"सर्वांसाठी घरे" या सिडकोच्या ध्येयाची वचनपूर्ती - श्री. एकनाथ शिंदे

"सिडको महामंडळातर्फे बांधण्यात आलेली ही घरे आजूबाजूच्या परिसरातील घरांच्या किंमतीशी तुलना करता अतिशय परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत ही उल्लेखनीय बाब आहे. अतिशय उत्तम बांधकाम दर्जा असेलली ही घरे सर्वसामान्यांचा सिडकोवरील विश्वासास अधिक बळकटी देतात. या गृहनिर्माण योजनेस केंद्र सरकारकडून लागू असलेल्या अनुदानाचा भार सिडको महामंडळाने उचलला आहे. 1 जुलैपासून घराचा ताबा देण्याचे वचन सिडकोने पाळले आहे. " असे उद्गार एकनाथ शिंदे, मंत्री, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) तथा पालकमंत्री, ठाणे जिल्हा यांनी काढले. सिडको महामंडळाच्या 2018-19 महागृहनिर्माण योजनेतील यशस्वी अर्जदारांना सदनिका सुपुर्द करण्याच्या समारंभ प्रसंगी अध्यक्ष म्हणून बोलताना त्यांनी हे उद्गार काढले. या वेळी श्री. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते यशस्वी अर्जदारांना सदनिका सुपूर्द करण्यात आल्या. सदर कार्यक्रम हा सेक्टर-15, भूखंड क्र. 1 ते 9, पोलीस मुख्यालयामागे, कळंबोली, नवी मुंबई येथे मोजक्या मान्यवरांच्या आणि निवडक अर्जदारांच्या उपस्थितीत व कोविड-19 सुरक्षाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करून पार पडला.

या प्रसंगी राजन विचारे, खासदार, ठाणे, डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांची प्रमुख उपस्थिती तर अश्विन मुद्गल, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको,  कैलास शिंदे, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको यांची सन्माननीय उपस्थिती लाभली.

या प्रसंगी बोलताना एकनाथ शिंदे यांनी हजारो कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होत आहे, ही आनंदाची बाब असून कोविड-19 च्या काळातही सिडकोतील अभियंते व अधिकाऱ्यांनी घरांचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याकडे लक्ष पुरविले. केवळ घर बांधणी व विकास प्रकल्प यात मर्यादित न राहता सिडकोने कोविड काळाच्या संकट समयी शासनाच्या निर्देशानुसार विविध ठिकाणी कोविड सेंटर व रूग्णालयाची उभारणी केली हे कौतुकास्पद आहे  असे प्रशंसोद्गार काढले.

या प्रसंगी बोलताना डॉ. संजय मुखर्जी यांनी कोविड-19 महासाथीच्या काळात उद्भवलेल्या अडचणींवर केलेली मात तसेच अर्जदारांना भेडसावणाऱ्या आर्थिक अडचणींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून अर्जदारांना दिलासा देणारे निर्णय घेतल्याचा उल्लेख केला. यशस्वी अर्जदारांना सदनिका सुपूर्द करण्याचा हा क्षण वचनपूर्तीचा आनंद देणारा आहे. आजपासून यशस्वी अर्जदारांना घरांचा ताबा टप्याटप्याने देण्यात येईल असेही ते म्हणाले.

Read Previous

 ‘लवाद’च्या निर्णयाला उच्च न्यायालयाची अंशत: स्थगिती

Read Next

आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा*-आ. सौ.मंदा म्हात्रे