नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
दिवा येथे भीषण पाणीटंचाई
महिन्याभरात पाणीटंचाई दूर करा; अन्यथा आक्रोश मोर्चाचा इशारा
ठाणे : दिवा मधील भीषण पाणी टंचाई, अनियमित पाणी पुरवठा आणि नागरिकांना पाणी नसताना येणारी भरमसाठ बिले या विरोधात ‘शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)च्या वतीने ठाणे महापालिका दिवा प्रभाग समिती कार्यालावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती.
खासदार तथा शिवसेना नेते राजन विचारे, कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत, कल्याण जिल्हाप्रमुख सदानंद थरवल, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघ्ो, माजी आमदार सुभाष भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर प्रमुख सचिन पाटील, दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे, नुकत्याच ‘शिवसेना'मध्ये प्रवेश केलेल्या ‘तन्वी फाऊंडेशन'च्या अध्यक्षा ज्योती पाटील, तेजस पोरजी, मयुरी पोरजी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक आणि महिला पाणीटंचाईचा जाब विचारण्यासाठी दिवा प्रभाग समिती कार्यालयावर धडकल्या होत्या. ठाणे महापालिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एकहाती वर्चस्व असतानाही मागील अनेक वर्षे दिवा मधील पाणीटंचाई न सुटल्याने ‘शिवसेना'ने दिवा प्रभाग समितीवर पाण्यासाठी हल्लाबोल मोर्चा काढत शिंदे गटाच्या मनमानी कारभाराचे वाभाडे काढले.
पाणी चोरी, पाणी लाईन विकणारे दलाल आणि टँकर माफियांना पाणी मिळते. मात्र, दिवा मधील गोरगरीब जनतेला पाणी का मिळत नाही? असा सवाल ठाकरेंच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना चर्चेदरम्यान केला. यावेळी महापालिका प्रशासनाने दिवा मधील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरु असल्याचे आश्वासन दिले. त्यावर महिनाभरात दिवा येथील पाणी प्रश्न न सुटल्यास ठाणे महापालिका मुख्यालयावर शिवसैनिक धडक देतील, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.
ठाणे महापालिका मध्ये मागील काही वर्षे ना. एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व आहे. शिवसेना फुटीनंतर दिवा येथील बहुतांश नगरसेवक शिंदे गटात गेले. दिवा विभागावर याच लोकांचे वर्चस्व असल्याने येथील जनतेला न्याय मिळाला नाही. दिवा-शीळ पाईपलाईन माजी आमदार सुभाष भोईर यांनी मंजूर करुन आणली. २०२० मध्ये वर्क ऑर्डर निघाली; मात्र खासदार श्रीकांत शिंदे यांना श्रेय हवे असल्याने त्यांनी तीन वर्षे दिवेकारांना पाण्यापासून वंचित ठेवले? असा आरोप यावेळी दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी केला. तर दिवा मधील नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी पाणी चोरांवर कारवाई करा, अशी मागणी शहर प्रमुख सचिन पाटील यांनी केली. दिवा शहरातील पाणी टंचाईचा सर्वाधिक फटका महिलांना बसत असून विकतचे पाणी घ्यावे लागत असल्याने आर्थिक स्थिती बिघडते. परिणामी, शहरातील पाणी समस्या निकालात काढावी, अशी मागणी ज्योती पाटील यांनी केली.
दिवा प्रभाग समिती वरील धडक मोर्चा ट्रेलर असून दिवा शहरातील पाणी समस्या न सोडवल्यास ठाणे महापालिका मुख्यालयावर प्रचंड आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा ज्योती पाटील यांनी दिला आहे.
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख विजय देसाई, सहसंपर्क संघटक श्रीकांत बिरमुळे, संपर्क संघटिका मृणाल यज्ञेश्वर, जिल्हा संघटक कविता गावंड, कळवा शहर प्रमुख चंद्रकांत विधाटे, कळवा शहर संघटक रवींद्र सुर्वे, शहर प्रमुख सचिन पाटील, शहर संघटक रोहिदास मुंडे, युवा शहर अधिकारी अभिषेक ठाकूर, उपशहर प्रमुख वैष्णव पाटील, उपशहर संघटिका योगिता नाईक, प्रियंका सावंत, विभाग प्रमुख चेतन पाटील, विभाग प्रमुख मच्छिंद्रनाथ लाड, विभाग संघटिका स्मिता जाधव तसेच दिवा शहरातील इतर सर्व पदाधिकारी आणि तमाम शिवसैनिक उपस्थित होते.