सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा! अर्थात नॅशनल सिक्युरीटी गार्ड!  

सर्वत्र, सर्वोत्तम आणि सुरक्षितता या तिन्ही शब्दांना प्राणांचे मोल देऊन जागणारी भारतीय सेनेची ताकद म्हणजे  National Security Guard N.S.G. ! संपूर्ण भारतातील सर्व प्रकारच्या सैन्यातून या दलासाठी सर्वोत्तम सैनिक निवडले जातात. यांना ब्लॅक कॅट कमांडोज म्हणूनही ओळखले जात असले तरी या दलात वाघाच्या काळजाच्या जवानांचा समावेश असतो, यांची चाल सिंहाची तर झडप चित्त्याची असते! हे शत्रूवर वीजेसारखे कोसळतात आणि त्याची राखरांगोळी केल्याशिवाय ह्यांची मोहिम संपत नाही!  ही कथा आहे या बहाद्दरांनी फत्ते केलेल्या असंख्य मोहिमांपैकी एका मोहिमेची!

   गुजरातमधील गांधीनगर येथे असलेले अक्षरधाम मंदिर!  दिवस आहे २४ सप्टेंबर, २००२! सायंकाळचे पावणेपाच वाजलेत. मंदिरात शेकडो स्त्री-पुरूष भक्तमंडळी आपल्या लहानग्यांसोबत दर्शन, प्रार्थनेसाठी एकत्रित झालेले आहेत.गर्दी वाढतच चाललेली आहे. याच गर्दीतून दोन राक्षस पाठीवरल्या हॅवरसॅक्समध्ये अत्याधुनिक शस्त्रे घेऊन मंदिर-परिसरात दाखल झाले. देवळात राक्षसही येऊ शकतात हे भक्तांच्या गावीही नव्हते. सुरक्षारक्षकांना हूल देत, तिथल्या जाळीवरून उड्या मारून मुख्य मंदिराच्या बाहेरील माणसांवर बेछूट गोळीबार करीत दोन अतिरेकी या भव्य मंदिरात घुसले. एका महिलेच्या पायांत गोळ्या लागून ती खाली कोसळली, सोबत तिची तीन वर्षांची मुलगी आणि चार वर्षांचा मुलगा होता. अतिरेक्यांनी या मुलांवर गन रोखल्या...त्या मातेने तशाही स्थितीत हात जोडले...माझ्या मुलांना तरी मारू नका हो....तिने आकांत मांडला...त्या दोघा अतिरेक्यांनी ‘बरं  म्हणून माना हलवल्या आणि रायफलचा ट्रिगर दाबला...दोन्ही मुलांच्या कोवळ्या देहांतून गोळ्या आरपार गेल्या...ती बालके जखमी आईच्या कुशीत निष्प्राण होऊन पडली आणि देवाच्या साक्षीने देवाघरी गेली! दहशतवाद्यांना कुठली आलीये दया आणि त्यांना तरी आपण दया का दाखवावी?

हल्लेखोर मुख्य मंदिरात प्रवेश करण्याच्या उद्देशाने हातबॉम्ब फेकत आणि वाटेत दिसेल त्याच्यावर गोळीबार करीत पुढे निघाले. मंदिराच्या व्यवस्थापक श्री.खोडसिंह जाधव आणि त्यांच्या सहका-यांनी जीवाच्या आकांताने २०० फूट धाव घेत मुख्य १५ फुटी दरवाजा बंद केला. आतमध्ये सुमारे ३५ भक्त होते..ते बचावले!  मंदिरात हल्लकल्लोळ माजला. गोळीबार सुरू होऊन तीन मिनिटे झाली होती. तिस-या मिनिटाला साधू विश्वविहारी स्वामी यांचा गुजरात राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात तातडीचा संदेश गेला. यंत्रणा त्वरीत हलली. काही मिनिटांतच पोलिस, राज्य कमांडो दलातील जवान मंदिर परिसरात दाखल झाले. मंदिराबाहेरील जनसमुहाने मंदिराच्या प्रवेशद्वारात मोठी गर्दी केली होती.  

