नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
आ. मंदाताई म्हात्रे यांच्या शिफारस पत्राने अनेक गरीब-गरजू रुग्णांना दिलासा
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमधून २५.३२ लाख रुपयांची आर्थिक मदत
नवी मुंबई : आजारी लोकांना मदत करा, चाणक्य नीतीनुसार आजारी लोकांना पैशाच्या बाबतीत शक्य तितकी मदत केली पाहिजे या अनुषंगाने शासनाने मुख्यमंत्री वैद्यकीय अर्थसहाय्यता या कक्षाची उभारणी केल्याने बेलापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या १ जुलै २०२२ ते १ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत केलेल्या शिफारस पत्राद्वारे नवी मुंबई क्षेत्रातील २३ गरीब-गरजू रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमधून २५ लाख ३२ हजार पाचशे रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे.
मुख्यमंत्री अर्थसहाय्य निधीमधून असंख्य गोर-गरीबांना निधीच्या माध्यमातून सुलभ शस्त्रक्रिया होत असून, त्यांच्यावर उपचार देखील व्यवस्थितरित्या होत आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत अवघ्या १४ महिन्यात १३ हजाराहून अधिक गोरगरीब-गरजू रुग्णांना एकूण ११२ कोटी १२ लाख रुपये इतकी आर्थिक मदत वितरित केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशीलतेमुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये अनेक विविध आजारांचा समावेश देखील करण्यात आला आहे. यामध्ये अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, कर्करोगावरील शस्त्रक्रिया, केमोथेरपी, डायलिसिस, जन्मतः मूकबधिर लहान मुलांसाठी अत्यावश्यक असणारी कॉकलीयर इनप्लांट शस्त्रक्रिया, सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, विद्युत अपघात, भाजलेले रुग्ण, जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे, असे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांचे प्राण वाचविण्यात यश मिळविले आहे. यामुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीवनदान मिळाले आहे. गोरगरीब गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून अर्थसहाय्य केले जाते. या निधीचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडून होत आहे.
आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केलेले अथक परिश्रम आणि रुग्णसेवेसाठी दाखवलेली तत्परता यामुळे नवी मुंबई क्षेत्रातील २३ गरजू गरीब रुग्णांना २५ लाख ३२ हजार पाचशे रुपयांची आर्थिक मदत प्राप्त झाली असून, भविष्यातही गरजू रुग्णांना शासनाकडून आर्थित मदत मिळणार आहे. तसेच शासनामार्फत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यक निधी मधून गरीब गरजू नागरिकांना आर्थिक मदत उपलब्ध होत असल्याने त्यांना एक आधार प्राप्त होत आहे.
दरम्यान, नवी मुंबईतील गरीब गरजू रुग्णांना मुख्यमंत्री अर्थसहाय्य निधी मधून २५ लाख ३२ हजार पाचशे रुपयांची आर्थिक मदत केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी आभार मानले आहेत.
यापूर्वी ५० तर आता १०० कोटी रुपये वैद्यकीय मदत देण्याचा टप्पा पार केल्यामुळे राज्यातील गरजू रुग्णासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय अर्थसहाय्यता कक्ष एक आशेचा किरण ठरला आहे. - आ. सौ. मंदाताई म्हात्रे, नवी मुंबई.