नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
सुनियोजित शहरातील वस्ती प्राथमिक मुलभूत सुविधांपासून वंचित
रबालेतील कातकरीपाड्याला ‘वंचित'चा आधार
नवी मुंबई : मागील पाच वर्षांपासून वीज, पाणी, शौचालय यासारख्या मुलभूत सुविधांपासून वंचित असणाऱ्या रबाले साईबाबा नगर येथील कातकरीपाडा मधील रहिवाशांना ‘वंचित बहुजन आघाडी'ने मोलाचा आधार दिला आहे.
‘वंचित बहुजन आघाडी'चे रबाले विभाग अध्यक्ष सतीश भोसले यांच्याकडे कातकरीपाडा मधील रहिवाशांनी समस्यांचे गाऱ्हाणे मांडताच त्यांनी विभाग अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरुपात पाठपुरावा केला. यानंतर तातडीने महापालिकेने सदर ठिकाणी सुविधा पुरविण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना माणुसकीचे जीवन जगता येणार आहे.
ग्रामपंचायत काळापासून रबाले एमआयडीसी, प्रभाग क्र.२० येथे साईबाबा नगर कातकरीपाडा वसलेला असून याठिकाणी ४० कुटुंबे वास्तव्य करत आहेत. सदर भागात महापालिकेने विजेचे खांब टाकले आहेत; पण मागील पाच वर्षांपासून त्या दिव्यांखाली अंधार आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी येथील रहिवाशांना ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. येथील रहिवाशांसाठी सार्वजनिक शौचालय आहे; मात्र त्याची दुरावस्था झाली असून पाण्याचे नळ नादुरुस्त झाले आहेत. पत्रे गंजलेले असून ते कधी वापरकर्त्याच्या अंगावर पडतील, याची शाश्वती नाही. शौचालय साफसफाईसाठी दीड-दोन महिन्यातून महापालिकेचे कर्मचारी येत असतात. तोपर्यंत रहिवाशांना दुर्गंधीतच त्याचा वापर करावा लागतो. मात्र, प्रतिमहिना प्रत्येक घराकडून न चुकता ६० रुपये शौचालय शुल्क वसूल केले जाते. येथील रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत, त्यांचीही दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे सांडपाण्याचे सर्व पाणी या खड्ड्यांमध्ये जमा होत असते. मागील तीन वर्षांपासून पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने सुलभ शौचालयासाठी निर्माण केलेल्या बोअरींगचे पाणी वापरण्याची वेळ एकविसाव्या शतकातील सुनियोजित अशा नवी मुंबई शहराच्या वस्तीतील रहिवाशांवर आलेली आहे.
त्यामुळे कातकरीपाडा येथील रहिवाशांनी सदर समस्या लेखी स्वरुपात ‘वंचित बहुजन आघाडी'चे रबाले विभाग अध्यक्ष सतीश भोसले, सचिव धम्मपाल गायकवाड, उपाध्यक्ष राजाराम गाडे यांच्याकडे मांडल्या. यानंतर त्यांनी त्वरित याबाबत घणसोली विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी संजय तायडे यांना संपर्क साधून येथील रहिवाशांना मागील तीन ते पाच वर्षापासून मुलभूत समस्यांपासून का वंचित ठेवण्यात आले? याबाबत विचारणा करुन येथील रहिवाशांना त्वरित सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. तसेच सुविधा पुरविण्याची कार्यवाही त्वरित न केल्यास येथील रहिवाशांसह ‘वंचित बहुजन आघाडी'च्या वतीने साखळी उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता.
अखेर ‘वंचित बहुजन आघाडी'च्या सदर लेखी पत्राची दखल घेत घणसोली विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय तायडे यांनी साईबाबा नगर कातकरी पाडा येथील वस्तीत मुलभूत सुविधा पुरविण्याबाबत कायर्वाही सुरु केली असून त्याबाबत येथील रहिवाशांनी आभार मानले आहेत.