मिरा-भाईंदर मध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांना सुरुवात

भाईंदर : नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केलेल्या ७ कलमी कृती कार्यक्रमानुसार मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे पूर्वनियोजित आणि नव्याने नियोजित केलेले विविध उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली आहे. दैनंदिन स्वच्छता, नागरिकांच्या तक्रारींचे निवारण, नाविन्य उपक्रम आदिंचा त्यात समावेश आहे.

नागरिकांची गैरसोय होऊ नये, त्यांना पायाभूत सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी ७ कलमी कृती कार्यक्रम जाहीर केला आहे. मिरा-भाईंदर महापालिका, शाश्वत विकासाचे ध्येय घेऊन शहरात विविध उपक्रम राबवत असून, त्यास मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या ७ कलमी कृती कार्यक्रमामुळे चालना मिळाली आहे. सदर ७ कलमी कृती कार्यक्रमाच्या मार्गदर्शक तत्वांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी आयुक्त संजय काटकर यांनी महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना विभागवार आणि कामांनुरुप जबाबदाऱ्यांचे वाटप केले आहे. तसेच महापालिकेने, कृती कार्यक्रमातील सर्व कामे ‘ब्रिद इजी (फेज-१)' आणि ‘डिअर कमिशनर' यात विभागले आहेत. ब्रिद इजी फेज १ उपक्रम २० ते २६ जानेवारी २०२५ या सप्ताह कालावधीत राबविणार आहे.

महापालिकेत येणाऱ्या नागरिकांच्या सुविधेसाठी विविध कार्ये हाती घेतले असून त्यांची पूर्तता केली जात आहे. यात, शासकीय कार्यालयातील दैनंदिन साफ-सफाई, अभ्यागतांकरिता आसन व्यवस्था, दिव्यांगांसाठी व्हिलचेअर सुविधा, नागरिकांना माहिती पुरविण्यासाठी चौकशी कक्ष, ऑनलाईन अर्ज न करता येणाऱ्या व्यक्तींसाठी लिपिकांची नेमणूक, दस्तावेज परिपूर्ण असलेल्या नागरिकांना परवाना आणि परवानग्या देण्यात येणार आहेत. तसेच तक्रारींचे योग्य आणि जलद निवारण करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येत आहे.

शहराच्या विकासासाठी, महापालिकेच्या कामकाजातील सुधारणेसाठी नागरिकांचा वेळोवेळी अभिप्राय घेतला जाणार आहे. त्यासाठी ‘कम्युनिटी व्हॉईस बॉक्स' शहरांतील महत्त्वाच्या ठिकाणी ठेवण्यात येणार असून, या बॉक्समध्ये नागरिकांनी आपले मत मांडून पत्र टाकायचे आहे. याबरोबर पेटीवरील क्यूआर कोड स्कॅन करुन ऑनलाईन पत्रही पाठवता येणार आहे. नागरिकांच्या सर्व सूचना, प्रश्‌, समस्यांची दखल घेऊन त्याचे योग्यरित्य निरसन करण्यात येणार आहे. तसेच पत्रांतील विषयांवर मनपा आयुक्त संजय काटकर नागरिकांशी सोशल मिडीयाद्वरे थेट संवाद साधणार आहेत.

ब्रिद इजी (फेज १) या अंतर्गत ‘माझा रस्ता' उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात रस्ते, दिवे, सिग्नल व्यवस्था आदिंची दुरुस्ती-देखभाल-तपासणी करण्यात येणार आहे. तसेच महापालिकेच्या विकास कामांच्या ठिकाणाहून राडारोडा (डेब्रीज) उचलणे, अडथळे (बॅरेकेटींग) करणे, गटारांवर झाकणे आणि दिशा दर्शक फलक लावणे आदि कामे केली जाणार आहेत. नागरिकांना शहराच्या मुख्य चौकातून २० मिनिटांत घरी पोहोचता यावे त्यादृष्टीने वाहतूक व्यवस्थापन करण्यासाठी, होमॅ २० उपक्रम हाती घेण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत.

‘माझा फुटपाथ, माझा हक्क' आणि ‘फेरिवाला मुक्त स्टेशन' उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या अंतर्गत स्टेशन परिसरातील अनधिकृत फेरिवाले, बेवारस गाड्या, रस्त्यावरील अधिकृत बोर्ड (विविध संस्थांचे), गॅरेज, नाल्यावरील अतिक्रमण हटविले जाणार आहे. यासह पादचाऱ्यांसाठी पदपथ (फुटपाथ) मोकळा करुन देण्यात येणार आहे. उद्याने आणि स्वच्छता अंतर्गत ‘चैतन्यदायी उद्याने', ‘सेवा वैकुंठभुमीची' यानुसार उद्याने, स्मशान भूमीची स्वच्छता, दुभाजकांची दुरुस्ती-देखभाल, झाडांची छाटणी, पडलेल्या झावळयांची सफाई आदि कार्यांची पुर्तता केली जाणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत शहरातील नाल्यांची कामे करुन ते दुर्गंधीमुक्त आणि त्यातील गाळ काढून प्रवाही केले जाणार आहेत. तसेच उपसलेला गाळ उचलून त्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. पर्यावरणीय गंभीर समस्येवर उपायोजनात्मक पाऊल म्हणून ‘वसुंधरेची सेवा' उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. यात धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध उपाययोजना, सागरी किनाऱ्यांची साफ-सफाई आदी कार्ये केली जाणार आहेत. यासह आरएमसी प्लांट, प्रदुषण पसरविणाऱ्या व्यवसाय, कारखाने आदिंवर निर्बंध लावण्यात येणार आहेत.

डिअर कमिशनर उपक्रम (फेज २) नागरिकांना त्यांचे मत, सूचना, तक्रार मांडण्यासाठी प्रत्येकवेळेस महापालिकेच्या मुख्यालयात यावे लागते. त्यांचे प्रश्न, समस्या घरबसल्या मांडण्यासाठी ‘माय एमबीएमसी', ‘माझी बस' तसेच महापालिकेच्या सर्व ई-मेल जोडणारे ग्रिव्हेन्स असे मोबाईल ॲप्लिकेशन्स आहेत. यासह ५० आरटीआय सेवा दिल्या जातात. आता, आरटीआय अर्जांची ऑनलाईनही स्विकृती केली जात आहे.

५ विकास कामांवर स्थिगिती...
विकास कामांमुळे धूळ मोठ्या प्रमाणात उडते, ज्यामुळे वायू प्रदुषण आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. सदर प्रकार रोखण्यासाठी मिरा-भाईंदर महापालिकेने उपायोजनात्मक पावले उचलून, नियम लागू केले. शहरात घोडबंदर, नवघर, गोडदेव, भाईंदर आदि ठिकाणी ५ रहिवासी इमारतींचे बांधकाम सुरू होते. मात्र, काम करणाऱ्या विकासकांमार्फत प्रदुषणाच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले असल्याने महापालिकेने त्यांच्या कामांवर स्थगिती आणली आहे.

शहराचा विकास करण्याबरोबर शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असून, आता मुख्यमंत्र्यांच्या ७ कलमी कृती कार्यक्रमामुळे आमच्या या प्रयत्नांना अधिक चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्देशामुळे नवीन उपक्रम राबवले जात आहे. यामुळे शाश्वत विकास आणि नागरिकांचे सुसह्य जीवन या संकल्पना प्रत्यक्ष अंमलात येणार आहेत.
-संजय काटकर, आयुक्त-मिरा भाईंदर महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ठाणे महापालिकेच्या ‘ग्रंथ दिंडी'ला उत्साही प्रतिसाद