नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
‘खारभूमी सर्वेक्षण विभाग'च्या दुर्लक्षामुळे हजारो एकर शेतजमीन नापिक
बांधबंदिस्तीची कामे मार्गी लावण्याची ‘मनसे'ची मागणी
उरण : उरण तालुक्यातील खोपटा, आवरे, पिरकोण, विंधणे, मोठी जुई ग्रामपंचायत हद्दीतील खाडीकिनाऱ्यावरील बांधबंदिस्तीच्या कामांकडे खारभूमी सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने सदर शेतजमिनीत समुद्राच्या उधाणाचे पाणी शिरल्याने शेतजमीन नापिक झाली आहे. त्यामुळे खारभूमी सर्वेक्षण आणि अन्वेषण विभाग पेण येथील अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर सदर ग्रामपंचायत हद्दीतील बांधबंदिस्तीची कामे मार्गी लावावीत, अशी मागणी ‘मनसे'चे उरण तालुकाध्यक्ष ॲड. सत्यवान भगत यांनी केली आहे.
खारभूमी सर्वेक्षण आणि अन्वेषण विभाग-पेणचे वरिष्ठ कार्यकारी अभियंता विजय पाटील यांची ३० नोव्हेंबर रोजी भेट घेऊन ॲड. भगत यांनी सदर बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. उरण पूर्व विभागातील शेतकऱ्यांच्या उपजिविकेचे साधन भात शेती आहे. परंतु, गेली अनेक वर्षे खाडीकिनाऱ्यावर बांधबंदिस्तीची कामे न केल्याने तसेच करंजा बंदरात या अगोदर करण्यात आलेल्या दगड-मातीच्या भरामुळे समुद्रातील उधाणाचे पाणी सातत्याने भात शेतीत शिरत आहे. एकंदरीत शेतकऱ्यांच्या उपजिविकेचे साधन धोक्यात येत असताना, शासन पुन्हा एकदा करंजा बंदरातील १०० एकर जागेवर भराव टाकून मल्टिमाँडेल लाँजिस्टीक पार्क उभारण्याच्या तयारीत असून एमआयडीसी आणि मेरीटाईम बोर्डाने त्यासाठी जागा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
त्यामुळे खोपटा, आवरे, पिरकोण, विंधणे, मोठी जुई ग्रामपंचायत हद्दीतील उरल्यासुरल्या भात शेतीत उधाणाचे पाणी शिरुन खारफुटीचे जंगल वाढण्याचा तसेच भातशेती नापिक होण्याचा संभव आहे. यासाठी लवकरात लवकर बांधबंदिस्तीची कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी ॲड. सत्यवान भगत यांनी कार्यकारी अभियंता विजय पाटील यांच्याकडे केली आहे.
याप्रसंगी खारभूमीचे उप अभियंता अतिश भोईर, पिरकोन ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य तथा ‘मनसे'चे उपतालुका अध्यक्ष दिपक पाटील उपस्थित होते.
उरण तालुक्यात काही अंशी बांध दुरुस्तीची कामे सुरू आहेत. खोपटा परिसरातील खाडीकिनाऱ्यावरील बांधबंदिस्तीची कामे मार्गी लावण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनस्तरावर सतत प्रयत्न केले जात आहेत. निधी उपलब्ध झाल्यावरच टेंडर प्रक्रिया पार पडणार आहे. - विजय पाटील, कार्यकारी अभियंता-खारभूमी सर्वेक्षण-अन्वेषण विभाग, पेण.