मर्चंट नेव्ही मध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱया टोळीचा पोलिसांकडुन शोध सुरु 

नवी मुंबई : मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीला लावण्याचे अमिष दाखवून फसवणुक करणाऱया  एका टोळीने नवी मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी कार्यालय थाटुन सुमारे 200 बेरोजगार तरुणांकडून लाखो रुपयांची रक्कम उकळून त्यांची फसवणुक केल्याचेउघडकीस आले आहे. या टोळीविरोधात नेरुळ पोलिसांनी फसवणुकीसह बनावटगिरी केल्याप्रकणी गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.  

या टोळीत चंद्रिका प्रसाद, राशी मॅडम, अजमल व अर्ष या चौघांचा व इतर काही लोकांचा समावेश आहे. टोळीने एप्रिल 2020 मध्ये नेरुळच्या सेंच्युरियन मॉलमध्ये ट्रायवे नेव्हिगेशन ऍन्ड मरीन नावाने कार्यालय थाटले होते. तसेच त्यांनी मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी मिळवून देण्यासंदर्भात सोशल मिडीयाद्वारे जाहिरातबाजी केली होती. सदर जाहिरातीला भुलून वेगवेगळ्या राज्यातील अनेक बेरोजगार तरुणांनी या कार्यालयात संपर्क साधल्यानंतर या टोळीतील सदस्यांनी सदर तरुणांकडून मर्चंट नेव्हीतील नोकरीसाठी त्यांच्या सोबत बनावट कारारपत्र तयार करुन त्यांच्या व्हॉट्सऍपवर पाठविले. तसेच त्यांच्याकडून 1 लाख ते 4 लाख रुपयांपर्यंतची रक्कम उकळली. त्याचप्रमाणे या तरुणांकडून त्यांचे पासपोर्ट घेऊन त्यांना परदेशात शिपवर नोकरीला पाठविण्याचा बहाणा करून त्यांना व्हिजा देऊन त्यांची विमानाची तिकीटे देखील काढली.  

मात्र ती नंतर रद्द करण्यात आली. त्यामुळे फसवणुक झालेल्या तरुणांनी नेरुळ मधील हावरे सेंच्युरियन मॉलमधील ट्रायवे नेव्हिगेशन ऍन्ड मरीन या कार्यालयात धाव घेतली. मात्र, सदर टोळीने आपले सर्व मोबाईल फोन बंद करून तसेच कार्यालय बंद करुन पलायन केल्याचे आढळुन आले. त्यामुळे फसवणुक झालेल्या काही तरुणांनी नेरुळ पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या तरुणांनी ऑल इंडिया सिफेरर्स ऍन्ड जनरल वर्कर्स युनियनच्या माध्यमातून परिमंडळ-1 चे पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे यांची भेट घेतली होती. त्यानंतर उपायुक्त मेंगडे यांनी दिलेल्या निर्देशानुसार नेरुळ पोलिसांनी या टोळी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असून अद्याप या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आली नसल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन मोरे यांनी सांगितले.  

Read Previous

लॉरेम इप्सम म्हणजे काय?

Read Next

मेथॅडॉन या अंमली पदार्थाची विक्री  करण्यासाठी आलेला व्यक्ती जेरबंद