...तर मशालीचे रूपांतर क्रांतीच्या वणव्यात!

पनवेल : भूमिपुत्रांची अस्मिता असलेल्या दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव जोपर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिले जात नाही तोपर्यंत संघर्षाची मशाल विझणार नाही, असा इशारा सोमवारी (दि. 9) जासई येथे झालेल्या मशाल मोर्चातून राज्य सरकारला देण्यात आला. 15 ऑगस्ट ही डेडलाइन आहे. या तारखेपर्यंत सरकारने प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही तर दिबा साहेबांच्या जन्मभूमीत प्रज्वलित करण्यात आलेल्या या मशालीचे रूपांतर 16 ऑगस्टपासून क्रांतीच्या वणव्यात करण्याचा निर्धार या वेळी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी केला.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी ऑगस्ट क्रांतिदिनी जासई येथे सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने विशाल मशाल मोर्चा काढण्यात आला होता. नव्या मुंबईच्या निर्मितीसह देशातील शेतकरी आणि कष्टकर्‍यांसाठी लोकनेते दि. बा. पाटील यांनी केलेला संघर्ष व त्याग लक्षात घेऊन आणि भूमिपुत्रांच्या अस्तित्वाची ओळख जपण्यासाठी नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, ही मागणी समजून घेण्याऐवजी प्रकल्पग्रस्तांचा आवाज दाबण्याची भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. सरकारच्या या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जन्मगावापासून ठाणे, रायगड, पालघर, नवी मुंबई, मुंबईसह विविध जिल्ह्यांतील गावागावात जासई येथून मशाल प्रज्वलित करून नेण्यात आली.  

या मशाल मोर्चात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी खासदार जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी आमदार सुभाष भोईर, कॉम्रेड भूषण पाटील, दिबां चे पुत्र अतुल पाटील, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, जे. डी. तांडेल, काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे, गुलाब वझे, भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहराध्यक्ष कौशिक शहा, 27 गाव समितीचे नंदराज मुंगाजी, दशरथ भगत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील, सरपंच संतोष घरत, अर्जुनबुवा चौधरी, माजी जि. प. सदस्य राजेंद्र पाटील, पनवेल मनपाचे स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, नगरसेवक नितीन पाटील, अनिल भगत, अजय बहिरा, हरेश केणी, बबन मुकादम, विजय चिपळेकर, विकास घरत, शत्रुघ्न काकडे, अमर पाटील, प्रभाग समिती सभापती सुशीला घरत, नगरसेविका दर्शना भोईर, हेमलता म्हात्रे, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, ब्रिजेश पटेल, दिनेश खानावकर, उरण पंचायत समितीचे माजी सभापती नरेश घरत, वहाळच्या साई संस्थानचे संस्थापक रवी पाटील, कामगार नेते सुरेश पाटील, राजेश गायकर, सीमा घरत, रूपेश धुमाळ, दीपक म्हात्रे यांच्यासह कृती समितीच्या विविध शाखांचे पदाधिकारी, विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी तसेच हजारो प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र सहभागी झाले होते. या वेळी दिवंगत गणपतराव देशमुख, मधुकर ठाकूर, माणिक जगताप, लक्ष्मणशेठ पाटील, मेघनाथ म्हात्रे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Read Previous

 ‘लवाद’च्या निर्णयाला उच्च न्यायालयाची अंशत: स्थगिती

Read Next

नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी आपल्या निधीतुन सार्वजनिक सभागृहाचे लोकार्पण