माफ करशील ना बाप्पा आम्हाला..?
यावर्षी जसा पाऊस बरसला तसा तुझा आशीर्वाद यांच्यावर बरसू दे रे बाप्पा कायमच ! पुढे देवी आल्या, मांडवात देवींच्या भरझरी पोशाखातील मूर्ती होत्या... मांडवाच्या बाहेर अंगावर धड कपडे नसलेल्या खूप माऊली मला दिसल्या.... देवीला आणलेल्या साड्या मग मी मांडवात न जाता, देवी समजून याच माता माऊलींना दिल्या... चालेल ना रे बाप्पा...? देवी रागावली तर सांभाळून घेशील ना?
मागच्या महिन्यात गणपती आगमन झाले आणि या महिन्यात विसर्जन झाले...! मधल्या काळात अनंत अभिषेक आणि पूजा झाल्या.... गायत्री मंत्राचे पठण झाले.... डीजे, ढोल आणि ताशा यांच्या गजरात तुझ्या दर्शनासाठी गर्दीचा महापूर उसळला होता ....!
पण माफ कर गणराया, मी या एकाही गोष्टीत सहभाग घेऊ शकलो नाही.... वर्षानुवर्षे रस्त्यावर आणि फुटपाथवर अस्ताव्यस्त पडलेल्या आई-वडिलांना आंघोळ घालण्यात मी व्यस्त होतो, तुझा अभिषेक करायला मला जमलंच नाही बाप्पा ... तुला अभिषेक करण्यासाठी घेतलेलं पाणी माझ्याकडून इथे वापरलं गेलं... माफ करशील ना मला....? रस्त्यावरच्या आई-वडिलांची पूजा मांडताना, तुला विसरूनच गेलो... माफ करशील ना मला....?
मी त्यांना रस्त्यावरून उचलून एका स्वच्छ आश्रमात ठेवलं, तुझ्या आणि समाजाच्या मदतीने इथून पुढचा सर्व खर्च आपण मिळून करणार आहोत...तुला अर्पण करायचा तो मोदक मी यांच्या मुखी माझ्या हाताने भरवला.... माफ करशील ना मला....?
तुला आवडतं तसं मखर तयार करायचं माझ्या डोक्यात होतंच, पण रस्त्यावर भर पावसात तान्ह्या लेकरांसह तुफान पावसात थंडीने कुडकुडत बसलेले एक कुटुंब....एक सेकंड हॅन्ड ताडपत्री घेऊन सुतळीने इकडे तिकडे बांधून त्यांच्या डोक्यावर तात्पुरतं छप्पर घालून दिलं... तुझ्या मखराचे पैसे मी असे छप्परासाठी वेड्यासारखे उधळले....माफ करशील ना मला....?
पॅरालिसिस झालेले... स्वतःच्या जिभेवर कंट्रोल नसणारे अनेक लोक माझे कान ओढून....माझ्या कानात ओर्रर्रर्रर्र... कक्कक...स्स्स्स्स...ह्हझज्ज्ज.... असं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते.... तुझ्या मंदिरात न येताही तुझी आरती मला अशी ऐकायला मिळाली.... होती आरतीच होती माझा विश्वास आहे...! हाडाचा सापळा झालेली परवा एक आजी कानात येऊन म्हणाली, कंठी झळके माळ मुक्ता फळाची.... आता कंठ राहिलाच आहे कुठे? तिथे अडकलेत फक्त प्राण... तोही जाता जात नाही.... आता बाप्पाला म्हणावं थंडीचे दिवस आलेत, फाटकी का होईना एखादी कान टोपी तरी आणून दे म्हणावं.... तिला परवा गुपचूप कान टोपी नेऊन दिली आहे, तूच पाठवली आहेस असं सांगितलं आहे, भेटली तर काही बोलू नको, पुन्हा हा विषय वाढवू नको.आम्ही गायत्री मंत्र गाऊ शकलो नाही, पण अनुभवला हे नक्की.... माफ करशील ना मला....?