   मुख्य मंदिरात घुसण्याचा मार्ग बंद झालेला पाहून या दोघांनी शेजारच्या प्रदर्शन सभागृहांकडे मोर्चा वळवला, पण तेही स्वयंसेवकांनी चपळाईने बंद करून घेतले होते. अतिरेकी सभागृह क्र.१मधील मंदिर-चित्रपटप्रदर्शन कक्षाचा मागील दरवाजा तोडून आत घुसले. या कक्षात अक्षरधामचे आराध्य दैवत स्वामीनारायण भगवान यांच्या जीवनचरित्राचे चित्रपट-दर्शन सुरू होते, आत अनेक माणसं होती..अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. अनेकजण जागेवरच गतप्राण होऊन पडले! अतिरेकी या सभागृहातून आल्या मार्गी परत फिरले. तोपर्यंत गुजरात पोलिस आणि गुजरात कमांडो मंदिरात दाखल झाले होते, त्यांना पाहून दोन्ही अतिरेकी भिंत चढून वरच्या परिक्रमामार्गात लपून बसले. पोलिसांनी लोकांना बाहेर काढले, तर स्वयंसेवकांनी जखमींना इस्पितळात न्यायला सुरूवात केली. पोलिस कमांडोजनी अतिरेक्यांचा शोध घेण्यास सुरूवात करताच लपलेल्या त्या दोघांनी त्यांच्यावर वरून गोळीबार केल्याने, कमांडोजना मागे सरावे लागले आणि अतिरेकी तिथून निसटले. सुदैवाने या गोळीबारात कुणाला काही झाले नाही. अतिरेक्यांचे मंदिराबाहेर जाण्याचे मार्ग पोलिसांनी रोखून धरल्याने अतिरेक्यांना बाहेर पळता आले नाही. तोपर्यंत मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवानी यांचेशी संपर्क साधून एन.एस.जी.कमांडोज पाठवण्याची विनंती केली. दिल्लीतून तातडीने निघून रात्री सव्वादहा वाजता ३५ कमांडोजची तुकडी आपल्या विशेष आयुधांसह कर्नल तुषार जोशी साहेबांच्या नेतृत्वात मंदिरात पोहोचली!

त्यांनी ऑपरेशनचा ताबा घेतला. एन.एस.जी. कमांडो सर्वांत पुढे होते..राज्य कमांडो आणि स्थानिक पोलिस दुस-या आणि तिस-या फळीत सज्ज थांबले. आता अतिरेक्यांच्या  आयुष्याची उलटी गिनती सुरू झाली! आता लपून बसलेल्या लांडग्यांच्या शिकारीसाठी एन.एस.जी.चे वाघ मैदानात उतरले होते.

   सर्व योजना आखून एन.एस.जी.ने अतिरेक्यांची शोधमोहिम सुरू केली. रात्र वाढत चाललेली होती. अतिरेकी कुठूनही गोळीबार करू शकत होते. जवानांना जपून पावले टाकावी लागत होती, कारण शत्रू लपून बसला होता. मध्यरात्री साडेबारा वाजता दोघाही अतिरेक्यांनी परिक्रमा भिंतीवरून उड्या मारल्या आणि एका स्वच्छतागृहात शिरले. पण अंधारामुळे काही अंदाज येत नव्हता. आपली पोझिशन कळू नये म्हणून अतिरेक्यांनी गोळीबार थांबवला...पण त्यांच्या दिशेने गोळीबार करीत राहून त्यांना उलट गोळीबार करायला भाग पाडले गेले, जेणेकरून त्यांच्याकडील दारूगोळा संपत जावा! त्यातील एक नंतर बाहेर पडून तिथल्या नर्सरीमध्ये घुसला. दुसरा आणखी कुठे पसार झाला समजेना. नर्सरीतल्या झुडपात लपून बसलेला अतिरेकी तेथून गोळीबार करू लागला; पण त्याच्या रायफलमधून उडालेल्या ठिणग्यांनी त्याची पोझिशन स्पष्ट झाली! त्याचे दिवस भरले...कारण या मोहिमेचे नेतृत्व करणारे कर्नल तुषार जोशीसाहेबांना तो दिसला. नर्सरीच्या भिंतीच्या आडोशाला जोशीसाहेब आणि त्यांचा सहाय्यक कमांडो सुरजन सिंह भंडारी काही सेकंद थांबले आणि त्यांनी भिंतीवरून खाली उड्या घेण्याचा निर्णय घेतला. या प्रयत्नात ते असतानाच अतिरेक्याने ही हालचाल पाहिली व हेवी फायर केला. सुरजन सिंह भंडारी साहेब डोक्यात गोळ्या शिरून खाली कोसळले. जोशीसाहेबांनाही गोळ्या लागल्या...पण त्या जीवघेण्या नव्हत्या...साहेब डगमगले नाहीत...पण क्षणभर थबकले..इथं दुःख करत बसायला वेळ नव्हता....त्यांनी सुरजन सिंह यांना जागेवरच (सीपीआर) प्राथमिक उपचार दिल;  पण सुरजन सिंह यांची शुद्ध हरपली होती! त्यांना तेथून उपचारांसाठी नेले जाण्याचे आदेश जोशीसाहेबांनी दिले.

