सपान
जगु पावसामुळे चिंंतेने त्रस्त झाला होता. बापलेकांचा विषय ऐकून मंजाई आतून म्हणाली, "काल ईठ्ठल माह्या सपनात आल्ता! म्हणला काळजी नको करू. तुह्या घराचे कष्ट वायाला नही जाऊन द्याचो. परवाच्याला आषाढी एकादस हाये. व्हैन सगळी तुमच्या पिकापाण्याची सोय!” आईचा विषय ऐकून जगनला बरं वाटलं. घरधनीन असं बोलताच चंद्रुबा तिचा शब्द धरून म्हणला, "बरं व्हैन, मंजे. कसा का होईना पड रे देवा. तुला हात जोडून ईनंती. पहिली पोटापाण्याची चंदी व्हवू दे ईठ्ठला पांडुरंगा.”
"जगु, ह्या बारीला लै परीक्षा पाहिली देवानं! नही तं बराबर टायमावर सगळी पेर झाली व्हती. बाजऱ्या लै रगाट पर एक दोन दिसांत झाला तं बरं नही तं ईषय जवळजवळ संपल्यात जमा व्हैन.” चंद्रुबा वरती आकाशाकडं बघत पोराला काळजी करत बोलला. गेल्या आठ दिवसापासून नुसते भुरके ढग पश्चिमेकडून पूर्वेकडे पळताना बघून चंद्रुबा सारखी पिकांची काळजी करायचा. बाजरी बरोबर पेरलेल्या मुगानेसुद्धा दोन दिवसापासून माना टाकायला सुरुवात केली होती. जवळे बाळेश्वर अन् सारोळ्याचा पठारभाग म्हणलं म्हणजे सगळा खेळ पावसाच्या सापशिपीवरच अवलंबून असायचा. आषाढ-श्रावणात या भागात ढगांनी शिपलेलं फवाऱ्यासारखं पाणी जरी पडलं तरी पिकांना तग धरायला वाव मिळायचा. आणखी त्या ढगांची सावलीसुद्धा पिकांना कामात यायची. मोठा पाऊस या भागात क्वचितच पडायचा. मुरमाड जमीन; पण कष्टकरी लोकांचा भाग म्हणून या पठारभागाची दूरदूरपर्यंत ओळख झालेली होती.
परिस्थिती कितीही विषम असली तरी डोंगरातल्या दगड धोंड्यांप्रमाणे जगणारी ही चंद्रुबा सारखी माणसं इथं घराघरात दिसायची. केव्हापासून घरासमोरच्या ओट्यावर काळजी करत असलेला बाप आणि स्वयंपाक घरात चुलीपुढं भाकरी थापत असलेली मंजाई पिकांची खूप काळजी करायचे. एकदा का कणसांत दाणे भरले म्हणजे तीन हिस्से त्यांची काळजी आपोआप मिटायची. औंदा पिकं गुडघ्या मांड्या इतकीच अन्तेवढ्यातच त्यांनी माना टाकल्या म्हणून सगळं कुटुंब चिंतेत होतं. आई-बापाचं सुरू असलेलं काळजी करणं आणि ते मिटवून टाकणं जगुच्या अजिबात हातात नव्हतं. मोठी बहीण रंजना घारगावच्या बाजूलाच पिंंपळगावला दिली होती. घरची शेती आणि जगुची मजुरी असं करून त्यांनी तिचं लग्न मागच्या वर्षीच करून टाकलं होतं. यावर्षी मृगामध्येच घरच्या वावरातल्या पेरण्या झाल्यापासून जगु रोजाराजीने पाटलाच्या वावरात जायचा.