जीला पायच नव्हते अशा माऊलीला कृत्रिम पाय दिले, ती चाचपडत चालत होती... तिचं चालणं हाच ठेका होता.... इथे कोणताही ढोल नव्हता, ताशा नव्हता, डीजे तर नव्हताच, होती फक्त तिच्या आणि माझ्या हृदयातली धडधड.... याच हृदयाच्या धडधडीच्या तालावर मी नाचलो बापा... तुझ्यापुढे नाही नाचू शकलो.... तुला राग नाही ना रे गणराया ? थकलेले अनेक जीव कायमचे विसर्जित झाले, मी अग्नीदेवाला ते समर्पित करून आलो....आता गेल्यानंतर तरी, त्यांना सुख मिळावे... दुःख हरावे यासाठी "सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची... ” ही तुझी आरती मी आणि मनीषाने तिथे गायली.... आता तरी सुख मिळेल का रे त्यांना....? अनंत चतुर्दशीला तुझी पार्थिव मूर्ती आम्ही विसर्जित केली.... तुझी मूर्ति विसर्जित केली, परंतु तू अनंत काळासाठी आमच्या हृदयात आहेस.... यानंतर पितृपक्ष आला... शेकडो आई-वडिलांना या दिवसांमध्ये जेवू घातले.... आम्ही नाही.... समाजाने केले...! ज्या हातांनी आम्हाला लहानपणी जेऊ घातले, ते म्हातारे झाल्यावर त्यांच्यामुखी आज आपण आपल्या हातांनी घास घालणे.... याला "अन्नदान” कसं म्हणू बाप्पा ?
या वयात त्यांना जेऊ घालण्याचे आमचं कर्तव्यच नाही का रे बाप्पा.? आई बापाला ”दान” देईल इतकं श्रीमंत कोण असतं ? अन्नदान यापेक्षा तृषाशांती हाच शब्द जास्त योग्य नाही का? मी फक्त शारीरिक श्रम केले, परंतु ज्यांनी मला मदत केली त्या सर्वांनी, आपल्या घासातला घास दुसऱ्याला द्यावा या अंतरात्म्यातील भावनेने भरभरून मदत केली...! माझ्या शारीरिक श्रमांपेक्षा ही भावना लाख पटीने उच्च कोटीची आहे...आणि म्हणून या सर्वांना आशीर्वाद दे रे बाप्पा....
अगदी यावर्षी जसा पाऊस बरसला तसा तुझा आशीर्वाद यांच्यावर बरसू दे रे बाप्पा कायमच ! पुढे देवी आल्या, मांडवात देवींच्या भरझरी पोशाखातील मूर्ती होत्या... मांडवाच्या बाहेर अंगावर धड कपडे नसलेल्या खूप माऊली मला दिसल्या.... देवीला आणलेल्या साड्या मग मी मांडवात न जाता, देवी समजून याच माता माऊलींना दिल्या... चालेल ना रे बाप्पा...? देवी रागावली तर सांभाळून घेशील ना?
बाप्पा यावर्षी कोणाचा राग कुणावर काढलास ? किती पाऊस पाडलास....किती नुकसान झालं... पिकं वाया गेली... पूर आला.... घरंच्या घरं वाहून गेली.... भीक मागणाऱ्या लोकांसाठी रोजगार निर्माण करायला सेंटर सुरू केलं तिथे पण पावसानं आमची वाट लावली....आमची लोक फुटपाथवर झोपत होती, पावसानं फुटपाथवर नदीच आणून ओतली.... झोपायचं कुठं बाप्पा? रात्रीच्या रात्री उभ्याने जागून काढायच्या.. तू देव हायस बाप्पा, आमी साधी माणसं आमाला कसं जमल ?
असू दे या निमित्ताने उभारी घेतली.. आम्ही आमच्या लोकांसाठी भाड्याचं का होईना, पण एक घर घेतलं....दसऱ्याला पूजा केली..! मी आणि मनीषाने आमच्या लेकरांचा संसार आज हाताने खोलीत मांडून दिला....लेकरं म्हणजे काय रे, आमची अंध अपंग म्हातारी माणसं...आम्हाला काम करताना बघून आमची मंडळी तोंड लपवून रडत होती रे... मी म्हनंलं मामा काय झालं डोळ्यातून पाणी काढायला ? मामा म्हनलां, तुमी ती चादर लय जोरात झटाकली, तवा धुरळा डोळ्यात ग्येला आसल....आस्स व्हय....म्हणत, हसत मी रूमच्या बाहेर चादर झटकायला नेली...पण काय सांगू, चादर बाहेर नेऊनही धुरळा काही हटला नाही आणि खोलीतला पाऊस काही थांबला नाही !!!
लेखनकाल : ३० सप्टेंबर २०२५
-डॉ अभिजीत आणि डॉ मनीषा सोनवणे डॉक्टर फॉर बेगर्स, सोहम ट्रस्ट - पुणे