    साहेबांचे दुसरे तरणेबांड साहाय्यक दुर्गा प्रसाद डिमरी जोशी साहेबांच्या मदतीला धावले. ”बेटे दुर्गाप्रसाद, इस टेररिस्ट्‌ने हमारा आदमी गिराया है...हम उसे अब जिंदा नहीं छोडेंगे! "कमांडो....” अशी गर्जना करीत त्या दोघांनी भिंतीवरून उड्या टाकत, हातबॉम्ब फेकत, गोळीबार करत अतिरेक्याच्या दिशेने धाव घेतली आणि नर्सरीच्या झाडांत लपलेल्या दुष्टावर प्रचंड आवेशात गोळीबार केला आणि त्याला ‘उसके अंजाम तक पहुँचा दिया!” आणि ते दुस-या अतिरेक्याच्या मागावर निघाले.

  तोपर्यंत दुस-या अतिरेक्याने स्वच्छतागृहातून पलायन करून तिथल्या एका छोट्या हॉलमध्ये घुसून ८०-९० लोकांना ओलिस (होस्टेज) ठेवले. हॉलच्या दरवाजा समोर जोशीसाहेब पोहोचले...दरवाजा तोडून गोळीबार करावा तर आतल्या लोकांना गोळ्या लागल्या असत्या. काय करावे? इलाज खुंटला...साहेब मग दुस-या मार्गाने त्या हॉलच्या छतावर गेले...दुर्गाप्रसाद आणि त्यांनी शरीराला दोर बांधले आणि ते दोघे भिंतीवरून खाली उतरत अतिरेकी लपलेल्या हॉलच्या सज्जाच्यावर लटकत राहिले. या हॉलच्या ज्य पाय-या होत्या त्याच्या वर पुढे आलेला हा सज्जा (कॉरिडॉर) होता. त्यांना तेथून हॉलचा दरवाजा दिसत नव्हता. अतिरेकी आत होता..त्याला साहेब दिसत नव्हते. हॉलच्या दिशेने जवान अधूनमधून गोळीबार करीत होते. जोशीसाहेबांनी एक चाल खेळली...आपल्या सहका-यांना गोळीबार थांबवण्याचा आदेश दिला.....सुमारे पंधरा मिनिटे फायरिंग थांबले...अतिरेकी अस्वस्थ झाला. त्याने सोळाव्या मिनिटाला हॉलचा दरवाजा उघडला. पण बाहेर येताना एका महिलेला पुढे आणले, तिच्यामागे तो उभा होता ..त्याने त्या महिलेच्या पाठीवर रायफलची नळी टेकवलेली होती. तो बाहेर आल्याची खबर लगेच काही अंतरावर पोझिशन घेऊन बसलेल्या स्नायपर (नेमबाज)ने जोशीसाहेबांना कळवली. अतिरेक्याच्या डोक्यात गोळी डागण्याचा प्रयत्न गोळी टारगेट्‌वर अगदी शंभर टक्के लागण्याची खात्री असली तरच करण्याचा आदेश साहेबांनी स्नायपरला आधीच देऊन ठेवला होता. हे स्नायपर्स अचूक गोळी डागण्यात तरबेज असतात. "साहब, टारगेट पर परफेक्ट निशाना यहांसे लगाना मुश्किल है ” आप नीचे उस टेररिस्टके सामने उपरसे जंप करोगे तो वो आपकी बायीं तरफ सिर्फ पाँच-छह मीटरपर होगा.” स्नायपरने मेसेज दिला. आता फार थांबण्यात अर्थ नव्हता. साहेबांनी उडी घेण्याचा निर्णय  घेतला तेवढ्यात स्नायपरने कळवले "  साहब, वो फिर अंदर चला गया!...” पुन्हा १५ मिनिटे भयाण शांतता पसरली!

  जोशीसाहेब आणि दुर्गाप्रसाद दोराला लटकून होते...कितीवेळ चालणार हे ऑपरेशन..काहीही होऊ शकते..अतिरेक्याने पाहिले तर आपण "सिटींग डक..” म्हणजे एकदम सोपे टारगेट ठरू... तेवढ्यात "साहब,वो फिर बाहर आया है! आप नीचे कुदोगे तो टारगेट आपकी दाहिनी तरफ स्टेप्स पर खडा हुआ दिखेगा...” हा मेसेज आला आणि साहेबांच्या डोळ्यांत अंगार उतरला. आता याला सोडायचा नाही! पण अतिरेक्याने या वेळेला एका वृद्धाला ढाल बनवून बाहेर आणले होते! त्या वृद्धाच्या आडून फायरींग करून तेथून निसटून जाण्याचा त्याचा इरादा होता!

