स्वच्छ भारत अभियान संपताच मनपाने स्वच्छतेकडे फिरवली पाठ?
नवी मुंबई-: स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नवी मुंबई शहराचा स्वच्छतेत प्रथम क्रमांक यावा म्हणून महापालीकेने स्वच्छतेवर भर देत कचरा कुंडी मुक्त शहरचा संकल्प केला होता. आणि त्यासाठी घंटा गाडीचे योग्य नियोजन केले होते. मात्र स्वच्छ भारत अभियान संपताच हे नियोजन फोल ठरले. कचऱ्याचा रस्त्यावर खच पडत असुन नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नवी मुंबई स्वच्छता अभियान दरम्यान कोपरखैरणे येथे कचरा कुंडी मुक्त अभियान नवीमुंबई महानगरपालिका विभाग अधिकारी अशोक मढवी यांच्याकडून राबविले गेले होते. त्यावेळी कचरा कुंडीच्या ठिकाणी वेळेनुसार घंटागाडी येत असत त्या वेळी नागरिक कचरा हे घंटागाडी मध्ये टाकून द्यायचेआणि इतर वेळी कोणीही कचरा रस्त्यावर बाहेर फेकू नये म्हणून कचरा कुंडीच्या ठिकाणी एक सफाई कामगार तैनात असायचा. जेणेकरून कोणीही नागरिक कचरा बाहेर रस्त्यावर टाकत नसे.
मात्र स्वच्छता अभियानची स्पर्धा संपताच मागील काही दिवसांपासून बोनकोडे गावाच्या परिसरात घंटा गाडी वेळेवर येत नसून कुठलाही सफाई कामगार कचरा टाकू नये हे सांगण्यासाठी तैनात नसतो. घंटा गाडी वेळेवर येत नसल्याने आणि कचरा टाकण्यासाठी कुठलीही कचराकुंडी उपलब्ध नसल्या कारणाने नागरिक कंटाळून कचरा हे रस्त्यावर फेकून देतात. कचरा रस्त्यावर फेकल्या कारणाने बोनकोडे गावाच्या परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरते नागरिकांना रस्त्यावर चालताना नाका-तोंडावर रुमाल पकडावा लागतो. त्यामुळे या भागात डासांचे प्रमाण वाढले असून नागरिकांना डेंग्यू मलेरिया सारखे आजार होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांनी या प्रकरणी त्वरित लक्ष देऊन वेळेनुसार घंटागाडी पाठवावी आणि एक सफाई कामगार तैनात ठेवावा किंवा कायमस्वरूपी कचराकुंडी उपलब्ध ठेवावी जेणेकरून बोनकोडे गावातील नागरिक कचरा हा कचरा कुंडीमध्ये टाकतील. अशी मागणी दिव्यादीप फाउंडेशन चे अध्यक्ष प्रदिप नामदेव म्हात्रे यांनी केली आहे. तर यावर नवी महानगरपालिका अधिकाऱ्यांकडून गांभीर्याने दखल न घेतल्यास किंवा दुर्लक्ष केल्यास सदर कचरा उचलून नवी मुंबई महानगरपालिका विभाग कार्यालयात फेकून देण्यात येईल असा इशारा ही प्रदीप म्हात्रे यांनी दिला आहे.