सार्वजनिक ग्रंथालयाच्या दशकपूर्ती सोहळ्यात मान्यवरांची भाषणे
सिडकोच्या कोविड योद्धे आणि गणवेषधारी कर्मचाऱ्यांकरिता विशेष गृहनिर्माण योजना
सिडको महामंडळाच्या कोविड योद्धे आणि गणवेषधारी कर्मचाऱ्यांकरिता असलेल्या विशेष गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट 2021 रोजी होणार असून या दिवशी योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत सिडकोकडून संपूर्ण महाराष्ट्रातील कोविड योद्धे आणि गणवेषधारी कर्मचाऱ्यांकरिता नवी मुंबईच्या 5 नोड्समध्ये 4,488 सदनिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
सन 2020 च्या प्रारंभी संपूर्ण जगावर कोरोना (कोविड-19) महासाथीचे संकट कोसळले. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देशभर टाळेबंदी लागू करण्यात आल्याने बहुतांशी दैनंदिन व्यवहार ठप्प झाले होते. परंतु अशा बिकट परिस्थितीतीतही डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, सफाई कर्मचारी आणि अन्य अत्यावश्यक सेवांमधील कर्मचारी हे कोविड योद्धे बनून, आपल्या जीवाची पर्वा न करता समाजाप्रतिचे आपले कर्तव्य अव्याहतपणे पार पाडत राहिले. या कोविड योद्ध्यांमुळे मोठ्या प्रमाणावर होणारी संभाव्य प्राणहानी टळली तसेच अत्यावश्यक सेवांचा नागरिकांना अविरतपणे पुरवठा होत राहिला. या कोविड योद्ध्यांप्रति कृतज्ञतेची भावना म्हणून या योद्ध्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली सिडकोने ही विशेष गृहनिर्माण योजना आणली आहे.