    मंदिराबाहेर शेकडोंचा जमाव श्वास रोखून उभा होता. अक्षरधामचे साधू भगवान स्वामीनारायणांची करूणा भाकत होते. अतिशय उच्चशिक्षित असणारे अखंड ब्रम्हचर्य व्रताचे कसोशीने पालन करणारे सर्व साधू ह्या कठीण प्रसंगात अत्यंत संयमाने वावरत होते.....मानवी देहधारी सैनिक-देवतांच्या सर्व आज्ञा शिरसावंद्य मानून तसा प्रतिसाद देत होते.स्वयंसेवकांच्या मदतीने मृतदेह उचलून बाहेर नेत होते. एकही साधू जीवाच्या भितीने मंदिराच्या बाहेर पळून गेले नव्हते किंवा कुठे लपून बसले नव्हते.  हॉलच्या वरच्या पायरीवर उभा असलेला अतिरेकी, त्याच्या ताब्यात असलेले ते वृद्ध भाविक एक पायरी खाली उभे....अतिरेक्याच्या मानेपासून वरचा भाग गोळीच्या रेंजमध्ये होता!

    जोशीसाहेबांनी दुर्गाप्रसाद साहेबांना सांगितले..."हम दोनो एकसाथ नीचे कुदेंगे... रायफल सिंगल शॉट में रखनी है..नीचे उतरतेही उसके सीधे हेड पर गोली मारनी है..पहले मैं फायर करूँगा...अगर मेरी रायफल नहीं चली तो तुम फायर करना...जरासी भी देर नहीं होनी चाहिये....याद रखना..वो टेररिस्ट पहले गोली चलायेगा तो हम नहीं बचेंगे और हमने उसके पहले ॲक्युरेट फायर किया तो वो नहीं बचेगा...वो नहीं बचना चाहिये...और गोली सिर्फ आतंकवादीके सिर पर लगनी चाहिये...होस्टेज को कोई नुकसान न हो!”

    साहेबांनी दोनेक क्षणच घरी असलेल्या आपल्या गरोदर पत्नीचा आणि दीड वर्षाच्या मुलीचा चेहरा नजरेसमोर आणला...न जाणो पुन्हा भेट होईल न होईल! माणूस कुणीही असला तरी आपल्या आप्तांना सोडून जाण्याची कल्पना त्याला सहन होत नाही...मरणाची भीती तर सर्वांनाच वाटते...पण सैनिक "डर नाम की चीज से दो कदम आगे चलते है..क्योंकी डर के आगे ही जीत होती है!” आणि एकाच वेळेस जोशीसाहेब आणि दुर्गाप्रसाद साहेबांनी खाली उडी घेतली...ती थेट त्या अतिरेक्याच्या पुढ्यात...त्याला तर साक्षात दोन शैतानच त्याच्या समोर अगदी पाच-सहा मीटर्सच्या अंतरावर प्रकटल्याचा भास झाला होता...दोन प्रवृती एकमेकांसमोर एकमेकांचा मृत्यू बनून उभ्या ठाकलेल्या होत्या...सत्याच्या बाजूने सैनिक आणि पापाच्या बाजूला अतिरेकी! तो अतिरेकी प्रचंड आश्चर्यचकित होऊन जागच्या जागी थिजला...तो त्याचे बोट ट्रिगरवर दाबणार एवढ्यात जोशी साहेबांनी ट्रिगर दाबला...गोळी उडाली...शंभर टक्के अचूक लक्ष्यभेद..धनुर्धर अजुर्नासारखा! गोळी त्या शत्रूच्या दोन्ही डोळ्यांच्या बरोबर मधून घुसली आणि त्यांचा सडका मेंदू फोडून आरपार झाली! त्याचे धूड जोशीसाहेबांच्या पुढ्यात येऊन पडले! चौदा तासांची मोहिम संपली होती...एन.एस.जी.च्या देवदूतांमुळे मंदिर मुक्त झाले होते!  चौदा तासांची मोहिम संपली होती...एन.एस.जी.च्या देवदूतांमुळे मंदिर मुक्त झाले होते! मंदिरातील देवतांनी आशीर्वादाचे हात उंचावले...घंटानाद घुमू लागला! या नादातून जणू "जय हिंद” चा ध्वनि उमटू लागला होता!

(या कारवाईत ५७ भाविक, २३ पोलिस अधिकारी-कर्मचारी जखमी झाले. एन.एस.जी.कमांडो श्री. सुबेदार सुरेशचंद्र यादव साहेब, गुजरात राज्य कमांडोज श्री. अर्जुनसिंह गामेतीसाहेब आणि अल्लारखा खानसाहेब हे बहादुर हुतात्मा झाले. एन.एस.जी.कमांडो श्री. सुरजन सिंह भंडारी दोन वर्षे कोमात राहून हुतात्मा झाले! २९ भाविकांनाही आपले प्राण गमवावे लागले! या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली! - संभाजी बबन गायके

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

अनवाणी : श्रद्धा की अंधश्रद्धा