईवडिलांवर हल्ले करुन त्यांना ठार मारतात, जखमी करतात, अपंग, गलितगात्र करुन ठेवतात अशा प्रकारच्या घटना वाढीस लागल्या आहेत. अशा प्रकारच्या गुन्हेगारीविषयक घडामोडीचे वृत्त आम्हा पत्रकार मंडळींकडे आमच्या विविध वार्ताहरांकडून, पोलीसांच्या प्रसिध्दीपत्रकांमधून येते तेंव्हा मात्र छातीत धस्स होते. गुन्हे, अपराध, समाजकंटकी वर्तन, गैरवागणूक, विवृÀती इत्यादी स्वरुपाचे वागणे असणाऱ्यांचे वय कमी कमी होत चालले आहे हेच खरे !
अल्पवयीनांकडून केल्या जाणाऱ्या गुन्हेगारी स्वरुपाच्या वर्तनाला इंग्रजीत ‘जुवेनाईल डेलिन्ववन्सी' असे नाव आहे. या अल्पवयीनांची व्याख्या विविध देशात वेगवेगळी असून त्यासाठीचे वयही कुठे २०, कुठे १७, कुठे १४, कुठे १२ वर्षांखाली असले पाहिजे असे दंडक आहेत. भारतात अनेक ठिकाणी घडून आलेल्या चोरी, डाके, बलात्कार, पाकिटमारी, प्राणघातक हल्ले अशा प्रकारच्या गैरकृत्यांत ही अल्पवयीन मुले सामील असल्याचे विविध पोलीस स्टेशनचे रेकॉर्ड सांगते. सरकार, न्यायालये, उदारमतवादी संस्था, मानवाधिकारवाले, दयाळू व्यवितमत्वे या प्रकारच्या अल्पवयीन गुन्हेगारांची पाठराखण करीत असतात. त्यामुळे या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात नेहमीच अडचणी येतात. दादा काेंडके निर्मित दिग्दर्शित ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या' चित्रपटात एक संवाद आहे. त्यात नायिका ही नायकाला (म्हणजे छोटू - दादा काेंडके यांना) सांगते की, ‘त्यांचं वय लक्षात घ्ोता त्यांना कठीण सजा नसावी...'
यावर छोटू चटकन उद्गारतो .., ‘वय? मग या वयात ते शान (शेण) बरं खात नाहीत?'
मला वाटतं की हे उद्गार सर्वसामान्यांचे प्रतिनिधित्व करणारे आहेत. हे असं का होतं? एवढ्या कमी वयात ही मुलं गुन्हेगारी करु का पाहतात? काही गुन्हेगारीतच अडकलेली कुटुंबे किंवा चोऱ्या-माऱ्या हेच ज्यांचे जीवन आहे अशा परिवारातील मुलं-मुली सोडल्यास अन्य कुटुंबांत कुणीही आपल्या मुलांना चोर, डाकू, दरोडेखोर, पाकिटमार बनावं असे संस्कार करत नसतात. पण तरीही काही कुटुंबांत अशी मुले पहायला मिळतात. याचं काय बरं कारण असावं? कारण...संगत, वातावरण, कुणासोबत ही मुले वावरतात, त्यांना कोणते पर्यावरण लाभते, त्यांचे रोल मॉडेल कोण आहेत, आईवडिल-आजी-आजोबा-काका-मामा आदिंचा त्यांच्यावर योग्य प्रभाव आहे का ? या प्रश्नांच्या उत्तरात हे कारण दडलेले आहे. अनेक ठिकाणी सरसकट सिनेमा, मालिका, मोबाईल, सोशल मिडियाकडे बोट दाखवून लोक मोकळे होतात. कारण ते सोप्पे आहे व त्याने आपल्यावरची जबाबदारी सहज झटकता येते. केवळ सिनेमा, मालिका, मोबाईल एवढेच कारण मुलं गुन्हेगार होण्यामागे असते तर छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, श्यामची आई, भगतसिंग, महाराणी पद्मिनी, डॉ तात्याराव लहाने आदिंवरही सिनेमे आलेच की! पोलीसी चातुर्याने विविध गुन्ह्यांची उकल करुन दाखवणाऱ्या एक शून्य शून्य, सी आय डी, क्राईम पेट्रोल अशाही मालिका आल्या; सोशल मिडियावर संतसंगत-सद्वर्तन, सुविचार, शुभसंदेश यांच्याही पोस्ट्स असतातच की! मग या गु्न्हेगार बनू पाहणाऱ्यांनी त्यातून चांगले ते का नाही स्विकारले? पालक बनलेल्या पिढीला ते नोकरी-व्यवसायात असताना घरी-बाहेर आपली मुले काय करतात, हे पहायला वेळ नाही; आजी-आजोबा बनलेल्या पिढीला नातवंडे दाद देत नाहीत, काका-मामा-आत्या-मावशी-शेजारपाजारची ज्येष्ठ/वरिष्ठ व्यवितमत्वं अशा उपयुवत घटकांचे अनेकांच्या आयुष्यातून जवळपास उच्चाटण झालेले आहे. ‘आमचं पोरगं कुठे चुकलेलं दिसलं तर चारचौघात त्याचे खुशाल कान उपटा' असे आजूबाजूच्यांना सांगणारीही एक पिढी होती..त्यांचं हे सांगणं त्यांच्याबरोबरच काळाच्या पोटात गडप झालं आहे. त्यामुळे मुलांवर वचक असणारे, त्यांना चांगले-वाईट काय ते सांगणारे कुणी उरले नाही..मग वेगळे काय घडणार?
