कोपरखैरणेत नळातून गढूळ पाणी पुरवठा
वाशी: एक आठवडा दमदार पाऊस पडल्यानंतर शहरात आता कोपरखैरणे भागात नळातून पिण्याच्या गढूळ पाणी पुरवठा होत असल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.त्यामुळे या भागात शुद्ध पाणी पुरवठा करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
नवी मुंबई शहरातील नागरिकांना मोरबे धरणातून पाणीपुरवठा होत असतो.याठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र तसेच शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा होण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात . विशेषतः पावसाळ्यात स्वच्छ पाणीपुरवठा होण्यासाठी क्लोरीन, तुरटी यांचे प्रमाण वाढवले जाते, तसेच त्या ठिकाणी असलेली फिल्ट्रेशन व्यवस्था देखील स्वच्छ केली जाते, असे असताना देखील शहरात पाऊस पडल्यानंतर कोपरखैरनेतील नागरिकांना गढूळ पाणीपुरवठा होत आहे .तर पावसाळी दिवसात साथ रोग डोकं वर काढत असतात.आणि या दिवसात जर गढूळ पाणी पिले तर नागरीकांच्या आरोग्यासाठी आणखी अपायकारक ठरून आरोग्य धोक्यात येऊ शकते.त्यामुळे मनपाने कोपरखैरणे भागात होणाऱ्या गढूळ पाण्याबाबत तात्काळ उपाययोजना करून शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी समाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटील यांनी केली आहे.