अत्रे नाट्यगृहात मुदत संपलेल्या कोल्ड्रिंकची विक्री

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिरात मुदत संपलेल्या कोल्ड्रिंकची विक्री सुरु असल्याचा गंभीर प्रकार नागरिकांनी उघडकीस आणला आहे. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून याबद्दल नागरिकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

‘केडीएमसी'चे आचार्य अत्रे रंगमंदिर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात असते. असाच एक प्रकार १८ सप्टेंबर रोजी गुजराती नाटकादरम्यान मध्यंतरावेळी घडला. नाट्य रसिक कोल्ड्रिंक घेण्यासाठी कॅन्टीनमध्ये गेले असता त्या ठिकाणी एक्सपायरी डेट संपलेल्या कोल्ड्रिंकच्या बॉटल्स त्यांना देण्यात आल्या. कॅन्टीनच्या फ्रिजमध्ये असलेल्या बॉटल्सची देखील एक्सपायरी डेट संपलेली होती. यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा सदर प्रकार असल्याचे सांगत नागरिकांनी संताप व्यक्त केला. या घटनेमुळे अत्रे रंग मंदिराच्या व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर आला असून महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.  याप्रकरणी केडीएमसी प्रशासनाने लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

याबाबत अत्रे नाट्यगृहाचे व्यवस्थापक माणिक शिंदे यांना विचारणा केली असता, सदर घटना कळताच आपण कॅन्टीनमध्ये आलो. काय झालं आहे याची माहिती घेऊन नागरिकांना शांत रहाण्याचे आवाहन केले. यानंतर सदर प्रकार वरिष्ठांना कळवला. पोलिसांना देखील याबाबत तक्रार दिली असून पोलिसांनी जवाब नोंदवला आहे. नाट्यगृहातील उपहारगृहाचा ठेका ५ वर्षांसाठी दिला जातो. सदर ठेका देताना अटी-शर्ती दिलेल्या असतात, यांचे पालन करुन उपहारगृह चालवायचे असते. या प्रकरणात संबंधित ठेकेदार दोषी आढळल्यास आयुक्तांच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात येईल, असे माणिक शिंदे यांनी सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘सर्वपित्री अमावास्या'साठी लागणाऱ्या भाज्यांची शोधाशोध?