माझ्या डोळ्यासमोर घडलेल्या दोन घटना येथे नमूद कराव्याशा वाटतात. भाऊबीजेच्या दिवशी बँकेच्या ए टी एम मधून पैसे काढायला गेलो होतो. एरवी असणारा तेथील सुरक्षा रक्षक गायब होता. एक ग्राहक व एक जोडपे आतमध्ये होते. त्या जोडप्याची चार-पाच वर्षाची मुलगी तेथील एका ए टी एम ची बटणे वाट्टेल तशी दाबत त्यावर जणू खेळत होती. मला न राहवल्याने मी त्या जोडप्याला म्हणालो.. ‘अहो, अशी मुलं ए टी एम शी खेळायला सोडू नका. ते बिघडले, बंद पडले तर बाकी ग्राहकांची पंचायत होईल, गैरसोय होईल, सणासुदीला सुट्टीमुळे बँका बंद असल्याने दुरुस्तीलाही वुÀणी येऊ शकणार नाही. त्या मुलीला आवरा जरा.' त्यावर त्या मुलीची महान माता मला म्हणाली...‘जाऊ द्या हो..लहान मुलीला काय कळतं?' मी म्हटले, ‘ते मलाही कळतं..लहान मुलीला काही कळत नाही. पण तिच्या आईवडिलांना तिला आवरायचं तरी कळतं की नाही? मोठी झाल्यावर ही मुलगी तुमच्या शिस्तीअभावी कशीही बेताल वागेल..' त्यावर मात्र ते जोडपे निरुत्तर झाले व आपले पैसे काढून होताच मुलीला बखोटीला मारत तेथून चालते झाले. ‘तुमच्या मुलांचं वर्तन बेजबाबदारपणाचं आहे' असे लक्षात आणून देणारेही जवळपास हवेत. ते नसले तर मुलं करतात ते सगळंच ठीक असा समज पालकांचा होतो व कच्ची मडकी असलेल्या मुलांचं तर काय सांगावं? दुसरं उदाहरण प्रवासातलं आहे. नवी मुंबईत एन एम एम टी या स्थानिक परिवहन सेवेशी बेस्ट ची स्पर्धा आहे. प्रवासी वाढावेत म्हणून बेस्टने किमान तिकिट ५/- रु ठेवले आहे. तर एन एम एम टी चे मात्र ७/- रु. आहे. अकरावी-बारावीत असेलशी वाटणारी एक मुलगी एन एम एम टी बसमध्ये चढली व कंडवटरकडे तिकिट मागितले. ते त्याने दिल्यावर तिने पाच रुपये देऊ व्ोÀले. आधीच्या प्रवाशांनी डोव्ोÀ खाल्ल्याने वैतागलेला कंडवटर म्हणाला, ‘तुला लिहिता वाचता येते की नाही? ही बेस्टची नव्हे, एनएमएमटीची बस आहे. आमच्याकडे किमान ७/- रु तिकीट आहे.' यावर ती म्हणाली, ‘बार कोड द्या. मी पे फोन ने तिकीट काढते.' त्याने सांगितले, ‘बार कोड माझ्या सोबत आता नाही. तु ७/- रुपये दे.' यावर त्या मुलीने कंडवटरलाच अर्वाच्च भाषा वापरायला सुरुवात केली. मग अन्य ज्येष्ठ प्रवाशांनी त्या मुलीला झापले. एका ज्येष्ठ सहप्रवाशाने वरचे दोन रुपये कंडवटरला दिले आणि वाद मिटवला.
या प्रकारच्या ‘सोशल पोलिसिंग' चा अभाव व प्रसंगी मध्ये न पडता ‘जाऊ दे ना..मला काय त्याचे?' या प्रकारची स्वतःपुरतेच पाहण्याची वृत्ती यामुळेही अल्पवयीनांचे गुन्हेगारी वर्तन वाढतेय का? बघा विचार करुन..!