नवी मुंबईत स्मार्ट प्रीपेड विद्युत मीटर बसविण्याचे काम तात्काळ थांबवा

माजी आमदार संदीप नाईक यांचा इशारा 

नवी मुंबई : शासनाने सर्वसामान्य ग्राहकांसाठी स्मार्ट प्रीपेड विद्युत मीटर बसविणार नसल्याचे जाहीर केले असतानाही नवी मुंबई शहरात नागरिकांना कोणत्याही प्रकारची कल्पना न देता त्यांचा विरोध असतानाही महावितरण कंपनीकडून स्मार्ट प्रीपेड विद्युत मीटर बसविण्यात येत आहेत. हे काम तात्काळ थांबवा अन्यथा लोकशाही मार्गाने या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा माजी आमदार संदीप नाईक यांनी दिला आहे.

वाशी विभागाचे अधीक्षक-अभियंता यांना याविषयी पत्र पाठवून त्यांनी मागणी केलेली आहे.

वीज कायद्यानुसार कोणते मीटर बसवायचे याचा अधिकार ग्राहकांना असतो. परंतु नवी मुंबईमध्ये  ग्राहकांची परवानगी नसताना त्यांचे जुने मीटर परस्पर काढून  महावितरण त्या जागी  स्मार्ट प्रीपेड मीटर बसवत आहे. या अघोषित प्रीपेड मीटर सक्तीला  नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. जोपर्यंत नागरिकांकडून मागणी होत नाही अजिबात प्रीपेड मीटर बसवू नयेत, असे संदीप नाईक यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे दुप्पट बिल आकारणी, पैसे भरूनही वीज पुरवठा सुरू न होणे अशा अडचणी उद्भवतात. शहरातील अनेक विज ग्राहकांची आधी पैसे भरून वीज वापरण्याची आर्थिक क्षमता नाही. पोस्टपेड बिलामध्ये वीज देयके भरण्यासाठी ग्राहकांना काही दिवसांचा  अवधी तरी मिळतो. या दरम्यान त्यांना बिल भरण्यासाठी पैशाची तरतूद करता येते. मात्र प्रीपेड मीटरमध्ये अशा सर्वसामान्य ग्राहकांकडे  प्रीपेड मीटर  रिचार्ज करण्यासाठी पैसे उपलब्ध नसतात त्यांना वीजपुरवठा  होणार नाही. रात्री अपरात्री  प्रीपेड मीटरचा रिचार्ज संपल्यास  अंधारात बसण्याची वेळ नागरिकांवर येईल. अशा प्रकारच्या अनेक समस्या प्रीपेड मीटरमुळे निर्माण होणार आहेत. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्याचे जे काम  महावितरणने सुरू केले आहे, 

ते ग्राहक हितासाठी तात्काळ थांबवण्याची मागणी नाईक यांनी केली आहे. जनभावनेची  दखल न घेता जर हे काम सुरूच ठेवले  तर मात्र नाईलाजास्तव लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही नाईक यांनी दिला आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मिरा-भाईंदर मध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांना सुरुवात