‘मनसे'चा दणका!

कळंबोलीत १५० पेक्षा जास्त बसेसवर कारवाई

नवीन पनवेल : कळंबोली मॅक्डोनाल्डस्‌ येथे कोणताही अधिकृत थांबा नसतानाही पाच पैकी चार लेन अडवून राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असणाऱ्या खाजगी बसेसवर ‘महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना'ने केलेल्या आंदोलनानंतर वाहतूक पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यात आली.

कळंबोली येथील यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग जवळ मॅकडोनाल्डस्‌ समोर अनेक बसेस रस्त्यावर उभ्या असतात. अनधिकृतपणे उभे असलेल्या बस पाच पैकी चार लेन अडवून ठेवतात. त्यामुळे या ठिकाणी अपघात देखील होत असतात. इतर वाहनांना पुढे जाण्यासाठी जागा देखील नसते. रुग्णवाहिका जाण्यासाठी देखील
उशीर होतो. मात्र, वाहतूक पोलीस खाजगी बसेसवर कारवाई करताना दिसून येत नाहीत.

त्यामुळे ‘मनसे'च्या वतीने रात्री या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. येथे थांबणाऱ्या बसेस वर वाहतूक पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडले. ‘मनसे'च्या दणक्यामुळे रात्रीच्या वेळेस जवळपास १५० बसेसवर कारवाई करण्यात आली. संपूर्ण रस्ता बेशिस्तपणे व्यापणाऱ्या या बसेसमुळे अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले होते. रस्ताही विनाकारण यांच्या बेशिस्तीमुळे सतत जाम असायचा. ‘मनसे'च्या आंदोलनानंतर या रस्त्याने मोकळा श्वास घेतला. यापुढे देखील असेच आंदोलन सुरु राहणार असल्याचे ‘मनसे'चे पनवेल महानगर शहर अध्यक्ष योगेश चिले यांनी सांगितले.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘खारभूमी सर्वेक्षण विभाग'च्या दुर्लक्षामुळे हजारो एकर शेतजमीन नापिक