ठाणे जिल्हा परिषद सीईओ जिंदल यांचे पालकांना आवाहन

आरटीई प्रतिक्षा यादीतील ११७ विद्यार्थ्यांचा प्रवेश लवकर घ्यावा

तुर्भे : नवी मुंबईत ‘आरटीई'च्या प्रलंबित (प्रतिक्षा) यादीतील केवळ ११७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्ोणे शिल्लक आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांनी लवकरात लवकर प्रवेश घ्यावा, असे आवाहन महापालिका शिक्षणाधिकारी अरुणा यादव यांनी केले आहे. आर.टी.ई. अंतर्गत शहरातील ९८ शाळांमध्ये पहिल्या लॉटरीत प्रतिक्षा यादीच्या दुसऱ्या टप्प्यापर्यंत २,०५५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. आता प्रतिक्षा यादीतील टप्पा क्र.३ मधील प्रवेश प्रक्रिया १९ जुलैपासून सुरु झाली आहे.

बालकांचा मोफत-सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ अन्वये दरवर्षीप्रमाणे खाजगी विनाअनुदानित शाळेत एकूण पटाच्या २५ टक्के विद्यार्थीना प्रवेश दिला जातो. ज्या बालकांची लॉटरीद्वारे २५ टक्के प्रवेशासाठी निवड झाली आहे, त्या बालकांच्या पालकांना त्यांनी अर्जामध्ये नमुद केलेल्या मोबाईल नंबरवर एसएमएस पाठवण्यात आले. संबंधित बालकांच्या पालकांनी पाडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रे तपासून घेतले. तसेच पाल्याचा प्रवेश निश्चित करून शाळेमध्ये प्रवेश घेतला होता.

त्यानुसार आर.टी.ई. अंतर्गत प्रवेशासाठी ३२,६१२ अर्ज आले होते. त्यापैकी २,१७२ मुले पहिल्या यादीत प्रवेश देण्यास पात्र झाले. मात्र, पडताळणी समितीकडे २,०५५ विद्यार्थ्यांची कागदपत्रे तपासण्यासाठी आली. त्यांचे प्रवेश अंतिम करण्यात आले. उर्वरित प्रतिक्षा यादीतील ११७ पाल्यांना एसएमएस पाठवून कागदपत्रे पडताळण्यासाठी २८ जुलै पर्यंत सादर करुन पालकांनी त्यांच्या मुलांचा प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी अरुणा यादव यांनी केले  आहे.

पालकांनी केवळ एसएमएस वर अवलंबून न राहता आरटीई पोर्टल वरील अर्जाची स्थिती आपल्या बालकाचा अर्ज क्र. टाकून अर्जाची स्थिती पहावी. प्रतिक्षा यादी टप्पा क्र.३ मधील बालकाच्या पालकांनी त्यांच्या लॉगीनमधून ॲलोटमेंट पत्राची प्रिंट काढावी. सदर अलोटमेंट पत्र आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन जवळील पडताळणी केंद्रावर जाऊन पडताळणी समितीकडून २८ जुलै पर्यंत  कागदपत्रांची पडताळणी करुन त्यांच्या बालकांचा ऑनलाईन प्रवेश निश्चित करावा. प्रवेश निश्चित झाल्याची पावती घेऊन शाळेमध्ये जावे आणि प्रवेश घ्यावा, असे आवाहन ‘ठाणे जिल्हा परिषद'चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भाऊसाहेब कारेकर यांनी केले आहे. 

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

मानधनात वाढ करण्याच्या प्रलंबित मागणीसाठी मुख्यालयासमोर भर पावसात आंदोलन