अजून आईचा स्वयंपाक आवरला नव्हता म्हणून चंद्रुबा अन् जगनची ओट्यावर बसून चर्चा सुरू होती. दोन घास न्याहरी करून दुपारचं पेंडकं बांधलं म्हणजे तो कामाला निघणार होता. पोरगं कामाला गेल्यावर चंद्रुबा घरच्या शेळ्या सोडणार होता. चिंंतेत असलेल्या बापाला धीर देत जगु बोलला, "दादा, पिकं लै भरात; पण आपल्या काय हातात? त्यो पडला पाहिजेन दोन दिसात. नही तं गेलं सगळं! दुबार पेरणी बी कुठून करणार? जवळ व्हतं ते पहिल्या पेरणीतच संपलं!” सगळा हातावरचा खेळ. दररोज काम केल्याशिवाय खायला मिळणार नाही अशी परिस्थिती. त्यामुळे जगु पण पावसाचे चिंंतेने त्रस्त झाला होता. बापलेकांचा विषय ऐकून मंजाई आतून म्हणाली, "काल ईठ्ठल माह्या सपनात आल्ता! म्हणला काळजी नको करू. तुह्या घराचे कष्ट वायाला नही जाऊन द्याचो. परवाच्याला आषाढी एकादस हाये. व्हैन सगळी तुमच्या पिकापाण्याची सोय!” आईचा विषय ऐकून जगनला बरं वाटलं. घरधनीन असं बोलताच चंद्रुबा तिचा शब्द धरून म्हणला, "बरं व्हैन, मंजे. कसा का होईना पड रे देवा. तुला हात जोडून ईनंती. पहिली पोटापाण्याची चंदी व्हवू दे ईठ्ठला पांडुरंगा.” तेवढ्यात मंजाईनं न्याहरीला आवाज देत दोघांनाही वाढलं अन् जेवण करून जगु पाटलाच्या शेतात कामावर गेला अन् चंद्रुबानं शेळ्या सोडल्या.
तो दिवस ढगांच्या पळण्या पळण्यातच बुडाला. दुसराही आषाढी एकादशीच्या अगोदरचा तसाच चालला. मात्र संध्याकाळी दिवस मावळता आकाशातलं रंगरूप पालटलं! जगु कामावरून येता येताच एक चांगला शिपका येऊन गेला. चंद्रुबानं अंधार पडता शेळ्या त्यांच्या जागेवर आणून बांधल्या. संध्याकाळी जेवणळीनंतर पावसाची टीप टीप सुरू झाली अन् काळजीत बुडालेलं सगळं घरदार आनंदात झोपी गेलं. विठ्ठलाचे भक्त असलेलं हे सर्वसाधारण कुटुंब. भोळा भाव आणि भक्ती यांचा मिलाप त्यांच्या कष्टातून विठ्ठलाच्या लक्षात येत असावा. दुसरा दिवस म्हणजे एकादशीचा सगळं कुटुंबच पहाटे उठलं.
रात्रभर पाऊस थांबलाच नव्हता! सकाळी उठल्या उठल्या मंजाई जगुला बोलली, "पाह्य बरं, मी म्हणले व्हते, ईठ्ठल बोलला सपनात तसंच घडलं! चिंताच मिटली पोरा आपल्या पठार भागाची!” त्यावर जगु समाधानी मनाने आईला होकार देत बोलला,"आक्का, तुझं सपान एकदम खरं ठरलं. आषाढी पावली आपल्याला!”
चंद्रुबा केव्हाच अंघोळ करून देवपूजेला बसला होता. तो पूजा करता करता पोराला म्हणला, "जगु, मनासारखं झालं पोरा. घे लवकर आटपून एकादशीचं. जास्त टाईम नही करू आज आवरायला; वर्षाची आखाडी एकादशी म्हणत्यात ईला. लै पावली देवासारखी.” जगुची आंघोळ होईपर्यंत एकदम उजाडलं होतं. पावसाची संततधार सुरूच होती. रात्रभर पाऊस पडल्यानं सगळी जमीन अगदी तृप्त झाली होती. घरासमोरची बाजरी अन् मूग एकदम ताठ मानेने टवटवीत होऊन हसत होती. बरोबर आषाढी एकादशीला मंजाईचं सपान तंतोतंत खरं ठरलं होतं. म्हणून चंद्रुबा अन् जगु डोलणारी पिकं बघून वि्ीलाचं नामस्मरण करीत होते. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल..!
-निवृत्ती मथुराबाई सयाजी जोरी, मंडळ कृषी अधिकारी, ता.गंगापूर, छत्रपती संभाजीनगर