नवी मुंबईत भाजपाचा शिवसेना आणि राष्ट्रवादीला दे धक्का!

नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोरदार दणका दिला असून दिघा आणि तुर्भे येथील या दोन पक्षाच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे या भागातील भाजपाची ताकद वाढली असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा सुपडासाफ झाला आहे. 

लोकनेते आमदार गणेश नाईक, भाजपाच्या प्रदेश महिला उपाध्यक्षा चित्रा वाघ, माजी खासदार संजीव नाईक माजी आमदार संदीप नाईक माजी महापौर सागर नाईक माजी महापौर सुधाकर सोनवणे भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हातात घेतला. गेली वीस वर्षे शिवसेनेमध्ये कार्यरत हाेते.

दिघा येथील शिवसेनेचे विभागप्रमुख सुभाष काळे गेल्या पंधरा वर्षांपासून शिवसेनेचे काम करणारे शाखाप्रमुख केशव चव्हाण, दिघा येथील शिवसेना युवा विभाग अधिकारी सचिन लोंढे, समाजसेविका श्वेता काळे, जय लहुजी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मातंग समाजासाठी महाराष्ट्रभर काम करणारे योगेश शिंदे, असंघटित कामगारांच्या हितासाठी काम करणारे राष्ट्रवादीचे तुर्भे तालुका अध्यक्ष बाळकृष्ण खोपडे, माजी नगरसेवक प्रल्हाद शेलटकर शाखाप्रमुख बसवराज गडीवडार शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी मल्लेश पुजारी, राष्ट्रवादीचे तुर्भे तालुका उपाध्यक्ष शिवाजी शिंदे, तुर्भे तालुका कार्याध्यक्ष नियाज शेख या सर्वांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह लोकनेते आमदार नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला.

अनंत सुतार यांनी आपल्या प्रास्ताविकात सर्वांचे भाजपात स्वागत करून लोकनेते आमदार नाईक यांच्याकडून आपल्या सर्वांना खरी ताकद मिळेल, अशी ग्वाही दिली. 

चित्रा वाघ यांनी लोकनेते नाईक हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या सुखदुःखाची जाणीव असणारे नेतृत्व आहे असे गौरवोद्गार काढले.  ज्यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे त्यांना शेवटपर्यंत पश्चाताप करण्याची पाळी येणार नाही त्यांनी घेतलेला निर्णय हा योग्य असेल असे त्या म्हणाल्या. नवी मुंबई पालिकेच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व 111 ठिकाणी भाजपाचे उमेदवार जिंकून आणावेत असे आवाहन त्यांनी केले.

लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे भारतीय जनता पार्टीत स्वागत केले. नवी मुंबई महापालिकेतील सत्तेचा लोककल्याणासाठी वापर केला असे सांगून लोकनेते आमदार नाईक यांनी गुंडांना घाबरू नका. आपल्याकडे असलेले नैतिकतेचे शस्त्र सर्वात मोठे आहे, असा सल्ला  उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.  लोकनेते नाईक म्हणाले, भाजपात आलेल्या सर्वांना आपुलकीची वागणूक मिळेल. पालिका निवडणुकांच्या दृष्टीने सावध रहा. जनतेचे हित साधण्यासाठी महापालिकेची सत्ता प्राप्त करूया.

पक्षप्रवेश कार्यक्रमाची सांगता करताना भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी भाजपा सोडून गेलेल्यांना टोला लगावला. अल्पकालीन लाभासाठी काही लोक भाजपा सोडून गेले. मात्र दीर्घकालीन समाधानासाठी लोकनेते आमदार गणेश नाईक यांचे नेतृत्वच लाभदायी आहे, असे सांगितले.

Read Previous

रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव 

Read Next

दिबांसाहेबांच्या नावासाठी क्रांतिदिनी मशाल मोर्चा